मुंबई केंद्रशासित करण्याची कल्पना नेहरूंची, पण अफवा पसरवतो उबाठा?

    08-Jan-2026   
Total Views |
Uddhav Thackeray
 
मुंबई : ( Uddhav Thackeray ) मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की, उबाठा गटाच्या प्रमुखांसह पक्षाचे नेते मुंबई मराठी माणसाच्या हातातून जाणार, तिला केंद्रशासित केले जाणार आणि ती महाराष्ट्राची राजधानी राहणार नाही अशी शुद्ध अफवा जाणूनबुजून पसरवतात. नुकत्याच प्रकाशित झालेल्या संयुक्त मुलाखतीच्या पहिल्या भागातून हे पुन्हा एकदा दिसून आले. पण याबाबत वस्तुस्थिती अगदी उलट आहे.
 
एखादे मोठे शहर केंद्रशासित करण्याची कल्पना मुळात पंडित नेहरूंची होती, अशी माहिती आहे की, १९५६ मध्ये तसा आदेशसुद्धा काढण्यात आलेला होता; मात्र मुंबई केंद्रशासित करण्याचा आदेश निघाल्याचे कळताच मुंबईत प्रचंड असंतोष पसरला. या निर्णयाच्या विरोधात मुंबईतले कामगार एकत्र येऊन त्यांनी प्रचंड मोठा मोर्चा काढला. त्यावेळी मुंबई ही विशाल द्विभाषिक राज्याची राजधानी होती. त्या राज्याचे नाव बॉम्बे प्रोव्हिन्स असे होते. तिच्या संबंधात काढण्यात आलेल्या या आदेशाच्या विरोधात निघालेल्या मोर्चावर मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाई यांनी गोळीबार केला. त्यात १०५ जण हुतात्मा झाले.
 
१९८५ मध्ये महानगरपालिकेची निवडणूक होत असताना मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना मुंबईचा महापौर मराठी भाषिक असावा असे मनोमन वाटत होते; परंतु एकंदर राजकीय परिस्थिती एखाद्या अमराठी महापौर होईल अशी होती. कारण, मुंबई महापालिकेत काँग्रेसचे बहुमत होते. राजीव गांधींचे खास मुरली देवरा यांची पुन्हा वर्णी महापौरपदी लागू शकते म्हणून वसंतदादांनी ऐन मतदानाच्या एक-दोन दिवस आधी मुंबईला केंद्रशासित करण्याचे प्रयत्न केंद्रात सुरू आहेत, अशी अफवा हवेत सोडून दिली. तिचा फायदा शिवसेनेला झाला. हे लक्षात आल्यापासून शिवसेनेने प्रत्येक निवडणुकीत या अफवेचा पुरेपूर वापर केल्याचे दिसतेय.
 
मुंबई केंद्रशासित होणार ही अफवा पसरूनसुद्धा उबाठाला महापालिकेत कधी स्पष्ट बहुमत देखील मिळालेले नाही. परंतु झालाच तर काहीतरी फायदा होत असतो, याची कल्पना उद्धव ठाकरेंना आहे म्हणून ते प्रत्येक निवडणुकीत या अफवेचा आधार घेत आलेत असेच दिसून येते.
 
हेही वाचा : Palika Election 2026: अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसच्या निलंबित १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश
 
बेळगाव, निपाणी कारवार हा भाग केंद्रशासित करण्याची मागणी ठाकरेंचीच!
 
बेळगाव, निपाणी कारवार हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत केली होती. "बेळगाव प्रश्न सोडवणार कोण? तुम्ही ठराव मांडणार आहात, पण हा ठराव नेमका काय असणार आहे, त्याचं शब्दांकन केलंय का? माझं मत आहे, जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, तोपर्यंत हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित झालाच पाहिजे. हा ठराव आपण केला पाहिजे आणि ही मागणी आपण विधिमंडळाकडून केंद्र सरकारकडे पाठवली पाहिजे", असे उद्धव ठाकरे तेव्हा म्हणाले होते. बेळगावविषयी त्यांची इतकी तळमळ ते स्वतः मुख्यमंत्री असताना मात्र कधीच दिसली नाही.
 
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे काँग्रेसी मनसुबे उघड!
 
बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचे असेल तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी कर्नाटकातील काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी केली होती. महाराष्ट्रातील नेत्यांवर सवदी यांनी निशाणा साधताना बेळगावचा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वीही सवदी यांनी ही मागणी केली होती.
 
'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करणार...' हा उबाठाचा प्रचार मंत्र अत्यंत हास्यास्पद आहे. कारण महानगरपालिकेत कोणाची सत्ता येते यावरून मुंबईला स्वतंत्र करणार हे ठरवता येत नाही. मुळात नेहरूंनी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केलेला. त्याच नेहरूंच्या काँग्रेस पक्षासोबत ठाकरेंचा उबाठा पक्ष मांडीला मांडी लावून बसलाय. त्यामुळे निवडणुका आल्या की मराठी जनतेसमोर 'मुंबईला वेगळे करणार...' हा उबाठाचा युक्तिवाद बालीश स्वरूपाचाच म्हणावा लागेल.
 
- ॲड. अनिकेत निकम, प्रवक्ते, भाजप महाराष्ट्र
 
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक