
यापूर्वी, आबा बागुलांनी पक्षाला ‘राम-राम’ करून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. इतर पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या लोकांचादेखील पक्षाच्या वाढीसाठी लाभ करून घेणे, येथे कोणत्याही काँग्रेस नेत्याला जमत नाही. येथील काँग्रेसचे स्थानिक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तर अक्षरशः वार्यावर सोडल्यासारखीच स्थिती आहे. कोणताही राज्य-स्तरावरील नेता येथे या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत नाही. सतेज पाटील केवळ आघाडी होणार हे सांगण्यासाठी आले होते, त्यानंतर कोणीही साधे फिरकले सुद्धा नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून प्रशांत जगताप काँग्रेस पक्षात आले. ते प्रवेशासाठी मुंबईत येणार आहेत, ही वार्ता जगताप मुंबईत गेल्यावर येथील शहराध्यक्षांना समजली. आम्हाला कोणीही याबाबत कल्पनाच दिली नसल्याची कबुलीही त्यांनी दिली होती. यावेळच्या मनपा निवडणुकीत पुण्यात काँग्रेस पक्षाचे केवळ ३२ ठिकाणी उमेदवार रिंगणात आहेत, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. शरद पवार गटाचीदेखील या काँग्रेस पक्षासारखीच गत आहे. गेल्यावेळी तर येथे या पक्षाचा एकही नगरसेवक नव्हता. लोकाभिमुख चेहरा नसणे हे या पक्षाचे सर्वात मोठे दुखणे असून, तेच आता एखाद्या खोल जखमेसारखे चिघळत चालले आहे. एकूणच काय, तर या निवडणुकीत मनसे आणि उबाठा यांची कोणतीही चलती नसल्याने, सत्तेत येणार्या पक्षासमोर प्रबळ विरोधक कोण? हाच प्रश्न आहे.
अस्तित्व पवारांचे...
जसे या निवडणुकीत पुण्यात काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तसेच शरद पवार या चेहर्याचे अस्तित्वदेखील लयास जात असल्याचेच चित्र आहे. दोन गटांत विभागल्या गेलेल्या शरद पवार-अजित पवारांनी आता एकत्र येण्यासाठी, विविध प्रकारच्या धडपडीही करून बघितल्या. पश्चिम महाराष्ट्रात किमान पवारांचा दबदबा असावा, अशा विचाराचा एक मोठाच वर्ग दरम्यानच्या काळात तयार झाला होता. त्यासाठी काँग्रेस पक्षाला कमी लेखत आणि दुय्यम ठरवत, शरद पवारांनी कितीतरी गुणी काँग्रेसी नेत्यांचे खच्चीकरण केल्याचे अनेकांना स्मरत असेल. या भागातील पवारांनी दूर सारलेल्या काँग्रेस नेत्यांची यादी मोठीच आहे. मात्र, आजतागायत जेव्हा-जेव्हा संधी मिळते, तेव्हा-तेव्हा सोयीचे राजकारण करण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रातील सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी या दोन्ही पवारांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचा इतिहास जुना नाही.
राजकारणात आपले घराणे अबाधित ठेवण्याचीच ही धडपड आहे. जसे काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेबाहेर राहणे सवयीचे झाले आहे, तसेच पवार घराण्याचे किंबहुना, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही झाले आहे. आता तर त्यांची स्थिती अशी आहे की, त्यांचे कुणाशीच जुळत नाही. उबाठाशी काही ठिकाणी त्यांनी काडीमोड घेतला आहे. पुण्यात उबाठा काँग्रेससोबत आहे आणि मुंबईत उबाठासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत तर या दोन्ही पवार गटांची अवस्था केविलवाणी आहे. जसे काँग्रेसवाले भाजपवर आरोप करताना नेहमी सांगतात की, भाजपला काँग्रेसचे नाव घेतल्याशिवाय राहावत नाही. तसेच अजित पवारांचे पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी होऊन बसले आहे. या निवडणूक प्रचारादरम्यान ते भाजपवर तोंडसुख घेतल्याशिवाय गप्प बसत नाहीत, असेच गेल्या दोन-तीन दिवसांतील प्रचारादरम्यानचे चित्र आहे. एकीकडे भाजपसोबत सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावरच टीका करायची, यातून नागरिकांमध्ये वेगळाच संदेश जात आहे. त्यामुळे अजित पवारांची ही टीका त्यांना कसा फटका देईल, हे सांगता येत नाही. एकूणच, आता पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे विभागात त्यांची पकड सैल होत चालली आहे, हेच यातून सिद्ध होते.