'जेएनयू'त डाव्यांची आक्षेपार्ह आणि भडकाऊ घोषणाबाजी, उमर खालिद, शरजील इमामच्या समर्थकांविरोधात तक्रार दाखल

    06-Jan-2026   
Total Views |

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली दंगलीतील उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन देण्यास नकार दिला. यानंतर जेएनयूमध्ये डाव्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान निदर्शकांनी दोन्ही नेत्यांविरोधात आक्षेपार्ह आणि भडकाऊ घोषणा दिल्या. सदर प्रकरणी उत्तेजक घोषणाबाजी करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याबाबत जेएनयूने विनंती केली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, काही निदर्शक पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. संध्याकाळी जेएनयू कॅम्पसमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र येऊन अशा घोषणाबाजी करत असल्याचे व्हिडितून स्पष्टपणे दिसून आले. उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन न मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी खंत व्यक्त केली. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन ने निवेदन जारी करून सांगितले की गुलफिशा फातिमा, मौरान हैदर, शिफा-उर-रहमान, मोहम्मद सलीम खान आणि शादाब अहमद यांना जामीन देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असून त्याच वेळी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना जामीन नाकारणे हे दुर्दैवी आहे.

अशी माहिती आहे की, विद्यापीठातील साबरमती वसतिगृहाबाहेर जेएनयूएसयूशी संबंधित विद्यार्थ्यांनी 'A Night of Resistance with Guerrilla Dhaba' या शीर्षकाखाली एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी साधारण ३० ते ३५ विद्यार्थी उपस्थित होते. ५ जानेवारी २०२० रोजी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या सहाव्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम होता परंतु, उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या जामीन अर्जांवरील न्यायालयीन निर्णयानंतर या कार्यक्रमाचा स्वरूप आणि सूर बदलला. काही विद्यार्थ्यांनी अत्यंत आक्षेपार्ह, भडकावू आणि चिथावणीखोर घोषणा देण्यास सुरुवात केली. हे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा थेट अवमान ठरतो.

त्यामुळे संबंधित कृती जेएनयूच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारी असून, त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था, कॅम्पसातील सलोखा तसेच विद्यापीठातील सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो; असे मत विद्यापीठाने व्यक्त केले. ही कृती संस्थात्मक शिस्त, सुसंस्कृत चर्चेची प्रस्थापित मूल्ये आणि विद्यापीठाच्या शांततामय शैक्षणिक वातावरणाकडे केलेल्या जाणूनबुजून दुर्लक्षाचे द्योतक असल्याचेही विद्यापीठाचे म्हणणे आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जेएनयू युनिटने मंगळवारी वादग्रस्त घोषणांचा तीव्र निषेध केला. डाव्या विचारसरणीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या आंदोलनात सहभागी असल्याचा दावा अभाविपने केला आहे. या घटनेची पोलिस चौकशी व्हावी आणि यात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अभाविप जेएनयू यूनिटचे नेते मनीष चौधरी यांनी दावा केला की जेएनयूचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संयुक्त सचिव, सचिव तसेच माजी पदाधिकारी आणि माजी विद्यार्थी (अलुमनी) हे देखील या घोषणाबाजीच्या वेळी उपस्थित होते. या लोकांनी इतर मुद्दे किंवा आंदोलनाच्या नावाखाली सामान्य विद्यार्थ्यांना गोळा केले आणि नंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या जामीन नाकारण्याच्या निर्णयाविरोधात आणि पंतप्रधान व गृहमंत्र्यांविरोधात वादग्रस्त घोषणा देण्यासाठी प्रवृत्त केले.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक