अभिनेता शशांक केतकरसह अन्य मराठी कलाकारांचेही पैसे थकबाकी

    07-Jan-2026
Total Views |

मुंबई: अभिनेता शशांक केतकरने सोमवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एका निर्मात्याने आपले मानधन थकवले असल्याचा आरोप केला होता. संबंधित निर्मात्याने पैसे देण्यासाठी ५ जानेवारी २०२६ ही अंतिम तारीख दिल्याचे शशांकने स्पष्ट केले होते. मात्र, त्या तारखेपर्यंतही पैसे न मिळाल्यास आपण सविस्तर माहिती उघड करणार असल्याचा इशाराही त्याने दिला होता. अखेर ५ जानेवारी रोजी शशांक केतकरने या प्रकरणासंदर्भात एक सविस्तर व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्याने संबंधित निर्मात्यासोबत झालेल्या संभाषणांचे चॅट्सचे स्क्रीनशॉट्सही शेअर करत संपूर्ण प्रकार उघड केला आहे. हा निर्माता-दिग्दर्शक म्हणजेच मंदार देवस्थळी. मंदार देवस्थळी हे नाव मराठी टिव्हीविश्वासाठी नवे नाही. अनेक गाजलेल्या मालिका मंदारने दिग्दर्शित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे २०२० साली आलेली हे मन बावरे ही मालिकासुद्धा बरीच लोकप्रिय ठरली होती. यामध्ये अभिनेता शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस मुख्य भूमिकेत होते. याच मालिकेचे पैसे थकवल्याती तक्रार शशांकसह इतर कलारांनीही केली होती.
त्यानुसार पुन्हा एकदा ४ वर्षांनी हा मुद्दा चर्चेत आला आहे. शशांकने अजुनही आपले पैसे मिळाले नसल्याचे सांगितले आहे.

याविषयी शशांकने म्हटले आहे,
“मी कायदेशीर कारवाई करतोच आहे पण तूर्तास मंदार देवस्थळी ( मंदार दादा) या उत्तम दिग्दर्शकाचा आणि हे मन बावरे या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न तुमच्याही लक्षात यावा या साठी हा व्हिडीओ स्क्रीनशॉट सकट पोस्ट करतो आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गया वया करतो, डार्लिंग, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो.

५,००,००० ही एखाद्या साठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. हे मन बावरे या मालीकेचे परडे प्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले ( मुद्दल) पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे. म्हणजे त्यांनी पेमेंट देताना TDS कापला आणि शासनाला भरला नाही असा दुहेरी गुन्हा केला आहे.

बरं ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही. सगळ्यांची आहे. अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहे, पण आत्ता मी फक्त माझ्या साठी बोलतो आहे. YouTube वर ४ वर्षांपूर्वीच्या काही मुलाखती दिसतील तुम्हाला त्यातही त्याचा हा थापा मारायचा पॅटर्न स्पष्ट दिसतो. आणि आमच्या पैशांचं केलं काय या बद्दल चकार शब्द काढत नाही तो !”


यावरच अभिनेत्री ऋजुता देशमुखने प्रतिक्रिया करत लिहिले, "तू बरोबर आहेस!! तू बोलतोस, हे मला प्रचंड कौतुकास्पद वाटतं. देव करो, आणि तुझे सगळे पैसे मिळो! शिवाय देव करो आणि आपल्या क्षेत्रातली पैसे न देणारी जमात नष्ट होवो. आपल्या कामाचे पैसे सतत भीक मागितल्यासारखे मागावे लागतात हे दुःखद आहे. आणि हे कधी संपणारे कोणास ठाऊक!! All positivity to you Shashank."

याशिवाय अभिनेता आस्ताद काळेनेही स्वतंत्र पोस्ट करत लिहिले आहे,

आपण एकत्र येऊया????? एक होऊया?????
“मराठी दूरचित्रवाणीच्या (television) क्षेत्रात एक रूढ परंपरा आहे. कदाचित हिंदीतही असेल, पण ते मला माहीती नाही. मी तिथे काम केलेलं नाही. तर परंपरा अशी, की काही निर्माते एकत्र येऊन एखाद्या कलाकाराला BLACKLIST करतात. त्याला/तिला काम मिळू द्यायचं नाही हे आपापसात मिळून ठरवतात.
कधीकधी, नव्हे बऱ्याचदा त्या कलाकाराचा यात दोष असतो. बेशिस्त वागणं, अवाजवी मागण्या करणं वगैरे पैलू त्यात कारणीभूत ठरतात. (मी "त्या" यादीत येता येता राहिलोय..वाचलोय..माझ्याच चुकांमुळे, आणि त्या वेळीच सुधारल्यामुळे.) त्यामुळे मला हे नक्की माहीती आहे. पण काही सद्भावी, सहृदयी,प्रामाणिक आणि शिवाय प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांना केलेल्या कामाचे पैसेच देत नाहीत निर्माते!!!!

मग फार प्रसिद्धी न मिळालेल्या कलाकारांची या बाबतीतली व्यथा तर बोलायलाच नको.... नको????? बोलायलाच हवी....
काही राजकीय पक्षांच्या संघटना आहेत, ज्या कलाकारांच्या प्रश्नांसाठी काम करतात. पण निर्मात्याची जर त्या पक्षात किंवा एकूणच राजकीय वर्तुळात खूप ओळख आणि ऊठबस असेल तर??? तर पुन्हा हात बांधले जातात आणि तोंड बंद होतं.(हाही अनुभव मला स्वत:ला आलेला आहे)

एखादी मालिका फार चालली नाही, तर निर्मात्याचं नुकसान होतं.तेव्हा कलाकारांनी त्या नुकसानातला वाटा उचलणं अपेक्षित असतं. राहिलेल्या मानधनातले ५०% कमी करून देण्याच्या offers मला स्वत:ला आलेल्या आहेत. पण....जर मालिका चालली, फायदा झाला, तर त्याचा वाटा मात्र कलाकरांच्या नशीबी येत नाही. हे आणि हेच विदारक सत्य आहे.
कलाकारांनी एकत्र येणं गरजेचं आहे. निर्मात्यांचं जसं एक GUILD आहे तसं तयार करणं गरजेचं आहे. काही निर्मात्यांना कलाकारांनी एकत्र येऊन BLACKLIST करणं गरजेचं आहे. Channels कडून या काही निर्मात्यांना डावललं जाणं गरजेचं आहे. हातांच्या बोटांवर मोजता येतील इतके विश्वासार्ह निर्माते आहेत आज मराठी televisionमध्ये. बाकी अनेक आहेत बुडवे. पण तरी त्यांना Channels कडून projects मिळत राहतात. म्हणून कलाकारांनी एकत्र येणं, आपलं एक स्वतंत्र GUILD उभं करणं गरजेचं आहे.
ता.क:-
१) कलाकारांमधे फक्त नट/नट्या धरत नाहीये मी. तांत्रिक बाजू न सांभाळणारे हे सगळे कलाकार आहेत. तंत्रज्ञ वेगळे, कलाकार वेगळे.
२) Channelsनी कृपया "या आधीच्या projectमधे काम केलेल्या सर्वांचे NOC दाखवल्याशिवाय पुढचं project देणार नाही" असं काहीसं धोरण तरी अवलंबावं. जे CENSOR CERTIFICATEसाठी करावं लागतं तसं.”
अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.