मुंबई : (BMC Election) राज्यभरातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, त्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महापालिकेवर यंदा कोणाचा झेंडा फडकणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
शिंदेंच्या उमेदवारचा थेट मातोश्रीबाहेर प्रचार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ९३ मधील उमेदवार सुमित वांजळे यांनी गुरुवारी, ८ जानेवारीला थेट उबाठा गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या परिसरात प्रचार करत राजकीय वातावरण तापवलं. सुमित वांजळे यांनी त्या दिवशी सकाळपासून मातोश्री परिसरात प्रचार रॅली काढली होती.
यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी उबाठा आणि मनसे युतीत लढताना दिसत असून, मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र आल्याने ही लढत अधिकच चुरशीची झाली आहे. दुसरीकडे, मुंबईत शिवसेना, भाजपा आणि रिपब्लिकन सेना यांची महायुती असून, या आघाडीने प्रभाग क्रमांक ९३ मध्ये सुमित वांजळे यांना उमेदवारी दिली आहे. सुमित वांजळे हे शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख आहेत.
शिवसेनेतील फाटाफुटीनंतर पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावरून न्यायालयीन लढाई सुरू आहे. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या मूळ धनुष्यबाण चिन्हावर मातोश्री परिसरातून सुमित वांजळे रिंगणात उतरल्याने या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, उबाठा-मनसे युतीकडून वॉर्ड ९३ साठी रोहिणी कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उबाठाचं होमग्राउंड मानल्या जाणाऱ्या या वॉर्डमध्ये मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.