नवी दिल्ली : (Rahul Gandhi) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांवरून भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक परदेश दौरे करणारे विरोधी पक्षनेते असल्याचे सांगत, त्यांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये भारतविरोधी भूमिका दिसून येते, असा आरोप केला. तसेच काँग्रेस सरकारही आमंत्रित करीत नाही अशा राहुल गांधींना परदेशातून आमंत्रणे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधींना वारंवार परदेशात कोण बोलावतं?
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शनिवारी सांगितले की, "मलेशिया, कोलंबिया आणि जर्मनीनंतर राहुल गांधी आता व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेले आहेत. राहुल गांधी परदेशात गेले की भारताविरुद्ध विषारी टीका करणे हे त्यांचे नेहमीचे झाले आहे. त्यांच्या मागील दौऱ्यांमध्ये अनेक संशयास्पद भारतविरोधी व्यक्तींशी भेटी आणि विधाने समोर आली आहेत. ज्या राहुल गांधींना काँग्रेसशासित राज्यांमधील मुख्यमंत्री, शाळा, विद्यापीठे फारसे आमंत्रित करत नाहीत, त्यांना परदेशात पुन्हा कोण आणि का आमंत्रित करते? राहुल गांधी परदेशात जाऊन भारताच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम करतात. त्यांनी काँग्रेसकडे मागणी केलीकी, राहुल गांधींना परदेशात कोण लोक आणि कोणत्या उद्देशाने आमंत्रित करतात, हे स्पष्ट करावे.
हिंदूंच्या मुद्द्द्यावर काँग्रेस असंवेदनशील आणि पक्षपाती
याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांबाबत मौन बाळगल्याचा आरोप केला. “गाझाच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेस नेते मायक्रोफोनला चिकटून राहतात; मात्र बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा प्रश्न उपस्थित होताच केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश पत्रकार परिषदेतून उठून निघून जातात. हे काँग्रेसमधील हिंदूंविषयीच्या अनादर, तिरस्कार आणि पक्षपाती वृत्तीचे दुर्दैवी उदाहरण आहे,” अशी टीका त्रिवेदी यांनी केली.
दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी आणि अमेरिकेतील काही राजकीय नेत्यांमधील जुन्या भेटींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत, त्यांच्या आंतरराष्ट्रीय संपर्कांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या सर्व आरोपांवर काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\