स्वतःला मराठी माणसाचे कैवारी असे जे निवडणुकीच्या तोंडावर म्हणवून घेतात, त्या ठाकरे बंधूंनी मुंबई, मुंबईतील मराठी माणूस आणि मराठी अस्मिता यांवर आपल्या वचननाम्यात शब्दाचाही उल्लेख केलेला नाही. केवळ आपले घराणे कायम राहण्यासाठीचा हा अट्टाहास असल्याचेच दिसून येते.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र येत ‘शब्द ठाकरेंचा’ या नावाने संयुक्त वचननामा जाहीर केला. राजकारणात प्रतीके, भावना आणि ब्रॅण्ड यांना अनन्यसाधारण असेच महत्त्व मात्र, निवडणूक जाहीरनामा हा शहराच्या विकासाचा पुढील पाच वर्षांचा आराखडा असतो. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीसाठी तर हा आराखडा अधिक जबाबदारीने, अधिक अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि वास्तवाला धरून असणे अपेक्षित असते. दुर्दैवाने, ‘शब्द ठाकरेंचा’ हा तथाकथित वचननामा वाचल्यानंतर, या अपेक्षांचा संपूर्ण भंग झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. विशेष म्हणजे, हा वचननामा सेनाभवनात प्रसिद्ध करण्यात आला. तब्बल 20 वर्षांनंतर यानिमित्ताने राज ठाकरे हे सेनाभवनात दाखल झाले. इतक्या वर्षांनंतर येथे येताना ‘तुरुंगातून सुटून आल्यासारखी’ भावना असल्याचे राज यांनी म्हटले असून, ते पुरेसे बोलके आहे!
उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्र सरकार आणि भाजपवर अनाठायी टीका केली. ‘आमच्या कामाचे श्रेय घेण्याऐवजी पंतप्रधान मोदी यांनी कैलास पर्वत बांधला आणि गंगा नदी आणली, याचे श्रेयही भाजपनेच घ्यावे,’ असा उपहासात्मक टोमणा त्यांनी मारला. बाकी, आपल्या राजकीय कारकिदत टोमणे मारण्याशिवाय त्यांनी बाकी काय वेगळे केले म्हणा! या वचननाम्यात महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्राबाहेरील अनेक घोषणा करण्यात आल्याचे दिसते. यातील काही विषय हे केंद्र, तसेच राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. म्हणजेच पुन्हा ही आश्वासने केंद्र आणि राज्य सरकारमुळे पूर्ण करता आली नाहीत, असा कांगावा करायला हे दोन्ही ठाकरे मोकळे. अर्थातच, ठाकरे बंधूंना मुंबईकरांनी जर कौल दिला, तरचा हा प्रश्न. त्याचबरोबर काही जुनीच आश्वासने नव्या शब्दांत पुन्हा एकदा देण्यात आली आहेत. ‘ओल्ड वाईन इन न्यू बॉटल,’ असे म्हणतात या प्रकाराला. बाकी ठाकरेंनी आजपर्यंत हेच तर काम केले आहे.
दै. ‘मुंबई तरुण भारत’ने या वचननाम्याचा यथायोग्य असा पंचनामा शनिवार दि. 3 जानेवारी रोजीच्या मुंबई आवृत्तीत यापूवच केलेला आहे. त्यामुळे हा वचननामा जाहीर झाल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसण्याचे काहीही कारण नव्हते.
या वचननाम्याचे नाव ‘शब्द ठाकरेंचा’ असे असले, तरी त्या शब्दांमध्ये मुंबईकरांचा आवाज कुठे आहे, हा खरा प्रश्न! जणू हा जाहीरनामा मुंबईसाठी नसून, केवळ ठाकरेंच्या प्रचारासाठीच लिहिला गेला आहे. आदित्य आणि अमित ही दोन्ही ठाकरेंची पुढील पिढी, हे मान्य. मात्र, मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्या दावणीला बांधलेली खासगी संस्था नसून, ती देशाच्या आर्थिक राजधानीची महानगरपालिका आहे. त्याची निवडणूक लढवताना, ठाकरेंनी मुंबईच्या भविष्यासंदर्भात आपली स्पष्ट भूमिका मांडणे अपेक्षित होते. तसे न होता, पुन्हा एकदा राजकीय टोमणे आणि भावनिक भाषणांपुरतेच हे सादरीकरण मर्यादित राहिले.
राज ठाकरे शहरीकरण, शहरांचे सौंदर्य, नियोजन याबाबत आपणच जाणकार असल्याचा दावा सातत्याने करत आले आहेत. काही वर्षांपूव त्यांनी मुंबईच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ही सादर केली होती मात्र, या संयुक्त वचननाम्यात शहरी नियोजनाबाबत एकही ठोस, नोंद घेता येईल, असे आश्वासन नाही. शहरी सौंदयकरण म्हणजे काय, सार्वजनिक जागांचा विकास कसा करणार, पादचारी, सायकलस्वार, सार्वजनिक मोकळ्या जागा यांचा विचार कसा करणार, यावर त्यांनी सोयीस्कररित्या मौन पाळले आहे. या वचननाम्यात मुंबईच्या वाहतुकीचाही विचार करताना केवळ ‘बेस्ट’पुरतेच विषय मर्यादित ठेवण्यात आले आहेत. मेट्रो, उपनगरी रेल्वे, जलवाहतूक, पार्किंग धोरण, वाहतूक व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर, ठोस भूमिका मांडलेली नाही. पर्यावरणाच्या नावाने आंदोलन उभे करणाऱ्या ठाकरे बंधूंनी या वचननाम्यात, मिठी नदीची अवस्था, पावसाळ्यातील पूरस्थिती, नाल्यांची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन यावर कोणतीही ठोस भूमिका नाही. पर्यावरण म्हणजे फक्त झाडे आणि जंगल एवढेच नसते. नद्या, नाले, समुद्रकिनारे हेही त्याचाच अविभाज्य भाग आहेत, हे बहुधा विस्मरणात गेलेले दिसते. विकासाच्या बाबतीतला उद्धव यांचा गोंधळ पुन्हा एकदा जाणवतो.
मुंबईतील मराठी शाळांचा प्रश्न गंभीर असाच. मराठी माध्यमाच्या शाळा मोठ्या संख्येने बंद पडत आहेत, विद्यार्थ्यांची संख्या घटत असून, या शाळांतील शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, स्वतःला ‘मराठी अस्मितेचे रखवालदार’ म्हणवणाऱ्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात, मराठी शाळांच्या पुनरुज्जीवनाचा साधा उल्लेखही नाही! मराठा अस्मितेवर व्यासपीठावर ‘टाळ्यांची वाक्ये’ घ्यायची, प्रत्यक्ष धोरणात मात्र हीच अस्मिता बासनात गुंडाळून ठेवायची, हेच ठाकरेंचे धोरण राहिले आहे. वचननाम्यातून ते ठळकपणे समोर येते, इतकेच. मुंबईचे समुद्रकिनारे, डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर, या विषयांवरही यात भाष्य नाही. शहराच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी निगडित असलेल्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे, केलेले दुर्लक्ष हे गंभीर असेच.
संजय राऊत यांनी ठाकरे परिवाराचा ‘हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली’ असा उल्लेख केला आहे तसेच असेल, तर मग 20 वर्षे ठाकरे कुटुंब विभागलेले का होते? याचे उत्तरही त्यांनीच द्यावे. स्वतः मुंबईत केलेली कामे सांगण्यासारखी नसल्यामुळेच उद्धव ठाकरे यांना मोदी, फडणवीस आणि भाजपवर टीका करावी लागत आहे. विकासावर बोलण्याऐवजी उपहासावर भर देणे, हे कमकुवतपणाचेच लक्षण. एकूणच हा वचननामा मुंबईसाठी नाही, मुंबईकरांसाठी नाही, तर केवळ एका घराणेशाहीचे राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठीचा निकराचा प्रयत्न आहे. तथापि, हा प्रयत्न फसलेलाच आहे. मुंबईला ’व्हिजन’ हवे आहे, योजना हव्यात, धाडसी निर्णय हवेत. भावनिक घोषणा आणि राजकीय टोमणे मुंबईकरांच्या प्रश्नांचे उत्तर ठरू शकत नाही. त्यामुळे ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा मुंबईच्या विकासाचा दस्तऐवज म्हणून नव्हे, तर ‘संधी असूनही न वापरलेली संधी’ म्हणूनच इतिहासात ओळखला जाण्याची शक्यता अधिक. मुंबई, मराठी माणूस आणि मराठी अस्मिता यांच्या नावाने गळे काढणाऱ्यांना वचननाम्यातही या मराठीचाच विसर पडला, हे मुंबईकर आणि मराठी माणसाचे दुर्दैव, असे खेदानेच नमूद करावे लागेल.