मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईच्या पर्यावरणाच्या झालेल्या भीषणतेचे दर्शन लोकप्रतिनिधींनीच नागरिकांना करून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या 'मुंबईच्या पर्यावरणाचा पंचनामा' चर्चेत सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी केले (mumbai climate). या चर्चेत 'विवेक पार्क फाऊंडेशन'च्या (वीपीएफ) 'एन्व्हायरमेंट अॅन्ड सस्टेनेबिलिटी डेव्हलमेंट डिव्हिजन'च्या हेड अमरजा कुलकर्णी आणि 'वातावरण फाऊंडेशन'चे संस्थापक भगवान केसभट हे सहभागी झाले होते (mumbai climate). कुलकर्णी यांनी मुंबईच्या घनकचरा व्यवस्थापनाचा, तर केसभट यांनी हवा प्रदूषणाचा सविस्तर उहापोह केला (mumbai climate). प्रदूषणाच्या या दोन्ही समस्या वॉर्डनिहाय वेगवेगळ्या असून त्यांच्या निरसणाच्या उपाययोजना या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्या-त्या स्तरावर करणे, आवश्यक असल्याचे मत या दोन्ही तज्ञांनी माडंले. (mumbai climate)
मुंबईच्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनावर बोलताना कुलकर्णी म्हणाल्या की, “आकडेवारीनुसार मुंबईत दररोज सात ते साडे सात हजार मॅट्रिक टन घनकचरा निर्माण होतो. प्रति माणशी ५०० ते ६०० ग्रॅम कचरा प्रतिदिवशी तयार होतो. सध्या मुंबईत राहणारी मूळ लोकसंख्या आणि काही कालावधीसाठी येणारी लोकं यांचा विचार करता पालिकेच्या कचरा व्यवस्थापनाची सुविधा अपुरी पडणारी आहे. सद्यस्थितीत मुंबईत घनकचऱ्याचे संकलन, वाहतूक आणि डंम्पिंग या तीन गोष्टींवरच भर असून या तिन्ही पद्धतींव्यक्तिरिक्त आपल्या व्यवस्थापनामध्ये काय बदल करता येईल, याचा नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.” तर केसभट यांनी सांगितले की, “लाॅकडाऊननंतर मुंबईच्या हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर खालावल्याचे आपल्या लक्षात येते. मुंबईच्या हवेत नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर आॅक्साइड अशी मानवी आरोग्यास घातक असणारी तत्व आहेत. जी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण आखून दिलेल्या मानकांमध्ये न बसणारी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आखून दिलेल्या तत्त्वांनुसार मुंबईच्या हवा ही चांगल्या स्वरुपाची नाही. अंधेरी,बीकेसी,विमानतळ परिसर,चेंबूर आणि माझगाव या भागात हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावलेली दिसते. हे परिसर हवेच्या प्रदूषणाचे हाॅटस्पाॅट आहेत. बोरिवली आणि अंधेरी पूर्व-पश्चिम या भागात बांधकाम मोठ्या स्तरावर सुरू आहे. त्यामुळे त्याठिकाणीच हवेची गुणवत्ता गेल्या तीन वर्षात खालावल्याचे आमच्या अभ्यासानुसार लक्षात आले आहे. सद्यपरिस्थितीत मुंबईत हवेच्या गुणवत्तेची पातळी बांधकामामधून निघणाऱ्या धूळीमुळे मोठ्या प्रमाणावर खालावत आहे. त्यानंतर वाहतूक आणि उद्योग यांमुळे खालावत आहे. महानगर पालिकेने बांधकामांच्या ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचे मापन करणारी यंत्र बसवली आहेत. मात्र, पालिकेने प्रसिद्ध केलेल्या २८ मार्गदर्शक तत्वांचे पालन त्याठिकाणी काटेकोर होत आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. नागरिकांनीही त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”
कचरा
- रेल्वे रुळावर पडलेला प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यासाठी मेगा ब्लाॅकच्या वेळीस कचरा वेचकांना वेचण्याची मुभा दिल्यास अथवा त्या काळात पालिकेला हाताशी धरुन तो कचरा उचलल्यास त्यातून पूरपरिस्थितीवेळी रुळावर पाणी साठण्याची समस्या टाळता येईल.
- मुंबईमध्ये कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न हे प्रत्येक वाॅर्डनुसार निरनिराळे आहेत.
- स्थानिक लोकप्रतिनिधींनी ते प्रश्न ओळखून, त्यामधील समस्या जाणून, त्यांच्या उपाययोजनांसाठी त्या-त्या पातळीवर काय करता येईल, हे समजून घेणे गरजेचे आहे.
- नागरिकांमधील काही प्रतिनिधींना स्थानिक लोकप्रतिनिधींनी कचराभूमीवर एक फेरफटका मारुन तिथली भिषणता आणि कचऱ्याच्या समस्येची जाणीव करुन द्यावी.
- प्रत्येक नागरिकांनी कचरा टाकताना आपण कुठे काय टाकतो आणि त्याचे पुढे काय होणार आहे याचा गांभिर्याने विचार करावा.
- कचरा विभाजनाच्या आपल्या जबाबदारीचे अवलोकनही नागरिकांनीही त्रयस्तरित्या करणे गरजेचे आहे.
हवा प्रदूषण
- इलेस्ट्रिक वाहनांना वाहतूक व्यवस्थेत कसा लाभ मिळवून देता येईल याकडे लक्ष देणे.
- खासगी गाड्यांचे प्रमाण आपल्याला कसे कमी करता येईल, याकडे लक्ष देणे.
- १५ वर्षांपूर्वीच्या बीएस३ आणि बीएस२ या गाड्यांच्या वाहतूकीवरील निर्बंधाकडे लक्ष देणे.
- हवा प्रदूषणाच्या हाॅटस्पाॅटच्या ठिकाणी प्रदूषण करणाऱ्या गाड्यांच्या वाहतूकीवर बंदी घालणे.
-उद्योगांच्या ठिकाणी सल्फर खेचून घेणारी केंद्र तयार करणे.
सूचना देणारी यंत्रणा निर्माण करणे
हवेच्या गुणवत्ता खालवण्यास कारक असणारे पीएम१०, पीएम२.५ आणि पीएम१ हे धूलीकण अतिसूक्ष्म आहेत. आपल्या डोक्यावरील छोट्या केसावर पीएम२.५ चे २० ते २५ धूलीकण बसू शकतात. तर पीएम१ चे धूलीकण हे शरीरात शिरुन प्रत्येक अवयवामध्ये शिरकाव करतात. अशा परिस्थितीत आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यापद्धतीने हवामान विभाग हवामानाची स्थिती सांगणारे ओरेन्ज किंवा रेड अलर्ट जारी करते, तसेच पालिकेने मुंबईतील हवा प्रदूषणाची सूचना देणारे अलर्ट सांगणे अपेक्षित आहे. बांधकामाठिकाणी झिरो-डस्ट गाईडलाईन निर्माण करुन देणे गरजेचे आहे. बांधकाम ठिकाणाहून बाहेर पडणाऱ्या वाहनांची आणि त्याठिकाणांची वारंवार स्वच्छता करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे काही कठोर कारवाई करण्याची गरज आहे. – भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाऊंडेशन