चहा म्हणजे जणू अमृतपेयच! अनेकांची चहाशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही की कामावरही चहाची चुस्की घेतल्याशिवाय हात चालत नाही. अशी ही चहाची महती. पण, चहा पिण्यावरुन, न पिण्यावरुन बरेचसे सल्ले दिले जातात. तसेच चहाचे हल्ली बाजारात तर अगणित प्रकारही पाहायला मिळतात. तेव्हा, सध्याच्या या गुलाबी थंडीच्या मौसमात अधिकच हव्याहव्याशा वाटणार्या चहावरच आजची ही ‘चाय पे चर्चा...’
पावसाळा आणि थंडी आली की सगळ्यात पहिले हवा तो चहा! इतर पेय आठवणारे असतील हो, पण चहा म्हणजे लहान, थोर, बायका, पुरुष सगळ्यांची रोजची पसंत. ‘चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच,’ असं म्हणणारे म्हणजे खरे दिलखुलास दोस्त. कॉफी हे तसं एकट्याने पिण्याचं पेय वाटतं, पण चहा म्हणजे मैफिलीची गोष्ट. माझा तर अनुभव आहे, ‘आम्ही चहा नाही पित,’ म्हणणारे माणूसघाणेच असतात! (सन्माननीय अपवाद असू शकतात.)
डॉक्टर असून चहाची (उघडउघड) तारीफ करणारी बहुतेक मी एकटीच असेन. पण, आयुर्वेदाची गंमतच अशी आहे की, ते कोणताही पदार्थ ‘खाऊच नका’ असं फार क्वचित सांगतात. तो कसा खावा, केव्हा खावा आणि कशासोबत खावा, याचं उत्तम शास्त्र म्हणजे आयुर्वेद! आजारी माणसाला पथ्य म्हणून खाण्यावर बंधनं घालावी लागतात, ती वेगळी गोष्ट.
चहा मुळात वाईट नाही. त्यामध्ये अॅण्टीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. तो सूज कमी करतो, हृदयासाठी हितकर आहे, पचनाला मदत करतो, मेंदूला तरतरी देतो. तरीही ‘चहा बंद करा,’ असं सांगण्याची वेळ डॉक्टरांवर का येते? तोच तर मुद्दा आहे. एकतर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. किती वेळा किती प्रमाणात चहा पिता, हे बघा. दिवसाला ३०-४० कटिंग पिणारे महाभाग आहेत. मग सूज नाही, तर शरीरातील आवश्यक पाणीही कमी होत जातं. त्यामुळे हृदय, मूत्रपिंड व पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. मलबद्धता होते. मूळव्याधीचा त्रास उद्भवू शकतो.
चहा बनवण्याची पद्धत हा आणखी एक विषय आहे. खरं तर चहा कसा बनवायचा? पाणी उकळलं की त्यात चहापत्ती घाला. झाकण ठेवा आणि गॅस बंद करा. दुसरीकडे दूध चांगलं उकळा. नंतर कपामध्ये चहाचा अर्क व दूध मिसळा. पाहिजे तेवढी साखर घाला आणि ढवळून घेऊन प्या. आता आपल्याकडे चहा कसा बनवतात बघा. गॅसवर पाणी ठेवतात. लगेच त्यात पत्ती घालतात.साखर घालतात. उकळल्यावर त्यात थंड दूध घालतात आणि पुन्हा चांगला तपकिरी रंग येईपर्यंत उकळतात. यामध्ये होतं काय चहामधलं टॅनिक अॅसिड आता बाहेर येतं. चहात उतरतं आणि मग तो चहा अॅसिडिटी करणारा होतो. पाणी, दूध, चहा, साखर मिसळून बासुंदी आटवायला ठेवतात, तिथेही हाच भयानक प्रकार होतो.
आलं घातलेला चहा हा एक लोकप्रिय प्रकार आहे. चहाला आधण ठेवलं की किसून किंवा ठेचून भरपूर आलं त्या पाण्यात घालतात आणि क्रमाक्रमाने साखर, पत्ती, दूध वगैरे घालत उकळवत त्याचं एक अॅसिडिक पेय बनवतात, ज्याचे सगळे चांगले गुणधर्म नष्ट झालेले असतात. आयुर्वेदात आल्याचा रस औषध म्हणून सांगितला आहे, काढा नाही. एकतर चहामध्ये सुंठ किंवा चहामसालाच वापरा आणि तोही चहा पूर्ण होत आल्यावर घाला. आलं घालायचंच असेल, तर तेही चहा होत आला की घाला आणि गॅस बंद करून झाकण ठेवा. म्हणजे पित्त होणार नाही. सतत आलं घालून उकळवलेला चहा पिऊन वातरक्त ( Gout ), युरिक अॅसिड वाढणे, अंगावर पित्त उठणे हेही त्रास उद्भवतात.
दुसरा हल्ली लोकप्रिय झालेला (खरं तर केलेला) प्रकार म्हणजे गुळाचा चहा. ‘साखरेपेक्षा गूळ चांगला असतो’ असा शब्दशः गोड गैरसमज सगळीकडे पसरवला गेला आहे. साखर आणि गूळ यांच्या तुलनेबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन. सध्या चहा आणि गूळ या संगमाबद्दल विचार करू. गूळ हा अग्नी मंद करणारा आहे व मधुमेहाच्या हेतूंमध्ये मुख्य आहे. असं असताना, दिवसांत दोन-तीनवेळा चहाच्या माध्यमातून गूळ रोज पोटात जाणं, हे आजाराला आयतं आमंत्रण आहे. दूध व गूळ हा विरुद्ध आहार आहे, जो अनेक त्वचाविकारांना उत्पन्न करू शकतो. गूळ नेहमी चोथायुक्त पदार्थांसोबत खावा, जसे भाकरी, चणे, शेंगदाणे, तीळ, राजगिरा, डाळी वगैरे.
दुधापासून बनणार्या कोणत्याही पदार्थात गूळ वापरू नये. बिनदुधाचा चहा पिणार्यांनी गूळ वापरायला हरकत नाही, पण तो रक्तातील साखर-मधुमेह वाढवणारच, हे लक्षात ठेवा. चहासोबत नाश्ता किंवा नाश्त्यासोबत चहा हवा असतो. पण, दूध आणि मीठ हा विरुद्ध आहार आहे. त्यामुळे चहा नाश्ता एकत्र घेणे, हे सोरायसिस, कोड अशा आजारांत विशेष अपथ्यकर आहे. पुन्हा चहा स्वतः ‘अॅग्रेसिव्ह’ असल्याने तो स्वतःचेच घोडे पुढे दामटतो आणि सोबतच्या पदार्थाच्या पचनावर विपरीत परिणाम करतो. म्हणून, चहानंतर अर्ध्या तासाने नाश्ता करा किंवा नाश्त्यानंतर दीड तासानंतर चहा घ्या. (हे सर्व नियम कॉफीलाही लागू होतात.)
एवढं सगळं ऐकल्यावर वाटेल, चहा पिऊ की नको?
जरूर प्या, पण..
१) अति उकळू नका.
२) चहामध्ये नेहमी गरम दूध घाला.
३) चहामध्ये आलं घालायचं असेल, तर चहा उकळला की मग घाला. न पेक्षा, चहा मसाला वापरा.
४) साखर नेहमी कपात घाला किंवा चहा उकळला की घाला आणि लगेच गॅस बंद करा
५) दूध घालून केलेल्या चहात गूळ कधीच घालू नका.
६) चहासोबत काही खाऊ नका.
७) कितीही चांगला असला, आवडीचा असला, तरी चहा प्रमाणातच प्या.
आणि ‘वाह.. चहा’ बोला!
- वैद्य चंदाराणी बिराजदार
(लेखिका एम. डी. आयुर्वेद आहेत.)
(आरोग्य भारती, कोकण प्रांताद्वारे प्रकाशित)
(‘आरोग्य भारती’ समाजस्वास्थ्य व प्रतिबंध क्षेत्रात कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. आरोग्य मित्र प्रशिक्षण, विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम, योग व ध्यान प्रशिक्षण, गर्भसंस्कार, व्यसनमुक्ती, वनौषधी प्रचार, सुपोषण, पर्यावरण, घरेलू उपचार, प्रथमोपचार असे विषय प्रांत व जिल्हा स्तरावर टीमने सांभाळले जातात.)