
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाकडे तटस्थपणे पाहणारे आणि पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी खस्ता खाणारे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डाॅ. माधव गाडगीळ यांचे पुण्यात बुधवार दि. ७ जानेवारी रोजी निधन झाले (dr. madhav gadgil). ते ८३ वर्षांचे होते. प्रदीर्घ आजारपणामुळे पुण्यातील डाॅ. शिरीष प्रयाग यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते (dr. madhav gadgil). त्यांच्या पार्थिवावर ८ जानेवारी रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (dr. madhav gadgil)
डाॅ. माधव गाडगीळ हे त्यांच्या पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी उभारलेल्या लढ्याकरिता प्रसिद्ध होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली २०११ साली पश्चिम घाट तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने पश्चिम घाटातील १ लाख २९ हजार ०३७ चौरस किलोमीटरचा अभ्यास केला. त्यानंतर या संपूर्ण क्षेत्राला पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची शिफारस केली. हे क्षेत्र पश्चिम घाटाच्या ७५ टक्के होते. या शिफारसीवर टीकाही झाली. काही राज्यांनी ही शिफारस अंमलात आणण्यास नकार दिला. गाडगीळ समितीचा हा अहवाला १५ वर्ष उलटून गेल्यावर देखील अजून खितपत पडला आहे. राज्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर गाडगीळ गेल्या काही महिन्यांपासून परखड मत मांडत होते. वन्यजीवांच्या वाढत्या संख्येवर रोख लावण्यासाठी स्थानिकांना त्या संबंधीचे अधिकार देण्याबाबत ते आग्रही होते. काही ठिकाणी शिकारीला देखील वाव देण्याबाबत त्यांचे मत होते. या मतावर देखील बरीच टिका झाली. मात्र, वन्यजीवांकडे तटस्थपणे पाहण्याची दृष्टी त्यांनी कायम ठेवली.
गाडगीळ यांनी पर्यावरणाच्या अनेक मुद्द्यांवर विस्तृत लेखन केले. त्यात योगदाने दिले. या योगदानाची दखल संयुक्त राष्ट्रसंघाने देखील घेतली. त्यांना २०२४ साली यूएनईपीचा चॅम्पियन आॅफ द अर्थ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जैवविविधता कायदा आणि वनहक्क कायद्याच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. केवळ कायदे करून पर्यावरण वाचणार नाही, तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग हवा, असा डॉक्टर माधव गाडगीळ यांचा ठाम आग्रह होता. माधव गाडगीळ यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केले होते.