मुंबई मेट्रो ३ : फडणवीसांचे निर्णायक नेतृत्व तर ठाकरेंचा विरोध

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच मुंबईचा विकास

Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : ( Devendra Fadnavis ) मुंबई मेट्रो ३ हा केवळ वाहतूक प्रकल्प नसून मुंबईच्या भविष्यासाठीचा ‘गेम चेंजर’ आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची भूमिका निर्णायक ठरली, तर ठाकरे सरकारच्या राजकीय हट्टामुळे या प्रकल्पाला विलंब व खर्चवाढ सहन करावी लागल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
 
ठाकरे बंधूंनी ‘मुंबईकरांनाच मुंबई कळते’ असा दावा केला असला, तरी वास्तवात मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी करण्याचे काम देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच राज्य सरकारच्या काळात झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात केवळ ११ किमी मेट्रोसाठी दहा वर्षे लागली, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचे जाळे तब्बल ३३७ किमीपर्यंत विस्तारण्याचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
 
विकास विरुद्ध अडथळे
 
मेट्रो ३च्या आरे कारशेडचा प्रश्न हा विकास आणि राजकीय दबावगट यांच्यातील संघर्षाचे प्रतीक ठरला. फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय उद्धव ठाकरे यांनी रद्द करत कारशेड कांजुरमार्गला हलवण्याची घोषणा केली. परिणामी कारशेड वाद, तांत्रिक अडचणी आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे झालेल्या विलंबाचा मोठा फटका बसला आहे, ज्यामुळे प्रकल्पाचा खर्च ४,००० कोटी ते १४,००० कोटींपर्यंत वाढला. मूळ खर्चात मोठी वाढ होऊन तो ३३,४०५ कोटींवरून ३७,२७६ कोटींवर पोहोचला. या निर्णयाचा फटका थेट मुंबईकरांच्या कराच्या पैशांना बसला.
 
पर्यावरण की राजकारण?
 
आरे जंगलाचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे सरकारने पर्यावरणाचे कारण पुढे केले. मात्र, त्याच परिसरात मेट्रो कारशेडसाठी आवश्यक असलेली जागा पूर्वीच निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे हा निर्णय पर्यावरणापेक्षा ‘राजकीय प्रतिमा व्यवस्थापनासाठी’ होता का?', असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
हेही वाचा : तिकिटासाठी पेडणेकर यांनी उद्धव ठाकरेंना धमकी दिली - आमदार निलेश राणे
 
मुंबईचा विकास थांबवण्याची मानसिकता
 
२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांनी दहा मेट्रो मार्गांना मंजुरी दिली. आज मेट्रो लाईन १, २अ आणि ७ , मुंबई मेट्रो ३ अशा एकूण ७५ किमी मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. याउलट, ठाकरे सरकारच्या काळात अनेक प्रकल्पांना स्थगिती, पुनर्विचार आणि राजकीय वादांचा सामना करावा लागला.
 
बीएमसी निवडणुकांचा केंद्रबिंदू
 
बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून विविध विकास प्रकल्पाचा श्रेयवाद केला जातो आहे. मात्र मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेली मेट्रो ३बद्दल ठाकरे गट मौन बाळगून आहे. मात्र मुंबई मेट्रो ३ हा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ‘विकास करणारे नेतृत्व की अडथळे आणणारे राजकारण’ असा थेट प्रश्न मुंबईकरांसमोर ठेवण्याची रणनीती महायुतीकडून आखली जात असल्याचे दिसते.
 
एकंदरीत पाहता, मुंबई मेट्रो ३ हा प्रकल्प ठाकरे विरुद्ध फडणवीस या नेतृत्वाच्या कार्यशैलीतील फरक अधोरेखित करणारा ठरत आहे. मुंबईकरांच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून निर्णय घेणारे नेतृत्व आणि तात्कालिक राजकीय फायद्यासाठी प्रकल्प रोखणारी भूमिका यातील निवड मुंबईकर कोणाच्या बाजूने करणार हे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांतून दिसून येईलच.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.