काल्पनिक पात्र असलेल्या फातिमांचे उदात्तीकरण कशासाठी?

    09-Jan-2026
Total Views |

Fatima Sheikh

आपला पुरोगामी अजेंडा रेटण्यासाठी ‘फातिमा’ नावाचे काल्पनिक मुस्लीम शिक्षिकेचे पात्र निर्माण करुन,ते चक्क महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रातच पेरण्याचा वैचारिक दळभद्रीपणा काही तथाकथित पुरोगाम्यांनी केला. यासंबंधीची पोलखोल, कबुलीनामा समोर आल्यानंतरही हा प्रकार आजही दुर्दैवाने सुरूच आहे.तेव्हा या अपप्रचाराला कदापि बळी न पडता, तो उखडून फेकण्यासाठीचा हा लेखप्रपंच...

आपल्या देशात अनेक वर्षांपासून काही स्वयंघोषित विद्वान आणि नकली पोंगापंडित विद्वानांच्या टोळ्या चुकीच्या गोष्टी, खोटे ‘नॅरेटिव्ह’ किंवा चुकीच्या ऐतिहासिक घटना समाजात प्रस्थापित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश अर्थात, ख्रिश्चनांनी खोट्या ‘नॅरेटिव्ह’ची पेरणी केली. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातील काही डावे लेखक, विचारवंत, बामसेफी कम्युनिस्ट, छुपे नक्षलसमर्थक, ढोंगी पुरोगामी यांनी देशातील समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात खोटा इतिहास किंवा ‘नॅरेटिव्ह’ कथा, कादंबर्‍या, चित्रपटसृष्टीमधून प्रस्थापित केला आहे. तत्कालीन सरकारी यंत्रणासुद्धा त्यांना साहाय्यभूत ठरलेल्या होत्या आणि आजही काही प्रमाणात ठरतसुद्धा आहेत.

अकबर ग्रेट’पासून ‘हिंदू-मुस्लीम ऐयाचा प्रतीक औरंगजेब हा परकीय मुस्लीम आक्रमक नव्हे, तर मुघल सत्ताधीश बादशाह’ असे उदात्तीकरण क्रमिक पाठ्यपुस्तकापासून विश्वविद्यालय शिक्षण क्षेत्रात केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी शिवकालीन इतिहास मोजक्या शब्दांत मांडला गेला. इतिहासाची मोडतोड करून विकृतीकरणसुद्धा केले. धार्मिक क्षेत्रात एकलव्याचा अंगठा, शंभूक वधापासून संत तुकाराम महाराज यांची हत्या, अटकेपार भगवे झेंडे लावलेल्या पेशव्यांची बदनामी करून खोट्या अमानुष प्रथांचे सादरीकरण करणे, कोरेगाव-भीमा आणि महात्मा फुले दाम्पत्याचा कथित छळ, असे अनेक मिथक समाजात सतत प्रस्तुत करून हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. उपरोक्त सर्व ‘नॅरेटिव्ह’ हिंदू समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी किंवा सामाजिक फूट निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक पेरले गेले किंवा प्रस्थापित केले गेले आहेत. आता तथ्य व सत्य नसलेले काल्पनिक पात्र फातिमा शेख उभे करून सावित्रीबाई फुले यांच्या बरोबरीने अथवा सावित्रीबाई फुलेंच्या पंक्तीमध्ये बसविण्यासाठी, ‘सुपरमॅन’सारखे काल्पनिक पात्र समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दि. ९ जानेवारी रोजी फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्याची चळवळ उभी केली जात आहे. शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक अशी बिरुदे लावून खोटे कथानक, धादांत खोटी प्रतिमा उभी करून काल्पनिक जयंती साजरी करण्याचा घाट घातला जात आहे. शाळा, विद्यालयांमधून म. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी होत्या, असे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू आहे. म्हणूनच त्याचा समाचार घेणे क्रमप्राप्त.

तथ्य व सत्य नसलेले उत्तम उदाहरण

महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे पुण्यस्मरण करताना हळूच फातिमा शेख यांचे काल्पनिक कथानक व पात्र समाजाच्या समोर उभे करण्यात येत असून, फातिमा शेख यांना सावित्रीबाई फुले यांच्या पंक्तीमध्ये बसविण्याचा घाट घातला जात आहे. यानिमित्ताने समाजात खोट्या ‘नॅरेटिव्ह’द्वारे संभ्रमसुद्धा निर्माण करण्याचे फार मोठे षड्यंत्र रचले जात आहे. फातिमा शेख यांच्या खोट्या ‘नॅरेटिव्ह’ची व्याप्ती केवळ महाराष्ट्रात नसून संपूर्ण देशात आहे. कर्नाटक सरकारने फातिमा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कारसुद्धा जाहीर केला. तसेच गल्लीपासून दिल्लीच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये पारंपरिक सरस्वती देवीचे पूजन बंद करून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्याचा घाटही घातला जात आहे. हा सर्व प्रकार एका मोठ्या षड्यंत्राचा भाग म्हणावा लागेल.

फातिमा शेख यांचा कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा नाही किंवा म. फुले यांच्या समग्र साहित्यामध्येसुद्धा नोंददेखील नाही. केवळ म. फुले यांच्या एका पत्रामध्ये उल्लेख आहे आणि त्याआधारे दि. ९ जानेवारी काल्पनिक फातिमा शेख यांची जयंती, शाळा-महाविद्यालयांमध्ये परिसंवाद व मोठा उत्सव साजरा करण्याची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याचे प्रतिबिंब सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उमटत असते. फातिमा शेख यांना समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या पंक्तीमध्ये बसविण्यासाठी किंवा सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक महत्त्व कमी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे काय? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. तसेच समाजात खोटे ‘नॅरेटिव्ह’ आणि खोटा इतिहास कसा प्रस्थापित केला जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे तथ्य आणि सत्य नसलेले फातिमा शेख यांचे हे काल्पनिक पात्र. त्यामुळे समाजानेच पुढाकार घेऊन असा खोटा इतिहास प्रस्थापित करण्याचा डाव हाणून पाडला पाहिजे किंवा उधळून लावला पाहिजे आणि सत्य इतिहास स्वीकारण्यासाठी पुढे आले पाहिजे.

खोटारडी जमात उघडी पडली

महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते की, महाराष्ट्राच्या विविध भागांत जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सावित्रीबाई फुले यांचे शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ आणि सामाजिक कार्यक्रमांमधून पुण्यस्मरण करून अभिवादन करण्यात येत असत. म. फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुण्यस्मरण करताना जाणीवपूर्वक आणि हळूच फातिमा शेख यांना उभे करून फुले दाम्पत्याच्या सामाजिक कार्यात फातिमा शेख यांचे योगदान असल्याचा कांगावा केला जातो, उदात्तीकरण करण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू आहे. परंतु, ‘फातिमा’ पात्राचे निर्माते दिल्लीचे प्रो. दीपक मंडल यांनी इतिहासाचे वास्तव समोर आणून सावित्रीबाई फुले यांच्या चरित्र ग्रंथात फातिमा शेख यांचे पात्र इतिहासात कधीच नव्हते, फारकाही संबंध नाही, असे म्हटले आहे.

प्रो. दीपक मंडल आणि महाराष्ट्रातील अनेक अभ्यासकांच्या वक्तव्यामुळे सत्य समोर आले आहे. फातिमा शेख यांचा काल्पनिक फोटो व काल्पनिक जयंती समोर येऊन फातिमा शेख यांच्यासाठी खोटी ओरड करणारी खोटारडी जमात उघडी पडली आहे. वास्तवामध्ये म. फुले यांच्या साहित्यामध्ये फातिमा शेख यांचा फारकाही ठळक असा उल्लेख नाही. केवळ दि. १० ऑटोबर १८५६ रोजी सावित्रीबाई फुले यांनी म. फुले यांना लिहिलेल्या पत्राच्या एका ओळीत ‘फातिमा’ असा उल्लेख आहे. केवळ एक ओळीच्या उल्लेखामुळे फातिमा शेख शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारक ठरत नाहीत. तसेच त्यांच्या जन्म-मृत्यूचा कुठलाही ऐतिहासिक पुरावासुद्धा नाही. केवळ एका पत्रामधील उल्लेखाला इतिहास म्हणून काल्पनिक जयंती, काल्पनिक फोटो असलेल्या फातिमा शेख यांना शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारक ठरवून सावित्रीबाई फुले यांच्या पंक्तीमध्ये बसविण्याचा प्रयत्न करणे, कितपत योग्य? तसेच सावित्रीबाई फुले यांचे पुण्यस्मरण करताना काल्पनिक फातिमा उभी करून उदात्तीकरण का केले जात आहे, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

- अशोक राणे