तिकीटविरहित प्रवासावर मध्य रेल्वेची कडक कारवाई

३०.७५ लाख प्रकरणांतून १८३ कोटींचा दंड वसूल

    09-Jan-2026
Total Views |
Central Railway
 
मुंबई : ( Central Railway ) प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीटविरहित व अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी कारवाई अधिक तीव्र केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल ते डिसेंबर २०२५) या कालावधीत मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी ३०.७५ लाख प्रवासी तिकीटाशिवाय किंवा अवैध तिकीटावर प्रवास करताना पकडले. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ सुमारे १० टक्के आहे.
 
या कारवाईतून मध्य रेल्वेने तब्बल १८३.१६ कोटींचा दंड वसूल केला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत १५१.९९ कोटींची वसुली झाली होती. म्हणजेच दंड वसुलीत २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. डिसेंबर २०२५ या एकाच महिन्यात ३.२४ लाख तिकीटविरहित प्रवासी आढळून आले असून, त्यांच्याकडून १८.२५ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. डिसेंबर २०२४च्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे.
 
हेही वाचा : मुंबई मेट्रो वन आणि सिरोना यांची भागीदारी; सर्व १२ स्थानकांवर व्हेंडिंग मशिन्स
 
विभागनिहाय आकडेवारीनुसार भुसावळ विभागातून ६३.८३ कोटी, मुंबई विभागातून ५५.१२ कोटी, पुणे विभागातून २०.८४ कोटी, नागपूर विभागातून २०.७५ कोटी, सोलापूर विभागातून ८.३९ कोटी, तर मुख्यालय स्तरावर १४.२२ कोटींची वसुली करण्यात आली आहे.
 
स्टेशन तपासणी, अचानक छापे, फोर्ट्रेस तपासणी, मेगा तिकीट तपासणी मोहिमा अशा बहुआयामी उपाययोजना राबवत मध्य रेल्वे तिकीटविरहित प्रवासावर आळा घालत आहे. प्रवाशांनी अधिकृत तिकीटच वापरावे, असे आवाहन करत रेल्वेने तिकीटविरहित प्रवासाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका स्पष्ट केली आहे.