मुस्लीम महापौरांचे महाप्रताप

    08-Jan-2026   
Total Views |
Muslim Mayors
 
सध्या महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा जोरदार धुरळा उडालेला दिसतो. पण, महाराष्ट्रच नाही; तर अगदी सातासमुद्रापारही काही महापौरांच्या निवडणुका यंदा चर्चेचा विषय ठरल्या. न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांची निवडणूक तर प्रचार आणि निकालानंतर सर्वाधिक चर्चेत राहिली. त्यातच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांनी ‘ठाकरे सत्तेत आले, तर मुंबईचा महापौर खान होणार’ या भूमिकेमुळे यंदाच्या निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले. पण, साटम यांनी व्यक्त केलेली भीती ही अनाठायी नक्कीच नाही. कारण, पाश्चिमात्य राष्ट्रांत मुस्लीम वंशाच्या महापौरांमुळे त्या शहराचे लोकसंख्यात्मक स्वरूपच पालटल्याचे चित्र दिसून येते.
 
सादिक खान महापौर असलेल्या लंडनला, तर आज लाहोेरचे स्वरूप प्राप्त झाले. याला केवळ शहराचा महापौरच नव्हे, तर त्या-त्या देशाची स्थलांतरितांना स्वीकारण्याची उदारमतवादी वृत्तीही तितकीच कारणीभूत. आज केवळ युकेच नव्हे, तर या मुस्लीम स्थलांतरितांना आश्रय दिलेल्या कित्येक युरोपीय देशांमध्येही कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती. त्यामुळे म्हणावे लागते की, ‘स्थलांतरितांना दिली ओसरी, स्थलांतरित आता हात-पाय पसरी.’ याचाच प्रत्यय अमेरिकेतही नुकताच आला. मॅसॅच्युसेट्स राज्यातील केंब्रिज शहराच्या महापौरपदी मूळच्या पाकिस्तानी वंशाच्या सुंबुल सिद्दीकी तिसर्‍यांदा निवडून आल्या.
 
सुंबुल सिद्दीकी या मूळच्या पाकिस्तानमधील कराचीच्या. पण, पालकांनी अमेरिकेत बस्तान बसवल्यामुळे वयाच्या अवघ्या दुसर्‍या वर्षीच त्या केंब्रिज शहरात दाखल झाल्या. तिथेच शिक्षणही झाले. पण, विद्यापीठात असल्यापासूनच राजकारणाकडे त्यांचा ओढा होता. मग काय, २००२ साली त्यांनी ‘केंब्रिज यूथ कौन्सिल’चीही स्थापना केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, हा वरकरणी त्यामागचा उद्देश. सार्वजनिक धोरण, कायद्याचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर सिद्दीकी ‘नॉर्थईस्ट लीगल एड’मध्ये सामील झाल्या, जिथे त्यांनी सामुदायिक विकास आणि उद्योजकता नेतृत्वाकडे लक्ष केंद्रित केले.सिद्दीकी यांनी स्थानिक उद्योजकांना आणि लहान व्यवसायांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान केल्या. लहान व्यावसायिकांना सामान्य कायदेशीर समस्यांशी संबंधित सल्ला देण्यासाठी सामुदायिक संस्थांशीही त्या जोडल्या गेल्या.
 
आता हे ‘स्थानिक उद्योजक’, ‘सामुदायिक संस्था’, ‘कायदेशीर समस्यांवर समाधान’ हे सगळे नेमके कुणासाठी, हे वेगळे सांगायची गरजच नाही. २०१८ साली वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवण्यासाठीही त्यांनी विविध चर्चासत्रे आयोजित केली. एवढेच नाही, तर २०१८ आणि २०१९ साली केंब्रिज शहरात ‘रमजान’निमित्ताने इफ्तार पार्ट्यांचाही घाट घातला. २०२० साली त्या महापौरपदी निवडून आल्या आणि आता हा त्यांचा महापौर म्हणून तिसरा कार्यकाळ!
 
महापौरपदाच्या कार्यकाळात कर्मचार्‍यांशी वाद घालणे, त्यांचा पदोपदी अपमान करणे यावरून त्या वादाच्या भोवर्‍यातही सापडल्या. पण, आपल्यावरील सर्व आरोप त्यांनी नंतर फेटाळून लावले. एवढेच नाही, तर भारतातील ‘सीएए’ कायद्याचा जाहीर विरोध, गाझातील मुस्लिमांवरील अन्यायाविरोधात इस्रायलवर आगपाखड करण्यातही सिद्दीकी अग्रेसर. पण, त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, केंब्रिजसारख्या शहरांतही मॉलपासून ते शाळांपर्यंत त्यांनी लागू केलेली ‘हलाल’सक्ती. अगदी केंब्रिजमधील सर्व शाळांना मुस्लीम सणांच्या सुट्ट्याही जाहीर झाल्या. त्यामुळे साहजिकच अशा मुस्लीमप्रिय शहरांमध्ये स्थलांतरितांचे लोंढे आज वाढलेले दिसतात. मॅसॅच्युसेट्समध्येही मुस्लिमांची लोकसंख्या ही सध्या एक लाखांहून अधिक. त्यातच ‘इस्लाम’ हा अमेरिकेत सर्वाधिक झपाट्याने वाढणारा धर्म ठरला आहे.
 
एकूणच परदेशात एखाद्या शहराचा महापौर मुस्लीम झाल्यानंतर तिथे इस्लामीकरणाला कसा प्रारंभ होतो, याचे हे जिवंत उदाहरण. सिद्दीकी वयाच्या दुसर्‍या वर्षापासून केंब्रिजमध्ये वास्तव्यास असल्या, तरी इस्लामिक प्रथांचा त्यांच्यावर पगडा कायम आहे. त्यामुळे एखाद्या शहराचा महापौर मुस्लीम झाला की, शहराचे रागरंग कसे बदलतात, त्याचीच ही ‘हिरवी’गाथा!
 
 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची