ठाणे :( Abhay Oak ) ‘शासन जिथे कमी पडते, तिथे ही मंडळी काम करतात. काहीतरी चांगले, सकारात्मक करावे असे अनेकांना वाटत असते. त्यांच्या संकल्पांना निश्चित दिशा देण्याचे कार्य सेवा सहयोग संस्थेच्या विद्यार्थी विकास योजनेच्या उपक्रमातून होत आहे. आता कल्याणकारी उपक्रमांसाठी केवळ सरकारवर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. सर्वच गोष्टी शासन करू शकणार नाही. त्यामुळे समाजातील वंचित समूहांच्या गरजा ओळखून नागरिकांनीच स्वयंप्रेरणेने सामाजिक उपक्रमात सहभागी व्हायला हवे,’ असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय ओक यांनी शनिवारी ठाण्यात सेवा सहयोग फाऊंडेशनच्या विद्यार्थी विकास योजनेच्या वार्षिक संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरातील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, त्यांचे पालक, देणगीदार आणि हितचिंतक संमेलनास उपस्थित होते. गेल्या आर्थिक वर्षअखेरीस संस्थेने राज्यभरातील २ हजार ३९६ विद्यार्थ्यांना एकुण २७ कोटी ५९ लाख रूपयांची शिष्यवृत्ती दिली. चालू आर्थिक वर्षात राज्यातील तसेच राज्याबाहेरील १ हजार १०१ विद्यार्थ्यांना बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी ६ कोटी ७० लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.या व्यतिरिक्त संस्थेच्या वतीने गेल्या १५ वर्षात आठ मराठी माध्यमाच्या शाळा इमारतींचे पुनर्निमाण करण्यात आले. संस्थेचे रविंद्र कर्वे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी वसतिगृहांची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.