मुंबई : (Donald Trump On Colombia) अमेरिकेने व्हेनेझुएलावर हवाई हल्ला करत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नीला अटक केलं आहे. निकोलस मादुरो यांच्यावर आता अमेरिकेत खटला चालवला जाणार आहे. मात्र, अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या या कारवाईवर जगातील अनेक देशांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच व्हेनेझुएला सरकारने या हल्ल्याला 'साम्राज्यवादी हल्ला' असे म्हटले आहे.
अमेरिकेच्या कारवाईनंतर व्हेनेझुएलाच्या लष्कराने आता देशाच्या नवीन अंतरिम राष्ट्रपती म्हणून डेल्सी रॉड्रिग्ज यांना मान्यता दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर दुसऱ्या लष्करी हल्ल्याची धमकी दिली आहे. नव्या नेतृत्वाने वॉशिंग्टनच्या अटी मान्य न केल्यास व्हेनेझुएलाला पुन्हा एकदा लष्करी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
कोलंबियालाही लष्करी कारवाईची धमकी, ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॅटिन अमेरिकेतील कोलंबियाला थेट लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, "कोलंबिया देखील खूप आजारी देश आहे. ज्यावर एका आजारी व्यक्तीचे राज्य आहे, ज्याला कोकेन बनवायला आणि ते अमेरिकेला विकायला आवडते. मात्र, ते तो जास्त काळ करू शकणार नाही", असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावेळी एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांनी ट्रम्प यांना प्रश्न विचारला की, अमेरिका कोलंबियाविरुद्ध लष्करी कारवाई करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प सूचकपणे उत्तर दिले की, "मला ते योग्य वाटतं."
ट्रम्प यांचा 'या' तीन देशांना इशारा
२०१६ रोजी व्हेनेझुएला या देशावर हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी तीन देशांना थेट इशारा दिला आहे. ड्रग्स उत्पादन करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्या लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको, क्युबा आणि कोलंबिया या देशांना डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला असून वेनेझुएलानंतर तुमच्या देशांवर हल्ले होऊ शकतात असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
अमेरिका-व्हेनेझुएलामध्ये वाद काय आहे?
अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश असलेल्या व्हेनेझुएलाचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणले गेले आहेत. व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दुसरीकडे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे ड्रग्ज तस्करीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या दरम्यान त्यांनी व्हेनेझुएलावर अनेक निर्बंध देखील लादले आहेत. गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेचे हे पाऊल वसाहतवादी असल्याची टीका व्हेनेझुएलाकडून करण्यात आली होती.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\