नको नको म्हणताना,गंध गेला रानावना...

    01-Feb-2026
Total Views |
Padma Shri Dr. Ramchandra and Sunita Godbole
 
कधी कधी एखादे जीवन स्वतःहून प्रसिद्धीपासून दूर राहू पाहते, पण त्याच्या कार्याचा सुगंध समाजात पसरत जातो. ‘तू मैं एक रक्त’ या विचारातून उभ्या राहिलेल्या सेवाव्रताचे असेच दर्शन घडवणारी ही कथा. नुकत्याच घोषित झालेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी डॉ. रामचंद्र आणि सुनीता गोडबोले या दाम्पत्याच्या आयुष्याने छत्तीगढमधील बस्तरच्या रानावनात माणुसकीचा सुगंध दरवळवला आणि तोच त्यांनी ‘नको’ म्हणतानाही समाजापर्यंत पोहोचला. त्यांची ही कहाणी...
 
डॉ. रामचंद्र गोडबोले यांच्या आयुष्याला सामाजिक सेवेची दिशा मिळण्यामागे एक शांत, पण निर्णायक क्षण होता; तो म्हणजे तरुण वयात त्यांनी वाचलेले ‘नोबेल’ पुरस्कार विजेते वैद्यक आणि मानवतावादी विचारवंत डॉ. अल्बर्ट श्वाइत्झर यांचे चरित्र. त्या चरित्रातील आफ्रिकेतील जंगलात राहून केलेली निःस्वार्थ वैद्यकीय सेवा, ‘माझे जीवन म्हणजे सेवा’ हा विचार आणि माणसासाठी माणूस म्हणून जगण्याची तत्त्वज्ञानात्मक भूमिका त्यांच्या मनात खोलवर रुजली आणि तेव्हाच त्यांनी ठरवले की, वैद्यकीय शिक्षण हे केवळ उपजीविकेचे साधन न राहता, आयुष्यभराची साधना असेल. ही जाणीव अधिक दृढ झाली ती १९८३ साली, जेव्हा त्यांचा संपर्क ‘वनवासी कल्याण आश्रमा’शी आला. त्या संपर्काने त्यांच्या विचारांना संघटित चौकट मिळाली आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्पष्ट झाला.
 
याच प्रवासात त्यांची भेट ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे तत्कालीन अखिल भारतीय संघटनमंत्री भास्करराव कळंबी यांच्याशी झाली आणि त्यांनी अत्यंत कळकळीने सांगितले की, ‘देशाच्या दुर्गम वनवासी भागात वैद्यकीय सेवेची खरी गरज आहे आणि तुझ्या हातून हे कार्य घडू शकते.’ हा विश्वास डॉ. गोडबोले यांच्यासाठी केवळ प्रोत्साहन नव्हता, तर जबाबदारीचा स्वीकार होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने सुरु असलेल्या सामाजिक कार्याशी ते स्वतंत्रपणे जोडले गेले होते आणि सेवा ही जीवनाची कडा असू शकते, ही धारणा अधिकाधिक पक्की होत गेली. याच काळात पुण्यात समाजकार्याच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या सुनीता गोडबोले यांचाही प्रवास वेगळ्या वाटेने, पण तितक्याच प्रामाणिकतेने आणि त्याच ध्येयवाटेकडे सुरू होता; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करताना समाजाशी जोडलेपण आले. मात्र, भावनिक आवेगापुरते न थांबता, समाजकार्य शास्त्रीय समजुतीने करावे, या विचारातून त्यांनी कर्वे शिक्षण संस्थेतून समाजकार्याचे औपचारिक शिक्षण घेतले आणि वनवासी भागात प्रत्यक्ष राहून काम करण्याचा निर्धार केला.
 
पण, दोघेही स्वतंत्र मार्गांनी चालत असताना नियतीने जणू आधीच ठरवले होते की, या दोघांचे प्रवास एकत्र येणार आहेत आणि दि. २८ फेब्रुवारी १९९० रोजी त्यांचा विवाह झाला. हा विवाह दोन व्यक्तींचा नव्हता, तर दोन सेवाव्रतींचा संगम होता. जनजाती समाजासाठी आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय घेताना त्यांच्यासमोर हेमलकसा, आनंदवन येथील डॉ. आमटे यांचे कार्य आदर्श म्हणून होते. मात्र, तेथील अधिक औपचारिक चौकट लक्षात घेता, ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे सातारा येथील पूर्णवेळ कार्यकर्ते डॉ. मधुकर आचार्य आणि इतर सहकारी मित्रांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या माध्यमातूनच हे पवित्र कार्य सहजतेने व समाजाशी अधिक एकरूप होऊन घडेल. हा सल्ला त्यांनी अंतःकरणापासून स्वीकारला. १९९० साली विवाहानंतर दंतेवाडा जिल्ह्यातील बारसूर येथे ते आले आणि इथूनच त्यांच्या आयुष्याची खरी कसोटी सुरू झाली.
 
छत्तीसगढमधील दुर्गम भागात नक्षलवाद्यांची सावली, जंगली प्राण्यांचे भय, पायाभूत सुविधांचा अभाव आणि बाहेरून आलेल्या लोकांविषयीचा अविश्वास अशी बरीच आव्हाने समोर दिसत होती.सुरुवातीला मातीचे घर, पडक्या अवस्थेतील दवाखाना आणि अत्यल्प साधने होती. पण, ज्या जनजाती समाजासाठी आपण येथे आलो आहोत, त्यांच्या सहवासात या सगळ्या अडचणी कधीच ओझे वाटल्या नाहीत, असे हे दाम्पत्य आजही सांगते. हळूहळू जेव्हा स्थानिक समाजाच्या मनात हे काम लोककल्याणासाठी आहे, हा विश्वास रुजला तेव्हा त्यांनी या दाम्पत्याला ‘भैया’ आणि ‘भाभी’ म्हणून स्वीकारले आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे सुरक्षिततेची हमी दिली. या दाम्पत्याबरोबरच वनवासी महिलांचे सक्षमीकरण आणि लोकसंस्कृती जतनासाठी आयुष्य वाहणार्‍या बुधरी ताती यांच्या मार्गदर्शनामुळे समाजाशी नाते अधिक दृढ झाले आणि त्यांच्यासोबत दहा स्थानिक युवती या सेवाकार्यात सहभागी झाल्या, ज्यामुळे ही चळवळ पूर्णपणे स्थानिकांचीच झाली. बुधरी ताती यांना देखील यंदाचा सामाजिक कार्य आणि महिला सक्षमीकरणासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले.
 
डॉ. रामचंद्र आणि सुनीता गोडबोले यांनी गोंडी व हलबी भाषा आत्मसात केल्या. कारण, त्यांच्या मते, विश्वास हा औषधांपूर्वी संवादातून निर्माण होतो; अंधश्रद्धा, मांत्रिकाचे उपचार आणि आधुनिक वैद्यकाबद्दलची भीती दूर करणे सोपे नव्हते. अनेकदा दवाखान्याच्या आसपासच्या जंगलात धूर दिसणे, ही रुग्ण आल्याचा इशारा होता. त्यामुळे घाई करत धावत जावे लागायचे. शहरात नेलेला रुग्ण परत न येण्याइतकी भीती त्यांच्या मनात असे, पण संयम आणि सातत्यामुळे दवाखान्यात येणार्‍या रुग्णांची संख्या वाढत गेली. आरोग्यसेवेपुरतेच न थांबता त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी वसतिगृह सुरू केले, कुपोषणाविरोधात सातत्याने काम केले, महिलांसाठी स्वयंसेवी गट उभे केले आणि सुनीता गोडबोले यांना बालहक्क संरक्षणासाठी प्रथम श्रेणी न्यायाधीशांचे अधिकार, तसेच लैंगिक छळ प्रतिबंध समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, तरीही त्यांनी या सन्मानांकडे सेवाव्रताची साधने म्हणूनच पाहिले.
 
काळाच्या ओघात नक्षलवादाची चर्चा अधिक झाली, पण हे दाम्पत्य ठामपणे सांगते की, "आता नक्षलवादापेक्षा आदिवासी समाजासाठी येथे येऊन वेळ देणे, त्यांच्या विकासाच्या गरजांवर चर्चा करणे अधिक महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच ‘पद्मश्री’ पुरस्कार आम्ही स्वीकारला. कारण, हा सन्मान आमचा नसून येथील जनजाती समाजाचा आहे.” ‘तू मैं एक रक्त’ ही ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची घोषणा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र बनली शहरी समाज आणि वनवासी समाज हे वेगळे नसून एकाच भारतीय संस्कृतीचे, एकाच रक्ताचे घटक आहेत, ही जाणीव त्यांनी जगण्यातून दाखवली. आज मागे वळून पाहताना डॉ.रामचंद्र आणि सुनीता गोडबोले सांगतात की, "आम्ही कधीही पुरस्कारासाठी काम केले नाही. अनेकदा पुरस्कार आणि गौरवाला ‘नको’ म्हणत राहिलो.” पण, तरीही त्यांच्या सेवाकार्याचा गंध माणसा-माणसांतील विश्वासाने आणि आपलेपणाने रानावनात पसरत गेला. म्हणूनच ‘नको नको म्हणताना, गंध गेला रानावना...’ हे केवळ शीर्षक नाही, तर गोडबोले दाम्पत्याच्या संपूर्ण जीवनप्रवासाचे सार आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे गोडबोले दाम्पत्याला ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी पुनश्च अभिनंदन आणि भविष्यातही त्यांचे समाजकार्य असेच वृद्धिंगत होवो, हीच सदिच्छा!
 
- सागर देवरे