मुंबई : (Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'अमेरिका फर्स्ट' या धोरणाला अधिक आक्रमक करत जागतिक स्तरावरील ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याचा औपचारिक निर्णय घेतला आहे. भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'इंटरनॅशनल सोलर अलायन्स'चाही (ISA) यात समावेश आहे. या संघटना आता अमेरिकेच्या हिताच्या राहिलेल्या नाहीत, असे कारण ट्रम्प यांनी अध्यक्षीय ज्ञापनात नमूद केल्याची माहिती देण्यात आली आहे.
व्हाइट हाऊसने समाजमाध्यमांवरून या निर्णयाची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली असून, प्रशासनाने सांगितले की, या संस्थांचे व्यवस्थापन अयोग्य रीतीने चालले आहे आणि अमेरिकेच्या प्राधान्यक्रमांशी त्यांचा संबंध नाही. व्हाइट हाऊसकडून सर्व सरकारी विभागांना या संस्थांमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांना दिला जाणारा निधीही कायद्याच्या चौकटीत राहून रोखला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अमेरिकेने ज्या संघटनांतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये ३५ बिगर-संयुक्त राष्ट्र संघटना, ३१ संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संघटना यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
या महत्त्वाच्या संघटनांचा समावेश :
- इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA)
- इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN)
- इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC)
- युएन वॉटर (UN Water)
- युएन पॉप्युलेशन फंड (UNPF)
सोलर अलायन्स म्हणजे नेमके काय?
'इंटरनॅशनल सोलर अलायन्स' (ISA) ही सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी स्थापन करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय आघाडी आहे. २०१५ मध्ये पॅरिस येथे झालेल्या हवामान परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष यांच्या पुढाकाराने या अलायन्सची घोषणा करण्यात आली होती . उष्णकटिबंधीय देशांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, स्वच्छ व स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देणे, तंत्रज्ञान व निधीची देवाणघेवाण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे होते. मात्र, अमेरिकेने माघार घेतल्यामुळे या अलायन्सच्या निधीवर आणि जागतिक प्रभावावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.