गीतासार- भाग १

    08-Jan-2026
Total Views |
Mahabharata
 
लेखको भारतस्यास्य भव त्वं गणनायक|
मयैव प्रोच्यमानस्य मनसा कल्पितस्य च॥
(व्यासरचित महाभारत आदिपर्व १/७७)
 
अर्थ - माझ्या मनाच्या अत्युच्च अवस्थेत म्हणजे समाधी अवस्थेत मला जे ज्ञान प्राप्त झाले, त्याचे मी महाभारतरूपाने प्रकटीकरण करीत आहे. ते लिहिण्याकरिता हे गणनायका, तुम्ही माझे लेखक व्हा.
 
ॐ नमोजी आद्या| वेदप्रतिपाद्या|
जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा॥अ.१, ओवी १ ज्ञानेश्वरी॥
 
अर्थ - वेदांद्वारे प्रतिपादन केलेले विश्वाचे जे आद्यस्वरूप आहे आणि जे साधकाला साधनेद्वारे प्रतित होते, त्या आत्मस्वरूपाला मी वंदन करतो.
 
एथ श्रवणाचेनि पांगे| वीण श्रोतेया होआवे लागे|
हे मनाचेनि निजांगे| भोगिजे गा॥अ.६, ओवी २४ ज्ञानेश्वरी॥
 
अर्थ - अहो, माझे हे गीतानिरूपण हस्तगत करून त्याद्वारे आत्मानंद मिळवायचा असेल, तर श्रोत्यांनी त्यांनी आजपर्यंत ऐकलेल्या गीताशास्त्राचे अध्ययन करून आम्ही जो अर्थ काढून स्वतःच्या जीवनाचे पांग फेडल्याचे जे त्यापूर्वी मानीत आले आहेत, त्यांनी त्या धन्य वाटणार्‍या तथाकथित विचारांपासून मुक्त झाले पाहिजे. म्हणजेच आपल्या देहबुद्धीला आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे, तरच माझ्या या गीतार्थाचा त्यांना योग्य आशय कळून ते ब्रह्मसुखात रममाण होऊ शकतील.
 
भगवान वेदव्यासांनी लिहिलेल्या आध्यात्मिक व नीतिशास्त्रावरील श्रीमद्भगवद्गीता या जागतिक कीर्तीच्या ग्रंथावर सहस्रावधी पुस्तके लिहिली गेली आहेत. पांडवांना, त्यांच्या न्याय राज्याचे हरण करून परत १३ वर्षांपर्यंत अरण्यवासात ठेवणार्‍या अन्यायी कौरवांविरुद्ध लढणार्‍या, पांडवातील वीर पुरुष अर्जुन याला भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला. तो उपदेश म्हणजेच भगवद्गीता होय, असे गीतेवरील बर्‍याचशा भाष्यकारांचे मत दिसून येते. भगवद्गीता केवळ हिंदूंचाच अध्यात्म नीतिग्रंथ नाही. तर, उत्क्रांत पूर्णत्वाकडे वाटचाल करणार्‍या प्रत्येक गंभीर प्रवृत्त मानवाकरिता, गीता ही अमर ग्रंथसंहिता ठरते.
 
गीता हे आध्यात्मिक नीतिशास्त्र
 
त्यांच्याच धर्मग्रंथातील वचनांना ते चिकटून राहिल्यास त्या ग्रंथाच्या अनुयायांचेच फक्त चिरकल्याण होईल, असा उपदेश इतर धर्मग्रंथांतून वारंवार केला जातो. याउलट गीता मानणार्‍यांनाच गीता उत्तम वैदिक अथवा उत्तम हिंदू म्हणते, असे एकही वचन गीतेत आढळणार नाही. त्याचे कारणही स्पष्ट आहे. गीता कोणत्याही पंथविशेष अथवा कथित धार्मिक श्रद्धांकरिता लिहिला गेलेला ग्रंथ नाही. आज ज्याप्रमाणे सर्वत्र इंग्रजी भाषेचे प्रभुत्व दिसून येते, तद्वत् गीता लिहिल्या गेलेल्या काळात सर्व जगताची संदर्भ भाषा संस्कृत असल्यामुळे, गीतेची भाषा संस्कृत आहे. कोणत्याही देशाने स्वीकारलेल्या नीती अथवा धार्मिक श्रद्धांचा परमोच्च आदर्श, त्या देशांच्या भाषांमध्ये गीतेचा अनुवाद केल्याने मिळू शकेल.
 
आपल्या पंथविशेषात स्वीकारलेल्या नामाभिधानाव्यतिरिक्त, इतर ग्रंथांत आलेल्या नामाभिधानाचा स्वीकार न करू इच्छिणार्‍या असहिष्णु वृत्तीच्या लोकांना गीतेतील श्रीकृष्ण, अर्जुन इत्यादी नामे परकीय अथवा परधर्मीय वाटतील. परंतु, इतर पंथविशेषांनी स्वीकारलेल्या शाब्दिक संहितेसारखी गीतेत वर्णन केलेली श्रीकृष्ण, अर्जुन, धृतराष्ट्र अथवा दुर्योधन ही नावे, पंथविशेषाचे विलगीकरण दाखविण्यासाठी मुद्दाम तयार केलेली नामाभिधाने नाहीत. ज्या मानवांना स्वतःच्या आणि मानव समाजाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीकरिता गंभीरपणे प्रयत्न करायचा आहे, अशांकरिता दिव्य अध्यात्म योगशास्त्रातील अत्यंत शास्त्रीय शब्दरचना गीतेत केलेली आहे. इतर जडविज्ञानशास्त्रात वापरलेल्या इंग्रजी वा तत्सम शब्दरचनांना जसा कोणत्याच देशाचा अथवा पंथविशेषाचा विरोध नसतो, तद्वत् अध्यात्म योगविज्ञानशास्त्रांना व्यवस्थित समजाण्याकरिता गीतेत वापरलेल्या शब्दांना विरोध असता कामा नये.
 
गीतेची गुरुकिल्ली - गणेशकथा
 
भगवान वेदव्यासांनी लिहिलेल्या महाभारतातील सारसर्वस्व म्हणजे श्रीमद्भगवद्गीता होय. महाभारतातील अगदी पहिल्याच कथेमध्ये, महाभारताचे आणि पर्यायाने गीतेचे सत्यस्वरूप समोर येते. कागद आणि छापखाने यांचा अभाव असलेल्या त्या काळात, ताडपत्रावर कोरून लिहिणे हे कष्टदायक काम होते. महाभारतासारख्या महाकाव्याची रचना करण्यासाठी व्यासांना एखाद्या लेखकाची आवश्यकता होती. महाभारत लिहिण्याकरिता भगवान वेदव्यासांनी प्रत्यक्ष परब्रह्म अशा श्रीगणेशांनाच विनंती केली. श्रीगणेशांनी व्यासांची विनंती मान्य केली; परंतु त्यांच्या एका अटीवर! महाभारत लिहिताना श्रीगणेश मुळीच थांबणार नाहीत. महाभारतातील श्लोक तयार करताना, व्यासांना अवधी लागल्यास गणेश आपले लिहिणे बंद करतील.
 
व्यासांनी श्रीगणेशांची अट मान्य केली; परंतु त्यावर आपली एक प्रतिअट त्यांनी श्रीगणेशांना सांगितली आणि ती म्हणजे, व्यासकृत महाभारतातील श्लोकाचे खरे ज्ञान झाल्याशिवाय गणेशांनी पुढचा श्लोक लिहू नये. अटी परस्पर मान्य झाल्या आणि महाभारत लिहिण्यास सुरुवात झाली. पहिल्या श्लोकात श्रीगणेशांची स्तुती असल्यामुळे त्याचा आशय समजण्यास गणरायांना वेळ लागला नाही; परंतु दुसर्‍या श्लोकापासून श्लोकांचा खरा आशय समजण्यास प्रत्यक्ष ज्ञानबुद्धीची देवता असलेल्या श्रीगणेशांना अडचण उत्पन्न होऊ लागली. श्रीगणेश ही दिव्य देवता मानवाचे जडशरीर धारण करून व्यासकृत महाभारतातील श्लोक लिहू शकते काय, हा प्रश्न बाजूला ठेवल्यास एक प्रश्न असा उत्पन्न होतो की, ज्या महाभारताचा अर्थ त्यातील श्लोक उच्चारल्याबरोबर आबालवृद्धांना आजसुद्धा एकदम लक्षात येतो, त्या महाभारताच्या श्लोकांचा सत्याशय प्रत्यक्ष ज्ञानविज्ञानमूर्ती दिव्य देवता अशा श्रीगणेशांना समजू नये काय? याचा खरा अर्थ असा की, व्यासांना त्यांच्या श्रोत्यांना या कथेद्वारे असे सूचवायचे आहे की, व्यासकृत श्लोकांचा खरा आशय श्रीगणेशांच्या समाधी अवस्थेच्या उच्च ज्ञान-बुद्धीस्तरावर स्वतःला नेल्याशिवाय कळणार नाही.
 
महाभारत आणि पर्यायाने गीतेतील खरा आशय आम्ही बाह्यतः लावतो, तसा नसून त्यापेक्षा खोल विचारांती प्राप्त होणारा आहे. हाच वरील गणेशकथेचाही आशय आहे. महाभारत आणि गीतेतील गुह्य ज्ञानविज्ञान समजण्याकरिता, आम्हाला योगशास्त्राच्या गूढ उच्च-उच्चतर पायर्‍या चढणे आवश्यक आहे.
 
लेखको भारतस्यास्य भव त्वं गणनायक|
मयैव प्रोच्यमानस्य मनसा कल्पितस्य च॥
 
या श्लोकाचा आशय असा आहे की, माझ्या मनाच्या अत्युच्च अवस्थेमध्ये म्हणजे समाधी अवस्थेत मला जे ज्ञान प्राप्त झाले, त्याचे मी माझ्या लोकांकरिता महाभारतरूपाने प्रकटीकरण करीत आहे. ते लिहिण्याकरिता हे गणनायका, तुम्ही माझे लेखक बना. वरील श्लोकात व्यास स्पष्टपणे सांगतात की, महाभारत ग्रंथ व्यासांच्या श्रेष्ठ अशा समाधी अवस्थेतील प्रकटीकरण आहे. ती संकल्पना गणरायांना ते लिहायला सांगतात. महाभारत आणि गीतेतील गुह्य ज्ञानविज्ञान समजण्याकरिता, आम्हाला गूढ योगशास्त्राच्या उच्च-उच्चतर पायर्‍या चढणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने गीतेतील अगदी पहिल्या श्लोकापासून, व्यासआशय समजण्याचा प्रयत्न पुढील लेखापासून आपण करूया.
 
- योगिराज हरकरे