
मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हा चित्रपट मागच्या वर्षभराच बराच चर्चेत राहीला. तर आता या मराठी चित्रपटाची २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ (PIFF 2026) मधील ‘मराठी सिनेमा टुडे’ स्पर्धा विभागासाठी निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा महोत्सव आयोजकांकडून करण्यात आली.या निवडीमुळे ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ने एक उल्लेखनीय महोत्सवी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. यापूर्वी या चित्रपटाचे प्रदर्शन बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (BIFF) आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) येथे झाले होते.
आता PIFF 2026 मध्येही स्थान मिळाल्याने सलग नामांकित चित्रपट महोत्सवांमधील ही निवड चित्रपटाच्या आशयमूल्याची तसेच त्याला मिळणाऱ्या वाढत्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओळखीची साक्ष देणारी मानली जात आहे.
१५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ (PIFF 2026) मधील ‘मराठी सिनेमा टुडे’ हा स्पर्धात्मक विभाग समकालीन मराठी चित्रपटांचे प्रभावी प्रतिनिधित्व करणारा महत्त्वाचा विभाग मानला जातो. बदलते सामाजिक वास्तव, आधुनिक दृष्टीकोन आणि सर्जनशील अभिव्यक्ती यांचे प्रतिबिंब उमटवणाऱ्या मराठी चित्रपटांची या विभागात निवड करण्यात आली आहे.
पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने २४वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव १५ ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडणार असून, उद्घाटन सोहळा १५ जानेवारी रोजी सायंकाळी ई-स्क्वेअर चित्रपटगृहात होणार आहे. तर समारोप आणि पुरस्कार वितरण समारंभ बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागासोबतच ‘मराठी सिनेमा टुडे’ विभागात सैकत बागवान दिग्दर्शित ‘सोहळा’, परेश मोकाशी दिग्दित ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ आणि निलेश नाईक दिग्दर्शित ‘द्विधा’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. महोत्सवातील हे चित्रपट एकूण १० वेगवेगळ्या पडद्यांवर प्रदर्शित केले जाणार आहेत.