हतनूर जलाशयाच्या पक्ष्यांच्या यादीत भर; महाराष्ट्रात केवळ तापीत आढळणारा पक्षी

    07-Jan-2026
Total Views |
Striated grassbird


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
जळगावमधील हतनूर जलाशयाच्या परिसरातून पक्षीनिरीक्षकांनी शनिवार दि. ३ जानेवारी रोजी गवती वटवट्या या दुर्मीळ पक्ष्याची नोंद केली (Striated grassbird). हा पक्षी आजवर तरी महाराष्ट्रात केवळ तापी नदीच्या खोऱ्यात आढळला आहे (Striated grassbird). हतनूर जलाशय परिसरातून या पक्ष्याची नोंद झाल्याने आता याठिकाणी सापडणाऱ्या पक्ष्यांची संख्या ३११ झाली आहे. (Striated grassbird)
 
 
'हतनूर धरण जलाशय’ हे खानदेशातील सर्वात मोठे जलाशय म्हणता येईल. संत चांगदेव यांची पावनभूमी असलेल्या ’चांगदेव’ गावी मध्यप्रदेशातून मेळघाट मार्गे येणारी तापी नदी आणि विदर्भातून येणार्या पूर्णा नदीचा संगम झाला आहे. या संगमाच्या पाच किमी पुढे हतनूर धरणाची निर्मिती झाली. पाणथळीमुळे याठिकाणी विपुल पक्षीसंपदा आहे. या क्षेत्राचा समावेश महत्त्वाच्या पक्षी क्षेत्रांमध्ये केला जातो. आता याठिकाणी गवती वटवट्या या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. हतनूर जलाशयाच्या परिसरात शनिवार दि. ३ जानेवारी रोजी हा पक्षी दिसून आला. शनिवारी सकाळी समीर नेवे यांच्यासोबत हतनूर जलाशयाच्या काठाकाठाने पक्षीनिरीक्षण करत असताना अचानक गवती वटवट्या हा पक्षी आम्हाला दिसल्याची माहिती पक्षीनिरीक्षक अनिल महाजन यांनी दिली. या नोंदीमुळे हतनूर जलाशय परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या ही ३११ झाल्याचे ते म्हणाले.
 
 
सामान्यत: भारतातील इशान्य आणि उत्तरेकडील राज्यामध्ये या पक्ष्याचा प्रामुख्याने अधिवास आहे. हा अधिवास प्रामुख्याने गवताळ प्रदेशात असतो. विणीच्या हंगामात हे पक्षी केवळ गवताबाहेर येऊन एकमेकांना आवाज देतात. हा पक्षी स्वभावाने चतुर असून तो गवतात लपून बसतो. त्याच्या शरीरावरील काळ्या रंगाच्या उभ्या पट्ट्या असतात. शरीरावरील या पट्टेरी रचनेमुळे तो गवताळ अधिवासात मिसळून जातो. त्यामुळे त्याला शोधणे कठीण होऊन बसते. तापी नदीच्या खोऱ्यातून या पक्ष्याची सर्वप्रथम नोंद २०२० साली पक्षीनिरीक्षक लक्ष्मीकांत नेवे यांनी केली होती. त्यांनी नोंदवलेल्या ठिकाणाहून साधारण आठ ते नऊ किलोमीटर दूर असणाऱ्या हतनूर जलाशय परिसरात या पक्ष्याची आता नोंद करण्यात आली आहे.