निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया ही केवळ एखाद्या राष्ट्रापुरती निश्चितच मर्यादित नाही. पण, भारतीय संस्कृती, येथील विविध दर्शने आणि तत्वज्ञान लक्षात घेता, भारताने जागतिक निर्वसाहतीकरण चळवळीचे नेतृत्व स्वीकारणे अपेक्षित आहे. त्यामुळे ‘वसुधैव कुटुम्बकम्’च्या नीतीने चालणार्या भारताच्या ‘विश्वगुरु’पर्यंतच्या प्रवासात निर्वसाहतीकरणाचा हा टप्पा तितकाच महत्त्वाचा. त्याविषयीचे केलेले चिंतन...
सांस्कृतिक अथवा वैचारिक वसाहतीकरणाचे अनेक पैलू आपण गेले वर्षभर पाहिले. वसाहतवादाचे सिद्धांतन निर्माण होण्यास कारणीभूत अशी युरोपची वैचारिक पार्श्वभूमी पाहिली. त्यानंतर निर्वसाहतीकरण या विषयाकरता निर्माण झालेल्या अनेक सिद्धांतनांचा आणि त्याअनुषंगे वसाहतीकरण आणि निर्वसाहतीकरणाच्या जागतिक अनुभवांचाही आढावा घेतला. वैचारिक वसाहतीकरणाच्या या अनेकानेक आयामांची संगती युरोपीय वैचारिक विकसनाशी लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे मूळ युरोपच्या ‘रिलीजन’च्या इतिहासात सापडते. निर्वसाहतीकरणाचे सिद्धांतन या मुळावर थेट बोट ठेवत, कोलंबसाच्या सफरीबरोबरच युरोपचे वसाहतीकरणाचे धोरण सुरू झाल्याचे प्रतिपादन करते. कोलंबसाच्या सफरीने नव्या जगाचा शोध लावल्यानंतर पोपने पोर्तुगाल व स्पेनमध्ये केलेले नवीन भूभागाचे विभाजन सर्वविदित आहे.
त्यामुळे वसाहतवादाचा ख्रिस्ती ‘रिलीजन’शी असलेला थेट संबंध आज जगन्मान्य आहे. परंतु, याच वसाहतवाद आणि ख्रिस्ती ‘रिलीजन’च्या सैद्धांतिक एकत्वाने निर्वसाहतीकरणाच्या कार्यापुढे एक अटळ असा वैचारिक आणि व्यावहारिक असे दोन्ही पैलू असणारा प्रश्न उभा केला आहे. हा प्रश्न म्हणजे ख्रिस्ती ‘रिलीजन’ने आणि त्याच्या तत्त्वज्ञानाने जगातील अन्य सर्व ईश्वरविषयक मान्यता आणि ईश्वराच्या उपासनेच्या पद्धती यांना हेतुतः नष्टप्राय केलेले असणे. आपला वंश आणि आपली उपासनापद्धती यांच्या श्रेष्ठत्वावर युरोपीय समाजाचा इतका ठाम विश्वास होता की, त्यांच्या वरवंट्यापुढे आज जगातील बहुतांश ठिकाणच्या संस्कृतींचे मूलस्वरूप आज नष्ट झालेले आहे. किंबहुना, इस्लामचा प्रभाव अरबस्तानाच्या जवळच्या ज्या इजिप्त आदी प्रदेशांत पसरला, तिथे वसाहतीकरण व्यवहारांचे स्वरूप हेच राहिले आहे. त्यामुळे वसाहतवादाचा हा गुणधर्म ख्रिस्ती ‘रिलीजन’ऐवजी सर्व ‘अब्राहमिक रिलीजन’मुळे आहे, असे म्हणता येईल. परंतु, ‘रिलीजन’च्या प्रसंगी बलपूर्वक विस्तारवादाचा जितका संबंध सांस्कृतिक वसाहतवादाशी आहे, तितकाच तो अन्य सर्व संस्कृतींच्या काहीशा प्राथमिक स्वरूपातील ‘ईश्वर’ संकल्पनांमुळेही असू शकतो.
याच प्राथमिक स्वरूपातील संकल्पनांमुळे असेल; परंतु बर्याच देशांमधील मूळ संस्कृतींविषयी आपण अभ्यास करायला गेल्यास, त्यांच्या ईश्वरविषयक संकल्पना आज उपासनेविषयीच्या विविध रूढी, परंपरा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले उपचार इतक्यात सीमित राहिलेल्या आहेत. या परंपरांचा निर्वाह आपण एक समाज म्हणून का करतो, याचे ज्ञान वसाहती देशांच्या ख्रिस्तीकरणाच्या रेट्यापुढे लुप्त झालेले आहे. स्वाभाविकपणे निर्वसाहतीकरण साधायचे असल्यास किती प्रमाणात या परंपरांचे पुनरुज्जीवन करायचे, हा प्रश्न या सर्व देशांपुढे उभा आहे. त्यातूनच निर्वसाहतीकरणाचे जागतिक प्रतिमान साम्यवादी परंपरेतून पुढे आलेले आणि रूढार्थाने त्यास मानणारे नसले, तरी त्याच संदर्भचौकटीतून सामाजिक अनुभवांकडे पाहणारे आहे. म्हणून, या चिंतनास ‘रिलीजन’चा तिटकारा असणे स्वाभाविक आहे. ख्रिस्ती ‘रिलीजन’ला असणारा साम्यवादाचा विरोध निर्वसाहतीकरणानंतर स्थानिक ‘रिलीजन’कडे वळतो. त्यामुळे वसाहतीकरणाचे मूळ ख्रिस्ती ‘रिलीजन’मध्ये; परंतु निर्वसाहतीकरण मात्र स्थानिक ‘ईश्वर’ संकल्पनांच्या निरपेक्ष, असा तिढा या विचारांमध्ये येतो.
साम्यवादाच्या आधारे किंवा त्याला प्रत्युत्तर म्हणून निर्माण झालेल्या सर्व चिंतनांचा सर्वात महत्त्वाचा दुसरा दोष म्हणजे, त्यांचे मूळ युरोपीय अनुभवातच राहणे. याप्रकारे एखादे सिद्धांतन मांडताना युरोपीय अनुभव तर नाकारले जातात; परंतु त्यांची विचारचौकट कायम राहते. उदाहरणार्थ, काळाची अंधारयुग, पुनरुज्जीवन काळ, प्रबोधन काळ अशी विभागणी ही सिद्धांतने नाकारतात. परंतु, काळाची रेषीय मांडणी आणि त्यांचे एकमेकांहून विभिन्न अशा विविध काळांमध्ये विभाजन हे तत्त्व नाकारत नाहीत. युरोपमधील सामाजिक चिंतनांचे प्रथम रिलीजनच्या आधारे आणि नंतर इहवादाचा आधारे झालेले विकसन आज आपल्यापुढे अभ्यासासाठी आहे. त्याविषयीची साधकबाधक चर्चा प्रत्येक संस्कृतीच्या संदर्भात करता येऊ शकते. त्याआधारे निर्वसाहतीकरणाचे तत्त्व आणि मार्ग कोणते, हे निश्चित करता येते. परंतु, वैचारिक अवकाशाचे असे विकसन इतर संस्कृतींच्या संदर्भात नेमके कसे झाले, याचे नेमके तपशील आज उपलब्ध नाहीत. त्यामुळे जुन्या सांस्कृतिक परंपरांचे पुनरुज्जीवन या सर्व संस्कृतींसाठी एक अवघड प्रकल्प आहे. साम्यवादी मांडणीच्या पार्श्वभूमीतून आलेल्या सिद्धांतनाला युरोपीय वैचारिक विकासाची परंपरा सोडता येत नाही आणि खर्या वैचारिक स्वातंत्र्यासाठी आवश्यक अशी स्वदेशीय वैचारिक विकासाची परंपरा काहीशी लुप्त झालेली आहे. या दुसर्या प्रश्नालाही निर्वसाहतीकरण विचारास सामोरे जावे लागते.
या दोन्ही प्रश्नांच्या संदर्भात भारतीय निर्वसाहतीकरण चिंतनाचा विचार केल्यास, त्यातील वेगळेपण दिसून येते. सर्वप्रथम म्हणजे, भारतीय-संस्कृतीचा प्रवाह सर्व अडथळ्यांना तोंड देऊन आजही टिकून आहे. त्यातील काही परंपरा कालौघात नष्ट झाल्या असतील आणि काहींचा बळी युरोपच्या सांस्कृतिक वसाहतवादाने घेतला असेल. पण, प्राचीन ऋषींच्या चिंतनातून निर्माण झालेली हिंदू-संस्कृतीची धारा आजही आपले मूळ स्वरूप टिकवून आहे. गत सहस्र वर्षांच्या सामरिक, राजकीय व सांस्कृतिक आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर काही नवे प्रवाहही त्यात जोडले गेले आहेत. पण, त्यांचा स्वीकार हिंदुतत्त्वांच्या आधारे झालेला आहे. आज जर महत्त्वाची त्रुटी कोणती असेल; तर या सांस्कृतिक प्रवाहास आपण उपासनापद्धती, व्रतवैकल्ये, पूजाअर्चना या आपल्या समाजजीवनाच्या एका कोपर्यात बंदिस्त केल्या आहेत. परंतु, वैचारिक स्वातंत्र्याचा विचार करताना आपले गंतव्य कोणते, हा प्रश्न भारतीय राष्ट्रापुढे नाही.
विशेषतः ‘रिलीजन’च्या तत्त्वज्ञानाचा विचार केल्यास, त्याचा अतिशय समर्थ प्रतिवाद भारतीय चिंतनात आपल्याला सापडतो. प्राचीन काळी लिहिल्या गेलेल्या उपनिषदांपासून शंकराचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य इत्यादी अनेक ऋषींनी ईश्वरतत्त्वाचे मूळ स्वरूप काय, याविषयीच्या स्वमताचे विवेचन केलेले आहे. हे केवळ बुद्धिगम्य वैचारिक चिंतन नसून, अंतःचक्षूंनी घेतलेला परमात्म्याचा शोध असल्याने आपण त्यास ‘दर्शन’ असे म्हणतो. अशी सहा दर्शने भारतीय वैदिक चिंतनात आपल्याला दिसतात. सहा वैदिक चिंतनांच्या बरोबरीने भारतात बौद्ध, जैन, चार्वाक अशी इहवादी, निरीश्वरवादी, कर्मवादी अशी अनेक चिंतने मांडली गेली आहेत. ईश्वराच्या सत्यस्वरूपाच्या आकलनाचा शोध भारतात स्वस्वरूपाच्या चिंतनापर्यंत येतो. त्यामुळे ख्रिस्ती किंवा अब्राहमिक ‘रिलीजन’ची ईश्वरतत्त्वाविषयीची जी मांडणी आहे, तिला सामावून घेत अनेकपटीने पुढचा पल्ला भारतीय चिंतनाने गाठलेला आहे.
भारतातील ही विविध दर्शने आणि तत्त्वज्ञाने जरी आत्मतत्त्व आणि ईशतत्त्वाच्या स्वरूपाविषयी काही प्रमाणात समान मताची असली, तरी त्यांच्यात बरेच भेदही आहेत. विशेषतः जडविश्वाचे अस्तित्व आणि आत्मतत्त्वाचा त्याच्याशी येणारा संबंध आणि त्यांच्यातील अस्तित्व, याविषयी अनेक मतांतरे हिंदू चिंतनात आढळतात. या दार्शनिक विविधतेमुळे भारतीय अनुभवांची संदर्भचौकट पुरेशी समृद्ध आहे आणि तिच्या विकसनाचे समृद्ध चिंतन आपल्याला उपलब्ध आहे. भारतीय चिंतनाला ऐहिकतेच्या विचारासाठी साम्यवादाच्या किंवा युरोपमध्ये उगम पावलेल्या अन्य कोणत्याही विचारधारेच्या आधाराची गरज नाही. ऐहिकविश्व आणि पारमार्थिक ध्येयाची सांगड कशी घालायची, याचा विचार भारतीय विचारकांनी स्वतंत्रपणे केलेला आहे.
वसाहतवादाच्या वैचारिक श्रेष्ठत्वाचा एक महत्त्वाचा आधार त्यांचे तर्कप्रामाण्य आणि त्याच्या आधारे त्यांनी केलेली गणित व विज्ञानातील प्रगती हा असतो. निर्वसाहतीकरणाचे तत्त्वज्ञान त्यातील तर्कप्रामाण्याच्या श्रेष्ठत्वाला नाकारते. परंतु, वैज्ञानिक प्रगती आणि जडसृष्टीविषयी मानवी ज्ञानात भर पडण्यात युरोपचा वाटा गेल्या काही शतकांत फार मोठा आहे, हे सत्य नाकारता येत नाही. युरोपीय श्रेष्ठत्वाचा विमर्श या मुद्द्याच्या आधारे सुरूच राहतो. भारतीय निर्वसाहतीकरण या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरते. कारण, युरोपच्या वैज्ञानिक प्रगतीचा पाया भारतीय गणितात आहे, हे आता बहुतांशी सिद्ध झालेले आहे. काही तुरळक तपशील सोडल्यास गणित आणि खगोलविज्ञानातील भारतीय संशोधकांच्या कार्याचा परिचय पर्शियन व्यापार्यांमार्फत युरोपात कसा पोहोचला, याची ढोबळमानाने कल्पना आज आपल्याला आहे. युरोपच्या वैज्ञानिक परंपरेवरील भारताचा प्रभाव जरी बाजूला ठेवला, तरी भारताची स्वतःची वैज्ञानिक प्रगती जगाच्या तुलनेत अग्रेसर होती. गणित आणि खगोलशास्त्राबरोबरच धातुविज्ञान, औषधविज्ञान, वैद्यकशास्त्र, भूगोल व नौकानयन, वस्त्रोद्योग आणि संबंधित तंत्रज्ञान, मूर्तिशास्त्र अशा सर्व विषयांमध्ये भारतीय संशोधकांनी तत्कालीन जगाच्या तुलनेत नेत्रदीपक प्रगती केल्याचे इतिहास आपल्याला सांगतो. वैज्ञानिक प्रगतीचा युरोपचा दावा केवळ गेल्या दोन-तीन शतकांपुरता खरा आहे. स्वातंत्र्यानंतर पुन्हा भारताने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संशोधनात झेप घेतली आहे. त्यामुळे वैज्ञानिक प्रगतीचा दाखला देऊन सांस्कृतिक श्रेष्ठत्व मान्य करवून घेण्याचा युरोपचा डाव भारतावर लागू पडत नाही.
या सर्व बाजू लक्षात घेता, वैचारिक निर्वसाहतीकरणाचे नेतृत्व करण्याची क्षमता खर्या अर्थाने केवळ भारतात दिसते. निर्वसाहतीकरणाचा विचार हा ‘स्व’च्या शोधाचा विचार आहे, असे प्रतिपादन जगातील सर्वच देशांच्या विचारवंतांनी केले आहे. या शोधातील मुख्य अडसर म्हणजे, अनेक शतके झेललेल्या वसाहतवादामुळे समाजमनात पसरलेला न्यूनगंड. हा न्यूनगंड आपल्याला भारतीय समाजमानसातही बर्याच प्रमाणात पाहायला मिळतो. परंतु, भारतासाठी तो बराचसा अज्ञानमूलक आहे. जागतिक मानवी समाजाच्या प्रगतीत भारताचा हातभार नेमका किती व काय हे जाणून घेतल्यास, खरेतर भारतीय समाजास स्वतःविषयी पराकोटीचा अभिमान वाटायला हवा. परंतु, वसाहतवादी मानसिकतेतून शिकवलेला भारतीय दैन्याचा इतिहास समाजाला स्वतःवरच शंका घेण्यास भाग पाडतो. अज्ञानाचा पडदा दूर सारल्यास ऐतिहासिक संचितात घट्ट रुजलेला आत्मविश्वास घेऊन वैचारिक वसाहतवाद झुगारून देण्याचे कार्य भारतीय समाजच करू शकतो.
शेवटचा प्रश्न असा उरतो की, भारताचे हे वैचारिक वसाहतवादाच्या विळख्यातून स्वतःला मुक्त करून घेणे, केवळ भारतीय राष्ट्रापुरते सीमित असावे का? भारतीय चिंतन जर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना असेल; तर भारताने जागतिक निर्वसाहतीकरण चळवळीचे नेतृत्व स्वीकारणे हेच खरेतर भारताकडून आणि भारतीय समाजाकडून अपेक्षित असेल. भारताची जीवनदृष्टी मुळात वैश्विकस्वरूपाची असल्याने भारताचे नेतृत्व जगभरात मान्यताही पावेल. त्यामुळे भारताची सहभागीता राजकीय स्वातंत्र्यानंतर वैचारिक स्वातंत्र्याकडे जाणे आणि त्यात जगाच्या नेतृत्वाचा भार स्वीकारणे, हेच आज जागतिकस्तरावर अपेक्षित आहे.
- डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून ‘खगोलशास्त्रा’त ‘पीएच.डी.’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)