'शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस' 'बिग बॉस मराठी ६'ची जय्यत तयारी

    07-Jan-2026
Total Views |

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला आणि मनोरंजनाची ओळख बनलेला ‘बिग बॉस मराठी’ पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या लोकप्रिय रिअॅलिटी शोची प्रत्येक सीझनची महाराष्ट्रभर उत्सुकतेने वाट पाहिली जाते. देशाचा लाडका सुपरस्टार आणि प्रेक्षकांचा आवडता ‘भाऊ’ रितेश देशमुख यंदाही बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. “बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत…” हा दमदार आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरांत घुमणार आहे. यंदा बिग बॉस मराठीचं घर पूर्णपणे नव्या रूपात, नव्या रचनेत आणि बदललेल्या नियमांसह सादर होणार आहे. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” या थीमसह नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी घर सज्ज झालं आहे.

१०० हून अधिक कॅमेऱ्यांच्या सततच्या नजरकैदेत तब्बल १०० दिवस चालणाऱ्या या प्रवासात स्पर्धकांचे अतरंगी स्वभाव, बदलती नाती, प्रेम-मैत्री, मतभेद, भांडणं आणि चुरशीचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीचा नवा सीझन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनाची पूर्ण तयारी करून येत आहे.

बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक. मागील पर्वात आपल्या ठाम मतांमुळे, रोखठोक भूमिका, पण तितक्याच प्रेमळ स्वभावाने, साध्या-सहज व्यक्तिमत्त्वाने आणि गरज पडल्यास कडक शिस्तीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारे, हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख याही पर्वात सूत्रसंचालकाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. मागील सीझनमध्ये त्यांनी कधी मित्र, कधी मार्गदर्शक बनून सदस्यांना आरसा दाखवला, परखड मत व्यक्त केली आणि खोटेपणाचे मुखवटे उतरवले. हे सगळं यंदाही पाहायला मिळणार आहे. अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅगसह रितेश देशमुख यंदा हा खेळ अधिक रंगतदार करणार असून, घरातील सदस्यांसह प्रेक्षकांवरही आपल्या सूत्रसंचालनाची छाप ते नक्कीच सोडतील. बनिजे आशियाने निर्मित केलेला ‘बिग बॉस मराठी’चा सीझन ६ एका दिमाखदार सोहळ्याद्वारे ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता, आपल्या लाडक्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतरचे भाग दररोज रात्री ८ वाजता प्रसारित होतील.

बिग बॉस सुरू होण्याआधीच संपूर्ण महाराष्ट्रात या सीझनमधील स्पर्धकांबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असताना, यंदाही आपल्या खास स्टाईल आणि दिलखुलास अंदाजाने रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत, याबाबत बोलताना रितेश देशमुख म्हणाले ,‘बिग बॉस मराठी’चं घर म्हणजे रोज नवं वळण आणि नवं आव्हान. पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. यंदा कुठलं दार कुणाचं नशीब उघडेल, हे कुणालाच माहीत नाही. या शोची खरी मजा म्हणजे सदस्यांमधले लपलेले पैलू प्रेक्षकांसमोर आणणे. यंदाच्या सीझनमध्ये राडा, धुरळा, भावना आणि मस्ती सगळं काही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सहाव्या सीझनसाठी सज्ज राहा, कारण यंदा ‘बिग बॉस मराठी’ अधिक बेधडक, अनपेक्षित आणि अगदी अस्सल मराठमोळा असणार आहे.”

यावर्षीच्या सीझनबद्दल आणि थीमबद्दल बोलताना Executive Vice President, Marathi Cluster, सतीश राजवाडे म्हणाले, “रिअॅलिटी शोच्या विश्वात ‘बिग बॉस’ची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ असून त्यांची आवड सतत बदलते. त्यामुळे सहाव्या सीझनसाठी आम्ही फक्त खेळ नाही, तर संपूर्ण अनुभव नव्याने घडवण्याचा निर्णय घेतला आहे. फॉरमॅट न बदलता कंटेंट अधिक धारदार ठेवण्यावर आणि प्रत्येक वयोगटाला सहभागी करून घेण्यावर आमचा भर आहे. विविध वयोगटातील विविध विचारसरणी आणि स्वभावांचे स्पर्धक यंदा घरात पाहायला मिळणार आहेत. या सगळ्याला योग्य दिशा देण्यासाठी रितेश देशमुख यांच्यासारखा ठाम आणि संवेदनशील सुपरस्टार आमच्यासोबत असणं ही आमच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. ‘दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!’ या थीममुळे यंदाचा सीझन अधिक उत्सुकता निर्माण करेल हे नक्की.”

मराठी माणूस म्हटलं की गप्पा, चर्चा हि आलीच. वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं एकत्र आली की भांडणं, रुसवे-फुगवे, मैत्री, प्रेम आणि स्पर्धा अपरिहार्य ठरते.‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाही विविध क्षेत्रातील अतरंगी स्पर्धक एका छताखाली राहणार आहेत. यंदाच्या सीझनची सर्वात मोठी खासियत म्हणजे घराची आगळीवेगळी संकल्पना. यावर्षी १३,००० चौरस फूट भव्य जागेत विविध क्षेत्रातील १६ हून अधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व सदस्य म्हणून घरात जाणार आहेत. अनेक दारांनी सजलेलं हे भव्य घर केवळ राहण्यासाठी नसून, तेच या खेळाचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. प्रत्येक दारामागे एखादं आव्हान, एखादा धक्का किंवा एखाद्याचं नशीब बदलणारा क्षण दडलेला असेल. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” ही केवळ टॅगलाईन नसून यंदाच्या सीझनचं मुख्य वैशिष्ट्य आहे.

घराचा दरवाजा पुन्हा एकदा उघडणार आहे. दर आठवड्याला किमान एका स्पर्धकाला घराबाहेर जाण्यासाठी इतर स्पर्धक तसेच प्रेक्षकांच्या मतांद्वारे नामांकन करण्यात येईल. जो स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत बिग बॉसच्या घरात टिकेल, तो ठरेल ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ चा विजेता. नव्या पर्वाचा काउंटडाऊन सुरू झाला असून, पाहूया रितेश भाऊ यंदा या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत कसं करणार आणि कोण खेळात टिकणार!