Santosh Dhuri BMC Election 2026: राज ठाकरेंच्या शिलेदाराने सोडली साथ; संतोष धुरी यांचा भाजपमध्ये प्रवेश

    06-Jan-2026   
Total Views |
 
Santosh Dhuri BMC Election 2026
 
मुंबई : (Santosh Dhuri BMC Election 2026) मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका शिलेदाराने त्यांची साथ सोडली आहे. मनसेचे दुसऱ्या फळीतील नेते समजले जाणारे नेते वरळी विधानसभा विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष धुरी यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, सोमवारी, संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. (Santosh Dhuri BMC Election 2026)
 
मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना आ. अमीत साटम म्हणाले की, "संतोष धुरी यांचे मी भाजपमध्ये मनापासून स्वागत करतो. गेल्या ११ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहरात विकास घडवून आणला. वरळीतील बीडीडी चाळीतील मराठी माणसाला तिथेच घर देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दक्षिण मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होण्यापासून रोखले. ज्या मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी संतोष धुरी लढत होते ते कार्य भाजपच्या माध्यमातून होत असल्याने प्रभावित होऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई शहरात हिंदुत्वाचा भगवा रंग टिकावा, मुंबई शहराचा रंग बदलू नये तसेच आतंकवादी, जिहादी आणि देशविरोधी शक्तींविरोधी लढण्यासाठी ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत." (Santosh Dhuri BMC Election 2026)
 
हेही वाचा :  Dasharath Patil : नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील शिवसेनेत
 
एक जागा देऊन आमची बोळवण - संतोष धुरी
 
संतोष धुरी म्हणाले की, "२००७ साली मनसेची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही राज ठाकरे यांच्यासोबत होतो. यादरम्यान, विविध पदे भुषवली. परंतू, आता ज्यांच्यामुळे आमच्यातील लोक तुटून गेली आणि ज्यांच्यामुळे त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला अशा लोकांना राज ठाकरे यांनी जवळ केले. त्यांनी पूर्णपणे पक्षाचा ताबा घेतला आहे. आम्हाला ज्या जागा दिल्या त्यातील ७ ते ८ जागा निवडून येतील की, नाही अशी शंका आहे. आम्हाला ज्या जागा हव्या होत्या त्या दिल्या नाहीत. तर ज्याठिकाणी त्यांना देण्यासाठी उमेदवार नव्हते किंवा त्यांच्या नगरसेवकांची नावे खराब होती, अशा जागा आम्हाला दिल्या. दादर, माहिम, वरळी, शिवडी, भांडूप अशा ठिकाणी मराठी माणसाचा टक्का आणि आमची ताकद जास्त आहे. याठिकाणी आम्ही दोन जागा मागितल्या परंतू, केवळ १ जागा देऊन आमची बोळवण केली," असे ते म्हणाले. (Santosh Dhuri BMC Election 2026)
 
उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून आम्हाला डावलले
 
"मला उमेदवारी दिली नाही याबद्दल मला राग नाही. परंतू, आमचे नेते संदीप देशपांडे यांना जागावाटपाच्या कुठल्याही चर्चेत सहभागी केले नाही. याबद्दल विचारले असता आम्हाला कळले की, वरून झालेल्या तहामध्ये संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोन किल्ले सरेंडर केल्याचे आम्हाला कळले. वांद्रे येथील बंगल्यावरून सांगण्यात आले की, हे दोघेजण कुठेही दिसायला नको. हे आम्हाला कळल्यानंतर मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यामुळे आमच्या अनेक शिलेदारांना डावलण्यात आले," असा दावाही संतोष धुरी यांनी केला आहे. (Santosh Dhuri BMC Election 2026)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....