महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं
स्थितं स्वधिष्टाने हृदि मरुतमाकाशमुपरि|
मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्वा कुलपथं
सहस्रारे पद्मे स हरहसि पत्या विहरसे॥९॥
मागील लेखात आपण कुंडलिनीचा प्रवास मणिपूरचक्रातून आज्ञाचक्रात होताना विष्णुग्रंथीभेदन होते, इथपर्यंत समजून घेतले होते. आज आपण पुढचे विवेचन समजून घेणार आहोत.
श्री ललिता सहस्रनाम श्लोक क्रमांक ३९
आज्ञाचक्रांतरालस्था रुद्रग्रंथी विभेदिनी|
सहस्रामबुजारूढा सुधासाराभिवर्षिणी॥३९॥
नाम क्रमांक १०३ : आज्ञाचक्रांतरालस्था
शब्दार्थ : आज्ञाचक्र हे षड्चक्रांतील शेवटचे चक्र आहे. या चक्राचे नियंत्रण साधकाच्या गुरूकडे असते आणि येथूनच गुरू साधकाला मार्गदर्शन करत असतो, आज्ञा करत असतो. पहिल्या पाच चक्रांत साधकाला पंचमहाभूत तत्त्वांच्या पूर्ण स्वरूपाचे ज्ञान होते. आज्ञाचक्राचे नियंत्रण मनाकडे असते. मन हा ज्ञानकारक अवयव आहे. आज्ञाचक्रामध्ये शिव हा शक्तीचा पालनकर्ता या रूपात आहे. त्याच्या सभोवताली पराचित्त आहे. इथे शक्ती शिवासह सहस्र, चंद्र-सूर्यांच्या प्रकाशासमान तेजस्वी आहे. या नामाचा अर्थ शिव आणि शक्तीची एकत्र स्वरूपात आज्ञाचक्रात, अर्थात मनात उपासना करणे असाच होतो.
नाम क्रमांक १०४ : रुद्रग्रंथी विभेदिनी
शब्दार्थ : आज्ञाचक्रातून सहस्रार चक्रात जाताना कुंडलिनी जी शेवटची ग्रंथी भेदते, ती रुद्रग्रंथी. रुद्रग्रंथीचा भेद करून, श्री ललिता त्रिपुरसुंदरी सहस्रार चक्रात शिवाशी एकरूप होण्यास जाते.
भावार्थ : श्री ललिता त्रिपुरसुंदरीच्या ज्या तीन कुटांचा उल्लेख केला जातो, ते तीन कूट इथे संपतात. प्रत्येक कुटाच्या शेवटी ती एकेका ग्रंथीचा भेद करून पुढे जाते. पंचदशाक्षरी मंत्र इथे पूर्ण होतो. तिन्ही कूट पूर्ण होतात. देवीच्या सूक्ष्म आणि सूक्ष्मातिसूक्ष्म स्वरूपाचे वर्णनही इथे संपते. सहस्रार चक्रातील शिवाशी मिलन, हे या चेतनेचे साध्य आहे. या षड्चक्रांचा भेद करताना, प्रत्येक टप्प्यावर ती अधिकाधिक प्रसन्न होत साधकाला विविध सिद्धी प्रदान करत असते. प्रत्येक ग्रंथीच्या भेदनाच्या टप्प्यावरही ती साधकावर कृपा करत असते. आता तिचे साध्य तिच्या दृष्टोत्पत्तीस आलेले आहे, त्यामुळे ती हर्षभरीत आहे. या टप्प्यावर ती साधकाच्या सर्व इच्छांची पूर्तता करते.
नाम क्रमांक १०५ : सहस्रामबुजारूढा
शब्दार्थ : सहस्रार चक्रात पोहोचलेली शुद्ध चेतना श्री ललिता त्रिपुरसुंदरी, पती शिवाशी एकरूप होते. सहस्रार चक्र हे ब्रह्मरंध्राच्या थोडेसे खाली असते. ब्रह्मरंध्रातून प्राण प्रवेश आणि निर्गमन करतो. ब्रह्मरंध्र जीवात्म्याला विश्वाशी जोडून ठेवते. साधकाने मूलाधार चक्रात स्थित असणार्या श्री ललिता त्रिपुरसुंदरीला, उपासना मार्गाने जागृत करत सहस्रार चक्रापर्यंत पोहोचवले आहे. आता तो सहस्रार चक्रात शिवशक्ती या ऐयरुपात तिची उपासना करत आहे. त्याच्या शरीरातील हे निर्गुण-सगुण ब्रह्माचे ऐयरूप आहे. या उपासनेस पात्र होऊन साधक, वैश्विक पातळीवरील शुद्ध चैतन्याशी ऐय अनुभवतो.
याचा दुसरा अर्थ असा की, संस्कृत वर्णमालेमध्ये ५० मुळाक्षरे आहेत. (ळ हे ५१वे) आणि २० गुण (पंचमहाभूते, पाच कर्मेंद्रिये, ाच ज्ञानेंद्रिये आणि पंचतन्मात्रा) यांचा गुणाकार म्हणजे एक सहस्र. या एक हजार पटलांचेच हे सहस्रार चक्र बनले आहे! शिवशक्तीचे एकरूप अवस्थेत सहस्रारामध्ये ध्यान करणारा साधक, हा मुक्ती मिळवण्यास पात्र होतो.
नाम क्रमांक १०६ : सुधासाराभिवर्षिणी
शब्दार्थ : सहस्रार चक्रामध्ये सोमचक्र असते. ज्यावेळी कुंडलिनी सहस्रार चक्रात पोहोचते, त्यावेळी तिच्या अस्तित्वाने तिथे उष्णता निर्माण होते आणि तेथील अमृत वितळून, साधकाच्या घशात आणि तेथून त्याच्या सर्व चेता तंतूंमध्ये पोहोचते. हे अमृतच साधकाचे भरण-पोषण करते. हे अमृत प्राशन करून, साधक दीर्घायु आणि निरोगी होतो.
तडिल्लतासमरुचिः षट्चक्रोपरि संस्थिता|
महासक्तिः कुंडलिनी बिसतंतू तनीयसी॥४०॥
नाम क्रमांक १०७ : तडिल्लता समरुचिः
शब्दार्थ : शिवाशी एकरूप झालेली शक्ती, आता एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे तेजस्वी आणि चैतन्यपूर्ण भासत आहे. कुंडलिनी शक्तीचे या पद्धतीचे वर्णन तिच्या मूलाधार ते सहस्रार चक्रातील प्रवासात आतापर्यंत केले नव्हते; कारण ती एकटी होती. ती मूर्तिमंत चेतना होती. पण त्या चेतनेमध्ये विजेप्रमाणे असणारे सामर्थ्य, तिचे शिवाशी एकत्व झाल्याने निर्माण झाले. कुंडलिनी ध्यान आणि उपासनेच्या प्रगत अवस्थेमध्ये, साधकाला त्याचा संपूर्ण पाठीचा कणा एखाद्या विजेच्या लोळाप्रमाणे अत्यंत तेजस्वी, लकाकता आणि उष्ण झाल्याची जाणीव होते. शिवाशी एकरूप होऊन, मग कुंडलिनी शक्ती त्याच्या शरीरातून मूर्तिमंत चेतना होऊन नर्तन करू लागते. साधकही संपूर्ण शरीरात ती दिव्य अनुभूती व्यापून असल्याचे अनुभवतो.
‘केनोपनिषदा’त वर्णन केल्याप्रमाणे, ती एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे चमकते आणि अज्ञानाचा अंधःकार दूर करून, ज्ञानाचा प्रकाश साधकाच्या चित्तात निर्माण करते. विद्युल्लता म्हणजे वीज, ती केवळ क्षणभर लकाकते; परंतु श्री ललितादेवी मात्र साधकाच्या चेतनेत सतत प्रकाश स्वरूपात जागृत असते. शिव आणि शक्ती हे एकरूप आणि अत्यंत तेजस्वी अशा सहस्रार चक्रात स्थित आहेत, असा याचा अर्थ होतो. शिव हे निर्गुण ब्रह्म आहे आणि श्री ललिताम्बिका हे सगुण ब्रह्म आहे. एकरूप अवस्थेत ते संपूर्ण विश्वनिर्मिती आणि संचालन करण्यास समर्थ आहेत.
नाम क्रमांक १०८ : षट्चक्रोपरिसंस्थिता
शब्दार्थ : श्री ललितादेवी ही षड्चक्रांच्यासुद्धा पलीकडे आहे, असा या नामाचा अर्थ होतो. मानवी देहात षड्चक्रे मानली जातात. मूलाधार, मणिपूर, स्वाधिष्ठान, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञाचक्र या सहा चक्रांचे स्थान, मानवाच्या देहाच्या आतच असते. परंतु सातवे चक्र सहस्रार चक्र हे शरीराच्या बाहेर मस्तकाच्या थोडेसे वर आहे, असे मानले जाते. मूलाधारात स्थित असणारी शुद्ध चेतना साधकाने जागृत केल्यावर, पहिली सहा चक्रे भेदून सातव्या सहस्रार चक्रामध्ये तिच्या पती शिवाशी एकरूप झाली आहे. शिव आणि शक्ती एकरूप असताना ते पूर्णब्रह्म असतात. अर्थातच, ब्रह्मतत्त्व हे षड्चक्रांच्या पलीकडे आहे, असाच याचा अर्थ होतो.
नाम क्रमांक १०९ : महासक्तिः
शब्दार्थ : महा म्हणजे महोत्सव आणि आसक्ती म्हणजे आवड. श्री ललितादेवीला महोत्सवांची भरपूर आवड आहे, असा याचा अर्थ होतो. महोत्सव हा दोन प्रकारचा असतो, एक बाह्य आणि दुसरा अंतर्महोत्सव. महोत्सवाचा अर्थ तिचे शिवाशी होणारे मिलन आणि तिला होणारी एकत्वाची अनुभूती. त्यामुळे साधकाने तिची उपासना करून, जागृत करून तिला शिवासह सहस्रार चक्रात स्थित करणे, या प्रक्रियेची तिला आसक्ती आहे. जो साधक तिची या पद्धतीने अन्तोपासना करतो, त्यावर ती प्रसन्न होते आणि त्याची उपासना पूर्णत्वास नेण्यास साहाय्यदेखील करते. कारण, यातून तिलाही शिवाशी तादात्म्य पावता येणार आहे.
श्री ललिता त्रिपुरसुंदरीला ‘महामाया’ असे संबोधले जाते. सर्व सृष्टी ही तिचीच लीला असल्याचेही मानले जाते. ती मायापटल निर्माण करून, जीवात्म्याला जन्ममृत्यूच्या फेर्यात फिरवत ठेवते असे मानतात. परंतु, जो साधक अन्तोपासना मार्गाने तिचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला ती साहाय्य तर करतेच तसेच त्याला जन्ममृत्यूच्या फेर्यातूनही मुक्ती मिळवून देते. अर्थात, ही एका जन्मात साधणारी क्रिया नाही, परंतु तिच्या मार्गावर चालणे म्हणजे आत्म्याचा ऊर्ध्वगामी प्रवास सरू करणे आहे. ज्या क्षणी साधक हा प्रवास सुरू करतो, त्या क्षणी तो तिच्या कृपादृष्टीस पात्र होतो.
(देवीच्या कुंडलिनी स्वरूपाचे विवेचन यापुढील भागातसुद्धा सुरू राहणार आहे.)
- सुजीत भोगले