महाराष्ट्राला थोर अशी संतपरंपरा लाभली असून आपल्या संतांनी अभंगाचा मोठा ठेवा समाजाला दिला आहे. संतांच्या त्या रचना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि नव्या पिढीवर चांगले संस्कार रुजविण्यासाठी डोंबिवलीत ‘सिमांतिनी भक्ती मंडळ’ कार्यरत आहे. त्यांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश...
‘सीमंतिनी भक्तिगीत मंडळा’ची स्थापना भजनभूषण दिवंगत नलिनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १९९३ साली झाली. नलिनी यांनी डोंबिवलीत १२-१३ भजनी मंडळांची स्थापना केली होती. त्यांनी सर्वप्रथम ‘रागिणी भक्तिगीत मंडळां’ची स्थापना केली. ‘रागिणी भक्ती मंडळां’चा सूर डोंबिवलीत गुंजला. त्यानंतर डोंबिवली, कल्याण, ठाणे या सर्वच ठिकाणी मंडळांची स्थापना नलिनी यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ लागल्या. त्यांपैकीच एक ‘सीमंतिनी भक्तिगीत मंडळ’ आहे. शुभांगी लेले, सुचित्र आठवले, कांचन ठाकूर, अर्चना नाईक यांनी एकत्रित येऊन सीमंतिनी मंडळांची स्थापना केली. परमेश्वराशी नाते जोडण्याचा मार्ग म्हणजे भजन. सीमंतिनी मंडळात सध्या १४ जणी आहेत. त्यांपैकी दोन-तीनजणी नोकरी करणार्या होत्या. इतर सर्वजणी गृहिणी होत्या. त्यांच्या रिकाम्या वेळेत देवाचे नामस्मरण करावे, या उद्देशाने मंडळांची स्थापना केली. तसेच भजन परंपरा टिकून राहते. भजन हे संस्कार करण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे भजन कार्यक्रमातून संस्कार होतात, हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी मंडळांनी कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. या संस्थाने महाराष्ट्र आणि महाराष्ट्रबाहेर ही कार्यक्रम केले. त्यात बंगळुरु, इंदोर, दिल्ली यांसारख्या विविध शहरांचा समावेश आहे. आठवड्यातून दोन दिवस मंडळाकडून सराव केला जातो.
अलका देशपांडे यांच्या घरी हा सराव सर्व महिला मिळून करतात. नलिनी यांनी जवळजवळ २० वर्षे महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर स्वरांगी आठवले त्यांना मार्गदर्शन करत होत्या. आता मात्र महिला स्वतःचा सराव करतात. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ महिला या क्षेत्रात कार्य करत आहेत. नलिनी यांनी भजनाला एक वेगळाचा आयाम दिला. भजनाबरोबरच सांस्कृतिक सहसादरीकरण ही त्यांच्या मंडळांची विशेषता होती. त्यांचा आवाज अतिशय सुंदर होता. सांस्कृतिकसोबतच जागर, जोगवा, गोंधळ, भारूड, टिपर्या विविध भक्तिगीते नृत्याविष्कारातून सादर केली जात. त्याबद्दल नलिनी मार्गदर्शन करत असत. तसेच, विशेषतः विविध तालवाद्यांच्या गजरात सादरीकरण अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी शिकविले आहे. टाळ्यांबरोबरच टिपर्या, झांजरी किंवा इतर तालवाद्य याचाही वापर उत्तम पद्धतीने गुरूवर्य नलिनी यांनी सर्वच मंडळांना शिकविला. त्यांचा हा वारसा घेऊनच अनेक ठिकाणी मंडळांनी कार्यक्रम सादर केले. विशेषतः नवरात्र, गणेशोत्सव काळात मंडळांना अनेक ठिकाणांहून कार्यक्रमांसाठी बोलाविले जाते. त्यावरून महाराष्ट्रात अजूनही भजनाची परंपरा अखंडित आहे, याचा प्रत्यय येतो. गेली काही वर्षे मंडळांची धुरा कांचन ठाकूर सांभाळत आहेत. तसेच भजनाला लागणारी हार्मोनियमची साथ अलका देशपांडे या देतात. तबल्यावर संतोष केळकर, उषा आठवले, सुधीर बर्वे वेळोवेळी साहाय्य करतात. सांस्कृतिकसाठी मंडळाला अनन्या कर्वे, संतोष मापसेकर यांचे विशेष साहाय्य लागते.
अवीट गोडीची भक्तिगीते भजने रसिकांना परत परत ऐकावीशी वाटतात, म्हणूनच अनेक देवस्थाने महाराष्ट्रातील तसेच दिल्ली, बंगळुरु येथील महाराष्ट्र मंडळांतही त्यांना आवर्जून बोलविले जाते. मध्य प्रदेशातील मांडलेश्वर येथेही कार्यक्रम करण्याचा योग आला. कोणतेही शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसतानाही गुरूवर्य नलिनी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मंडळातील सर्वांना हे शिवधनुष्य पेलणे शक्य झाले होते. मंडळांनी आजपर्यंत ५०० हून अधिक कार्यक्रम केले आहेत. मंडळांतील सर्व भगिनींचे वाढदिवसदेखील साजरे केले जातात. मंडळांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सादरीकरण करताना सर्वजणींमध्ये साम्य दिसावे, याकरिता सगळ्या एकाच रंगाच्या साड्या नेसतात. भजन हे श्रवणीय आणि प्रेक्षणीय असावे, हा नलिनी यांचा उद्देश होता. तसेच वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा त्यांच्याकडे होता. त्यांचा वेळ पाळली पाहिजे, हा कटाक्ष मंडळांत पाळला जातो.
दरवर्षी मंडळाचा वर्धापन दिन साजरा केला जातो. आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाते. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अनेक ठिकाणी सेवा म्हणूनही भजनाचे सादरीकरण केले जाते. असे हे भक्ती मंडळ सर्व भगिनींना एकत्रित ठेवून संसारातील व्याप विसरायला लावत आणि भक्तिमार्गाला लावणारे रामबाण औषध आहे. दरम्यान, आता मंडळांची संख्या कमी होऊ लागली आहे.मंडळातील सदस्यांना वयोमानानुसार शारीरिक व्याधी सुरू होतात. पण अजून ही तरुण मंडळी भजनाकडे वळत असल्याचे मंडळातील दिपाली काळे यांनी सांगितले.