अशी ही बनवाबनवी...

    08-Jan-2026   
Total Views |
Raj Thackeray and Uddhav Thackeray
  
आम्ही दोघे एकमेकांचे तोंडही न बघणारे भाऊ भाऊ...
माहीत नाही किती काळ सोबत राहू!
पण, सत्तेत आलो तर मुंबई लुटून खाऊ!
 
अहं, छोटू असे म्हणायचे असते का? नाही, नाही! निवडणूक काळ सुरू आहे, आता कसे छानछान बोलायचे, मराठी-मराठी करायचे. ओके, ओके दादा; पण आता तो आपला ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार’ हा डायलॉग बोलायचा का नाही बोलायचा? त्याचे काय आहे ना, आपल्या पोरांना ‘सेट’ करायचे आहे. आता मुंबई महानगरपालिका जिंकलीच पाहिजे. अरे छोट्या, होईल... होईल. यंदा आपल्या सोबत आपले ते नवे मतदार आहेतच. दादा, तू दिल्लीवाल्यांसोबत राहून त्यांचे हक्काचे मतदार स्वतःकडे वळवलेस. अरे, मग त्यात काय इतके? काही वर्षांपूर्वी तुझे पण नगरसेवक फोडलेच होते ना? दादा, आता असे बोलायचे नाही. आपण दोघे लाडके भाऊ-भाऊ दिसलो पाहिजे.
 
दादा माझ्या मनात खंत आहे. तुझ्या पोरोला इतकी कसली रे अकड? सरळ आमच्या पक्षाबद्दल म्हणाला होता, ‘संपलेल्या पक्षाबद्दल मी काही बोलत नाही.’ हे बघ छोट्या, त्याचे सोड, तू तर मोठा होतास ना? तू काय म्हणाला होतास, ‘आपून ने एक ही मारा मगर सॉलिड मारा.’ अरे दादा, जाऊ दे. मागे काय घडले सगळे विसरूया. तुझ्या-माझ्या मुलांना नेता बनवण्यासाठी लोकांसमोर एकत्र राहावे लागेल. हिंदू आणि त्यात मराठी आलेच, ते सगळे ‘कमळा’ला जिंकून देताना मागे दिसले होते. तुझ्या त्या काँग्रेसकडून पळवलेल्या मतदारांनाच आपण खूश करायचे का? दादा, आपण आता टोपी घालूया का? पण, दाढी वाढवणार नाही हं मी. इथे सकाळी उठायची बोंबाबोब आणि ती दाढीची निगा कशी राखणार? छोट्या बघ, जिंकण्यासाठी जे करता येईल; ते करायचे. बघ, मी अडीच वर्षे घरात बसून फक्त ‘फेसबुक लाईव्ह’ करायचो. माझा उजवा हात माझी मुलाखत घ्यायचा. पण, आता तो एकटा मुलाखत घेत नाही, तर दोघेजण आपल्या दोघाजणांची मुलाखत घेतील. केला ना मी बदल? अरे बाबा, बदल करावा लागतो. हो दादा, बरोबर बोललास. मला कुठे तुझ्याकडे यायचे होते; पण आलोच ना? अरे छोट्या, असे बोलू नकोस. निदान निवडणुकीपर्यंत तरी एकत्र आहोत असे दाखवूया. दादा, ते गाणे बोलूया का रे? ‘बनवाबनवी अशी ही बनवाबनवी!
 
मुंबईच्या सत्तेची चावी...
 
मुंबई आणि मुंबईकरांना काय हवे आहे, हे तिथे जन्माला आल्याशिवाय कळत नाही,” इति राज ठाकरे. राज ठाकरेंचे विधान सत्य आणि तार्किकतेच्या कसोटीवर पाहिले, तर धांदात खोटे आहे. कारण, राज ठाकरेंचे म्हणणे खरे मानायचे, तर मग काही वर्षांपूर्वी त्यांनी नाशिक शहराच्या विकासाची ‘ब्लू-प्रिंट’पण काढायचे ठरवले होते. त्यावेळी राज ठाकरे नाशिकच्या समस्यांवर, उपायांवर बोलायचे. पण, ते तर नाशिकमध्ये जन्मले नाहीत. मग, नाशिकच्या समस्या त्यांना कशा समजल्या? कारण, राज ठाकरेंच्या मते, शहराच्या समस्या केवळ त्या शहरात जन्म घेतलेल्यांना समजत असतील; तर राज ठाकरेंचा जन्म नाशिकमध्ये तर नक्कीच झाला नाही. मग, नाशिकच्या समस्यांबद्दल राज ठाकरे कसे काय बोलायचे?
 
दुसरे असे की, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलांचा जन्म मुंबईतच झाला असणार. मग, या चौघांना केवळ मुंबईच्या समस्यांबद्दल समजते का? राज ठाकरेंचे बोलणे प्रमाण मानले, तर महाराष्ट्रातील उर्वरित शहरांबद्दल ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नागपूर वगैरे इतर शहरांच्या समस्यांबद्दल या ठाकरे बंधूंना काहीच समजत नसावे. कारण, ते काही या शहरामध्ये जन्मलेले नाहीत. असो. हे सगळे राज ठाकरेंच्या विधानावरचे तर्क-वितर्क आहेत. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेच आहेत. पण, मराठी माणूस काय महाराष्ट्रात, तेही फक्त मुंबईतच राहतो? आणि आम्ही मराठी माणसे काय केवळ निवडणुकीपुरताच प्रकट होतो की काय? कारण, निवडणूक आली की, त्याच्यापूर्वी काही महिन्यांआधी मराठी माणूस, मुंबई, महाराष्ट्र वगैरे... वगैरेबद्दल हे दोघे भाऊ बोलायला सुरुवात करतात. निवडणुकीचा काळ सोडला, तर हे दोघे मराठी माणसाचे काय भले करतात; हा संशोधनाचा विषय आहे. अनेक दशके ठाकरे हे मुंबईत सत्ताधारी भूमिकेत होते, तरीसुद्धा आजही मुंबईत मराठी माणसाच्या नावाने हे रडतात. कुणी तरी सांगा रे यांना; मराठी माणूस सक्षम आहे, धर्म-कर्म आणि देशाशी निष्ठावान आहे. त्याला विकास पाहिजे. त्यामुळे मुंबईकरही मुंबईचा विकास करणार्‍यांच्या हातातच सत्तेची चावी देणार.
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.