कीर्तन परंपरेचा दीप सतत प्रज्वलित ठेवण्याचे कार्य ‘अखिल भारतीय कीर्तन संस्था’ गेली आठ दशके अविरत करत आहे. संस्थेने कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगम घडवण्याचे व्रत आजवर सांभाळले. कीर्तनशास्त्र, त्यातील रचनेची शास्त्रीय मांडणी, तसेच संस्थेने आजवर घडवलेला कीर्तनकारांचा वारसा, संस्थेची उद्दिष्टे यांबाबत ‘अखिल भारतीय कीर्तन संस्थे’चे अध्यक्ष माधव खरे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी साधलेला संवाद...
‘अखिल भारतीय कीर्तन संस्थे’ची स्थापना नेमक्या कोणत्या वर्षी झाली आणि त्या काळातील परिस्थितीत अशी संस्था निर्माण करण्यामागील प्रेरणा काय होती?
‘अखिल भारतीय कीर्तन संस्थे’ची स्थापना १९४० साली श्रावण वद्य पंचमी या दिवशी झाली. त्याकाळी शंकरराव कुलकर्णी आणि ग. गो. भोसेकर यांनी कीर्तनप्रसारातून धर्म, आध्यात्मिक विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेची स्थापना शंकररावांच्या घरात झाली. याबरोबरच कीर्तन विद्यालयाचीही सुरुवात करण्यात आली. त्याकाळी या विद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा हभप भोसेकर बुवांनी दीर्घकाळ समर्थपणे त्यांच्या सक्षम खांद्यांवर पेलली. पुढे १९५६ नंतर हभप मारुलकरबुवांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर आजतागायत जवळपास ८६ वर्षे ही परंपरा सुरू आहे.
‘अखिल भारतीय कीर्तन संस्थे’च्या मूलभूत ध्येय, तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक भूमिकेबद्दल आपण थोडक्यात सांगू शकाल का?
संस्थेच्या स्थापनेवेळी अध्यात्म आणि भारतीय संस्कृती, धर्म यांच्या विचारांचा प्रसार करावा, या विचाराने संस्थेची स्थापना झाली. आजही त्याच विचारावर संस्था काम करत आहे. अर्थात, काळाच्या ओघात काही नवीन ध्येयांचा समावेश करण्यात आला असला, तरी जो उद्दिष्टांचा मूलभूत गाभा आहे, तो मात्र जो मूळ संस्थापकांनी ठरवला, तसाच आजही कायम आहे.
स्थापनेपासून आतापर्यंत संस्थेचा प्रवास कसा राहिला?
संस्था आता ८६ वर्षांची असून, शतकोत्सवाकडे संस्थेची वाटचाल सुरू आहे. यादरम्यान उल्लेखनीय म्हणजे, साधारण १९५६च्या आसपास या संस्थेत दोन बालकीर्तनकारांची कीर्तने झाली होती. त्याकाळी हभप शिराळकरबुवांनी टिळकचरित्राचे आख्यान संस्कृतमधून विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतले होते. त्यानंतर कीर्तनकार घडवण्याची परंपरा सुरूच राहिली. तसेच हभप कान्हेरे बुवा, हभप सुंदरबुवा मराठे, हभप दांडेकरबुवा, हभप शिरवळकरबुवा अशा दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनेही संस्थेत त्याकाळी झाली. संस्थेने मध्यंतरी प्रवचनांचेही आयोजन केले होते. यामध्ये लीनाताई पुरंदरे, पुराणिकबुवा अशा सरस्वतीपुत्रांच्या प्रवचनांचाही लाभ संस्थेला झाला.
‘दादर कीर्तन संस्था’ नेमके कोणते नियमित उपक्रम राबवते?
संस्थेचे स्वतःचेच दादरमध्ये विठ्ठल-रखुमाई मंदिर आहे. त्यामुळे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी असे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्याचबरोबर हिंदू धर्मातील जवळपास प्रत्येक सण साजरा करण्याचा प्रयत्न संस्थेचा राहिला आहे. संस्थेच्यावतीने चैत्रगौर, गंगापूजन, तुलसीविवाह, वटपौर्णिमा, नवरात्रोत्सव, नवरात्रीदरम्यान महालक्ष्मीपूजनासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, दिवाळीच्या दिवसांत बलिप्रतिपदेच्या दिवशी ३५ ते ४० कोरड्या अन्नपदार्थांचा नैवेद्यही अन्नकुटाच्या माध्यमातून विठ्ठल-रखुमाईला दाखवण्यात येतो.
सध्या संस्था कोणत्या प्रकारचे कीर्तनकार, कलाकार आणि संशोधकांना मंच उपलब्ध करून देते? किंवा त्यांच्यासाठी काही प्रशिक्षणवर्ग चालतात का?
संस्थेचे मूळ उद्दिष्ट कीर्तनप्रसार आणि प्रचार माध्यमातून आध्यात्मिक आणि धार्मिक विचारांचा प्रसार करण्याचे आहे. मात्र, हे करताना नवीन कीर्तनकारांची पिढी घडवण्याकडेही संस्था कटाक्षाने लक्ष देत आहे. यासाठी संस्थेच्या कीर्तन विद्यालयाच्या माध्यमातून ‘कीर्तन पदवी अभ्यासक्रम वर्ग’ चालवण्यात येतात. साडेतीन वर्षांचा हा प्रशिक्षण वर्ग असून, त्यामध्ये उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांस ‘कीर्तनालंकार’ ही पदवी संस्थेतर्फे बहाल करण्यात येते. तसेच, दूर राहणार्या आणि वेळेअभावी इच्छा असूनही कीर्तनवर्गाला उपस्थित राहू न शकणार्या विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ पद्धतीनेही कीर्तनवर्ग संस्थेने सुरू केले आहेत. महाराष्ट्रभर संस्थेच्या मुंबई, पुणे, रत्नागिरी, चिपळूण, दापोली, अमरावती, बीड अशा दूरस्थ कीर्तनवर्गाची केंद्रे ज्येष्ठ कीर्तनकारांच्यावतीने चालवली जात आहेत. गोव्यातही संस्थेच्या दूरस्थ अभ्यासक्रमाचे केंद्र आहे. हा अभ्यासक्रमही साडेतीन वर्षांचा असून, त्याचा महिन्यातून चार तासांचा वर्ग असतो.
याबरोबरच संस्थेचे जवळपास १ हजार, २०० पुस्तकांचे वाचनालय असून, संतसाहित्य, तसेच विविध धार्मिक अथवा ऐतिहासिक विषयांवर अभ्यास करणारे वाचक याचा लाभ घेतात. यासाठी सदस्यत्वाची अट ठेवलेली नाही. कोणत्याही वाचकास नियमांच्या अधीन राहून पुस्तके वाचनालयातून घेता येतात.
आजच्या डिजिटल काळात कीर्तनाची परंपरा टिकवताना कोणती आव्हाने जाणवतात?
निश्चितच संस्थेसमोर या बदलत्या डिजिटल काळाची आव्हाने उभी राहिली आहेत. यामध्ये आजच्या मोबाईल संस्कृतीमुळे कीर्तने मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. त्यामुळे या कलेविषयी साहजिकच कुतूहल निर्माण होते. मात्र, याची माहिती घेण्यासाठी पुन्हा इंटरनेटचाच वापर केल्याने ती म्हणावी तशी शास्त्रशुद्ध मिळत नाही. संस्थेमध्ये शिकवले जाणारे कीर्तन हे नारदीय परंपरेतील असल्याने, सहाजिकच त्यासाठी पाठांतरशक्ती उत्तम असणे आवश्यक असते. तुम्हाला समोर मोबाईल वा अन्य काही साधने ठेवून कीर्तन करणे या परंपरेत न बसणारे आहे. त्यामुळे संस्था म्हणून आम्ही याविषयी अनेक मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने पाठांतरक्षमता, स्मरणशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवण्याची तयारी करत आहोत.
बदलत्या महानगरी जीवनशैली आणि प्रेक्षकांच्या मानसिकता लक्षात घेऊन कार्यक्रमांचे कालावधी, स्वरूप आणि सादरीकरण कसे बदलले आहे?
कीर्तन ही कला परंपरांगत असल्याने त्याचे स्वरुप बदलणे शक्य नाही आणि ते बदलताही कामा नये. मात्र, आता तरुण कीर्तनकार तयार होणे आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीने संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. संस्था बालकीर्तनकारांचे वर्ग सुरू करण्याबाबत विचाराधीन आहे. आता नवपालकांनीही या आपल्या पूर्वजांच्या संचिताकडे सकारात्मक अंगाने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. कीर्तन हे समाजप्रबोधानाचे मोठे माध्यम आहे. संतांनी समाजाला साक्षर करण्यासाठी कीर्तनाचा सुरेख वापर केला. कीर्तनामध्ये पौराणिक कथा असतातच. परंतु, सध्याची सामाजिक परिस्थिती विचारत घेऊन रक्तदान, पर्यावरण, भारतीय सैन्याची विजयगाथा, भारतीय वैज्ञानिकांची चरित्रे, अंधश्रद्धा किंवा सध्या समाजाला गरज असलेल्या कोणत्याही विषयावर भाष्य करण्याची संधी उपलब्ध होते. त्यामुळे याचा प्रभावी करण्याची गरज आहे. संस्था यावरही काही उपक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे.
पुढील पाच वर्षांसाठी ‘दादर कीर्तन संस्थे’चे उद्दिष्ट काय आहे?
संस्थेला नवीन कीर्तनकरांची पिढी घडवायची आहे. कीर्तनाने माणसाचे वाचन वाढते, आत्मविश्वास, सभाधीटपणा यांसारख्या गुणांमध्येही वृद्धी होते. त्यामुळेच या परंपरेला पुढे नेणारे तरुण समाजामध्ये घडवणे, हेच संस्थेचे पुढील काळातील उद्दिष्ट आहे. त्यासाठी संस्था विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्येही कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रयत्नशील असून, काही ठिकाणी संस्थेच्या या उपक्रमांना मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी संस्थेच्या या उपक्रमांचा लाभ घेतला पाहिजे, असे मी आवाहन यानिमित्ताने करतो.
- कौस्तुभ वीरकर