कीर्तनासारख्या समृद्ध कलेच्या माध्यमातून भगवंताच्या भक्तीचा प्रसार करतानाच,समाजप्रबोधनाचे कार्य करणार्या हभप प्रभंजन भगत यांच्याविषयी...
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम्|
अर्चनं वन्दनं दास्यं
सख्यमात्मनिवेदनम्॥
भगवंताच्या भक्तीचे हे नऊ प्रकार. यामध्ये दुसर्या क्रमांकाची भक्ती म्हणजे कीर्तनभक्ती होय. आजमितीला कीर्तनाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला असला, तरीही भक्तीच्या याच प्रकारांचा वापर संतमंडळींनी मोठ्या खुबीने समाज उद्धाराच्या कार्यासाठीही केला. त्यामुळेच कीर्तनकला ही फक्त भक्तीचे माध्यम न राहाता, समाजप्रबोधनाचे माध्यम ठरले. अगदी ९०च्या दशकापर्यंत दररोज संध्याकाळी एखाद्या मंदिरात नित्यनेमाने कीर्तन ऐकण्यास जाणारी पिढी होती. मात्र, कालौघात जीवनाची गतिमानता वाढीस लागली आणि कीर्तन ऐकण्यास जमणार्या माणसांची गर्दीही कमी झाली. मात्र, असे असले तरीही आज अनेक नवतरुण कीर्तनकार आपल्याला दिसतात. अनेक गावोगावी होणार्या उत्सवांमध्येही अनेक तरुण कीर्तनसेवा करतात. अशाच तरुणांपैकी एक नाव म्हणजे प्रभंजन भगत होय.
प्रभंजन यांचे मूळ गाव कोलार भगवतीपूर. प्रभंजन यांचा जन्म पाथरे या गावी झाला असला, तरी वडिलांच्या नोकरीमुळे बालपण आणि बारावीपर्यंतचे शिक्षण लोणी- प्रवरानगर या गावात झाले. पुढे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी प्रभंजन यांनी पुण्याची वाट धरली. पुढे अधिक शिक्षण्यासाठी त्यांनी येवल्यातून ‘पॉवर सिस्टम’ क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षणही घेतले. त्यानंतर प्रभंजन यांनी काहीकाळ अकरावी ते अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्यही केले. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातही त्यांनी अर्थार्जन केले. मात्र, या सगळ्यामध्ये त्यांना आत्मानंद गवसत नव्हता. त्यामुळे साहजिकच एक घुसमट त्यांच्या मनाला खात असे. त्यामुळे त्यांनी हे सगळे सोडून पूर्णवेळ कीर्तनसेवा करण्याचा निर्णय घेतला.
प्रभंजन यांचा कीर्तनकार म्हणून प्रवास तसा लहानपणापासूनच सुरू झाला होता. याला कारण ठरल्या, प्रभंजन यांच्या मावशी. त्यांच्या मावशींनी प्रभंजन यांना कीर्तनाला उभे केले. प्रभंजन यांचे कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण शिर्डी येथे आयोजित कीर्तन शिबिरांतून झाले. या शिबिरांचे आयोजन प्रभंजन शिर्डी संस्थानचे विश्वस्त असलेल्या यांच्या आजोबांनीच केले होते. या शिबिरांना प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांची उपस्थिती लाभली होती. त्यांच्याशी झालेल्या मंथनातून मिळालेल्या ज्ञानामुळे आणि मावशीच्या प्रोत्साहनामुळे प्रभंजन यांच्यात कीर्तनाची गोडी निर्माण झाली.
पुढे अभियांत्रिकीसाठी पुण्यात आल्यानंतर आफळे बुवांचे मार्गदर्शन घेण्याचा योगही प्रभंजन यांच्या मनात आला. हे मार्गदर्शन मिळवण्यासाठी चार वर्षे प्रभंजन न चुकता बुवांच्या घरी जात असत. या काळात आफळे बुवांनी कीर्तन तर शिकवलेच. मात्र, त्याचबरोबर ते कसे करावे, याचेही मौलिक ज्ञान दिल्याचे प्रभंजन सांगतात. एखाद्या चरित्राचे आरेखन करताना नेमकी मांडणी कशी करावी, कथेवर संस्कार कसे करावे, असे शिक्षण आफळे बुवांनी दिले.
यानंतर प्रभंजन यांना अनेक कीर्तने करण्यासाठी बोलावण्यात येऊ लागले. प्रभंजन यांचा मूळचा नम्र स्वभाव आणि त्यात अभ्यासू कीर्तनाचा प्रचंड प्रभाव श्रोत्यांवर पडत असे. मात्र, नोकरीतील बंधनामुळे अनेकवेळा प्रभंजन यांना कीर्तनसेवेला नकार द्यावा लागत असे. अखेरीस प्रभंजन यांनी घरच्यांशी पूर्णवेळ कीर्तनसेवेला वाहून घेण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी घरच्यांबरोबरच त्यांच्या अर्धांगिनी असलेल्या अनुपमा यांनीही हवा तो निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना दिले. अनुपमा या स्वत:ही कीर्तनकार असून, त्यांनी दादरच्या कीर्तन विद्यालयातून ‘कीर्तनालंकार’ पदवी प्राप्त केली आहे. घरच्यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळेच हा निर्णय घेऊ शकल्याचे प्रभंजन मान्य करतात.
कीर्तनसेवेला वाहून घेतल्यानंतर प्रभंजन यांनी कीर्तनाबरोबरच व्याख्याने, सूत्रसंचालन, निरूपणांचे कार्यक्रम करण्यासही सुरुवात केली. प्रभंजन यांच्या साईबाबांच्या चरित्रावर आधारित कीर्तनाला विशेष मागणी असते. आजमितीला समाजात साईबाबांविषयी अनेक मतमतांतरे दिसतात. कीर्तनाच्या माध्यमातून सत्य स्पष्ट करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे प्रभंजन सांगतात. प्रभंजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ’एन्व्हायर्नमेंट, हेल्थ आणि सेफ्टी’ या विषयावर विविध औद्योगिक महामंडळामध्ये व्याख्याने दिली आहेत. तसेच कीर्तनांमधील महत्त्चाचे अंग असलेल्या पंत वाङ्मयाच्या संवर्धनासाठीही प्रभंजन आणि त्यांचे मित्र काम करत आहेत. मोरोपंतांच्या साहित्याचा अभ्यास करणार्यांना त्यांचा अभ्यास सादरीकरणाची संधी प्रभंजन आणि त्यांचे मित्र करून देत आहेत.
भविष्यात ‘संगीत क्रांतिगाथा’ या नावाने कार्यक्रम सुरू करण्याचीही प्रभंजन यांची योजना असून, यामध्ये सर्व क्रांतिकारकांची चरित्रे संगीतमय सादरीकरणातून समाजापुढे ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. कीर्तनासारख्या समृद्ध परंपरेच्या माध्यमातून भगवद्भक्तीच्या प्रसाराचे आणि समाजप्रबोधनाचे कार्य करणार्या प्रभंजन भगत यांना दै. ‘मुंबई तरुण भारत‘कडून मन:पूर्वक शुभेच्छा!
- कौस्तुभ वीरकर