मुंबई : कला व साहित्याच्या क्षेत्रात अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेल्या संस्कार भारती या संस्थेने अखिल भारतीय भरतमुनी सन्मान २०२५ च्या पुरस्कारार्थीच्या नावांची घोषणा केली आहे. लोककला व दृश्यकला या विभागातील कलाकरांना व हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोककलेच्या विभागात छत्तीसगढ येथील वेदमती शैलीतील प्रख्यात पंडवानी गायिका प्रभा यादव तसेच दृश्यकलेच्या विभागात पुणे, महाराष्ट्र येथील सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना त्यांच्या दीर्घकालीन कलासाधनेसाठी व आपल्या कार्यक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल १ फेब्रुवारी रोजी ठाणे येथे होणाऱ्या भव्य समारंभात अखिल भारतीय भरतमुनी सन्मान-२०२५ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री अश्विन दळवी यांनी सांगितले की, संस्कार भारतीतर्फे दिला जाणारा हा 'अखिल भारतीय भरतमुनी सन्मान' भारतात पंचम वेद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नाट्यशास्त्र” ग्रंथाचे रचनाकार महर्षी भरतमुनी यांना समर्पित आहे. कला माध्यमांतून समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या असाधारण कलाकारांचा गौरव दरवर्षी केला जातो. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी कलाकारांची निवड तज्ज्ञांच्या समितीद्वारे करण्यात आली आहे, त्यांच्या समाजाभिमुख कलासाधनेमुळे आपण प्रेरित झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हा पुरस्कार सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना, पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त व माजी राज्यसभा सदस्या विदुषी सोनल मानसिंह यांच्या हस्ते, तसेच संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. मैसूर मंजुनाथ यांच्या उपस्थितीत रविवार, १ फेब्रुवारी रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रुपये १,५१,०००/- रोख रक्कम असे स्वरूप आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक