सोमनाथ स्वाभिमान पर्व - १,००० वर्षांची अढळ श्रद्धा

    05-Jan-2026
Total Views |

भारतावर झालेली परकीय आक्रमणे हा भारताच्या सांस्कृतिक तेजाला ग्रहण लावण्याचा तो प्रयत्न होता. मात्र, काळाच्या ओघात हे आक्रमक इतिहासाच्या स्मृतीपटलावर नाहीसे झाले. भारताच्या या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या श्री सोमनाथ मंदिरावरील पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्षे झाली. यानिमित्ताने या मंदिराचा इतिहास, राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात त्याचे महत्त्च या अंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेख...

सोमनाथ‌’ हा शब्द उच्चारताच आपल्या मनात आणि हृदयात, अभिमानाची भावना जागृत होते. हे भारताच्या आत्म्याचे शाश्वत प्रकटीकरण आहे. हे भव्य मंदिर, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या गुजरात राज्यातील ‌‘भास पाटण‌’ येथे स्थित आहे. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्ये भारतातील 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे. या स्तोत्राची सुरुवातच ‌‘सौराष्ट्रे सोमनाथं च‌’ने होते. यातून पहिल्या ज्योतिर्लिंगाच्या रूपात सोमनाथचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वच अधोरेखित होते. असे म्हटले जाते की,

सोमलिङ्गं नरो दृष्ट्वा सर्वपापैः प्रमुच्यते|
लभते फलं मनोवाञ्छितं मृतः स्वर्गं समाश्रयेत्‌‍॥

याचा अर्थ आहे की, केवळ सोमनाथ शिवलिंगाच्या दर्शनानेच मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो, त्याला मनोवांछित फळ प्राप्त होते आणि मृत्यूनंतर तो स्वर्गात स्थान मिळवतो.

दुर्दैवाने ज्या सोमनाथावर कोट्यवधी लोकांची श्रद्धा होती आणि ज्याची ते प्रार्थना करत असत, त्याच मंदिरावर परकीय आक्रमकांनी हल्ले केले; ज्यांचा हेतू भक्ती नसून विद्ध्वंस हाच होता. सोमनाथ मंदिरासाठी 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. या महान तीर्थक्षेत्रावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला, एक हजार वर्षे पूर्ण होत आहेत. जानेवारी 1026 मध्येच महमूद गझनवीने या मंदिरावर हल्ला केला होता. एका हिंसक आणि रानटी आक्रमणाद्वारे, श्रद्धा आणि नागरी संस्कृतीचे हे महान प्रतीक नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न होता. तरीही, एक हजार वर्षांनंतरही हे मंदिर आजही तितक्याच वैभवात उभे आहे. कारण, सोमनाथच्या वैभवाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी असंख्य प्रयत्न केले गेले. अशाच एका महत्त्वपूर्ण टप्प्याला 2026 मध्ये 75 वर्षे पूर्ण होत आहेत. दि. 11 मे 1951 रोजी या जीर्णोद्धार झालेल्या मंदिराचे दरवाजे, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या उपस्थितीत एका सोहळ्याद्वारे भक्तांसाठी उघडण्यात आले होते.

एक हजार वर्षांपूव 1026 मध्ये सोमनाथवर झालेले पहिले आक्रमण, त्यावेळच्या नगरवासीयांवर ओढवलेल्या क्रौर्याचे आणि या आक्रमणात मंदिराची झालेली प्रचंड नासधूसीचे वर्णन विविध ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सविस्तरपणे आले आहे. ते वाचून आपले हृदय हेलावून जाते. प्रत्येक ओळ दुःख, क्रौर्य आणि काळाच्या ओघातही न पुसल्या जाणाऱ्या वेदनांनी भरलेली आहे. याचा भारतावर आणि लोकांच्या मनोबलावर काय परिणाम झाला असेल, याची कल्पना करा. सोमनाथला मोठे आध्यात्मिक महत्त्व होते. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असल्याने, आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेल्या समाजाला ते बळ देत असे, ज्यांचे समुद्रमार्गाने व्यापार करणारे व्यापारी आणि दर्यावद या मंदिराच्या वैभवाच्या गाथा दूरदूरपर्यंत कथन करत असत. तरीही, मी आज पूर्ण अभिमानाने आणि निस्संदिग्धपणे हे सांगू इच्छितो की, सोमनाथवर पहिल्यांदा झालेल्या आक्रमणाला एक हजार वर्षे उलटून गेल्यानंतरही, आजचा इतिहास त्या विनाशासाठी ओळखला जात नाही; तर हा इतिहास भारतमातेच्या कोट्यवधी पुत्रांच्या अभेद्य साहसासाठी आणि धैर्यासाठीच ओळखला जातो.

सुमारे एक हजार वर्षांपूव अर्थात 1026 मध्ये मध्ययुगीन काळात पाशवी वृत्तीचा उदय झाल्यापासून, त्यांनी इतरांना सोमनाथवर वारंवार आक्रमणे करण्यास प्रेरित केले होते. एका अर्थाने ती आपल्या संस्कृतीला आणि लोकांना गुलाम बनवण्याच्या प्रयत्नांची सुरुवातच होती. मात्र, ज्या ज्या वेळी या मंदिरावर हल्ले झाले, त्या त्या वेळी त्याचे रक्षण करण्यासाठी महान स्त्री-पुरुष उभे ठाकले आणि प्रसंगी त्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदानही दिले. पिढ्यान्‌‍पिढ्या आपल्या महान संस्कृतीतील लोकांनी स्वतःला सावरले आणि प्रत्येकवेळी या मंदिराची पुनर्बांधणी करून, त्याचा जीर्णोद्धारही केला. ज्या भूमीने पुण्यलोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वांना घडवले, त्याच भूमीत जन्म घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. भाविकांना सोमनाथाची पुन्हा प्रार्थना करता यावी, यासाठी अहिल्याबाई यांनीच अतिशय उदात्त भावनेने प्रयत्न केले होते.

1890च्या दशकात स्वामी विवेकानंद यांनी सोमनाथला भेट दिली होती, या भेटीतील अनुभवाने त्यांनाही अंतर्मुख केले. 1897 मध्ये ते जेव्हा चेन्नईत एका व्याख्यानासाठी गेले, त्यावेळी त्यांनी या भेटीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‌’दक्षिण भारतातील काही प्राचीन मंदिरे आणि गुजरातचे सोमनाथ मंदिर, आपल्याला शहाणपणाची अगाध शिकवण देतील. कोणत्याही पुस्तकांपेक्षा, ही मंदिरेच आपल्याला आपल्या इतिहासाची अधिक सखोलपणे जाणीव करून देतील. या मंदिरांवर झालेल्या शेकडो आक्रमणांच्या खुणा आणि त्यानंतर शेकडो वेळा झालेले पुनरुज्जीवन काळजीपूर्वक अनुभवा. ही मंदिरे सातत्याने उद्ध्वस्त केली गेली, तरीही प्रत्येकवेळी आपल्या अवशेषांमधून ती फिनिक्स पक्षाप्रमाणे ताकदीने पुन्हा उभी राहिली. हीच आपली राष्ट्रीय मानसिकता आहे, हाच आपला राष्ट्रीय जीवनप्रवाह आहे. याचे अनुकरण करा, हाच मार्ग तुम्हाला वैभवाकडे नेईल. जर तुम्ही हा मार्ग सोडलात, तर तुमचा विनाश निश्चित आहे. ज्या क्षणी तुम्ही या जीवनप्रवाहातून बाहेर पडाल, त्या क्षणी तुमच्या पदरी केवळ मृत्यू आणि सर्वनाशच असेल,‌’ या शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या होत्या.

स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचे पवित्र कार्य, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या सक्षम व्यक्तिमत्त्वाच्या हाती आले. 1947 मध्ये दिवाळी सणाच्या काळातच सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथला भेट दिली होती. त्यावेळी ते तेथील परिस्थिती पाहून इतके हेलावले की, त्यांनी तिथल्या तिथेच मंदिराच्या पुनर्बांधणीची घोषणा केली. अखेर, दि. 11 मे 1951 रोजी सोमनाथमधील भव्य मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले गेले आणि त्या ऐतिहासिक प्रसंगी डॉ. राजेंद्र प्रसाद स्वतः उपस्थितही होते. दुर्दैवाने हा ऐतिहासिक दिवस पाहण्यासाठी महान सरदार वल्लभभाई पटेल हयात नव्हते; परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि आज ते एका भव्य मंदिराच्या रूपात खंबीरपणे संपूर्ण देशासमोर आहे.

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना या घडामोडीबद्दल फारशी आस्था नव्हती. माननीय राष्ट्रपती किंवा कोणत्याही मंत्र्यांनी या विशेष समारंभात सहभागी होऊ नये, असे त्यांना वाटत होते. या समारंभामुळे भारताबद्दलचे मत वाईट होत आहे, असे ते म्हणाले. परंतु, डॉ. राजेंद्र प्रसाद आपल्या मतावर ठाम राहिले आणि पुढे जे झाले, तो इतिहास सर्वज्ञात आहे. सरदार पटेलांना भरघोस पाठिंबा देणाऱ्या कन्हैय्यालाल मुन्शी यांचा उल्लेख केल्याशिवाय, सोमनाथ मंदिराचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी सोमनाथ मंदिराबद्दल लिहिलेले पुस्तक ‌‘सोमनाथ - द श्राइन इटर्नल‌’ हा एक अतिशय माहितीपूर्ण दस्ताऐवज आहे. मुन्शीजींच्या पुस्तकाचे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. आपल्या संस्कृतीने आत्म्याचे आणि चिरंतन विचारांचे अमरत्व मान्य केले आहे. जे चिरंतन आहे, त्याचा नाश होऊ शकत नाही अशी आपली ठाम मान्यता आहे. गीतेत म्हटलेच आहे, ‌‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि|‌’ सोमनाथ मंदिर काळाशी व अनेक संकटांशी झुंज देऊन, आज दिमाखात उभे आहे. आपल्या संस्कृतीच्या अविनाशी आत्म्याचे, चैतन्याचे सोमनाथ मंदिराहून समर्पक दुसरे कोणते उदाहरण असू शकते? आपला देश शतकानुशतकांच्या आक्रमणांवर, वसाहतवादी लुटालुटीमधून आलेल्या दैन्यावर मात करून, आज जगभरात प्रगतीचे प्रतीक मानले जात आहे आणि त्याच्या मुळाशी हेच चैतन्य आहे. आपली जीवनमूल्ये आणि जनतेचा दृढनिश्चय, यामुळेच भारत आज सर्व जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सर्व जग भारताकडे आशा आणि आकांक्षेने पाहात आहे. आपल्या नवोन्मेषशाली तरुणाईमध्ये त्यांना उद्याची आशा दिसत आहे. आपली कला, संस्कृती, संगीत व वैविध्यपूर्ण सण जगभरात लोकप्रिय होत आहेत. निरोगी जीवनासाठी आवश्यक असलेल्या योग आणि आयुर्वेदाचा प्रभाव सर्व जगात वाढत असून, जगाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे उपाय भारताकडून मिळत आहेत.

अनादि काळापासून सोमनाथाने विविध क्षेत्रांतील लोकांना एकत्र आणले आहे. शतकांपूव, आदरणीय जैन भिक्षु कलिकाल सर्वज्ञ हेमचंद्राचार्य हे सोमनाथ येथे आले होते. असे सांगितले जाते की, तेथे प्रार्थना केल्यानंतर त्यांनी पुढील लोकाचे पठण केले, ‌‘भवबीजाङ्कुरजनना रागाद्याः क्षयमुपगता यस्य|‌’ याचा अर्थ असा की, परमात्म्याला नमस्कार, ज्याच्यामध्ये सांसारिक अस्तित्वाची बीजे लोप पावली आहेत, ज्याच्यामध्ये वासना आणि सर्व दुःखाचे मूळ नष्ट झाले आहे.‌’ आजही सोमनाथला, मन आणि आत्मा यांच्यात जागृती करण्याची क्षमता आहे. 1026 मधील पहिल्या आक्रमणानंतर हजारो वर्षांनंतरही सोमनाथच्या समुद्राची गाज आजही तशीच आहे, जशी ती तेव्हा होती. आजही सोमनाथच्या किनाऱ्याला धडकणाऱ्या लाटा एक कथा सांगतात. काहीही होवो, त्या लाटांप्रमाणे पुन्हा पुन्हा त्याचे तरंग उठतात. ‌‘विनाश‌’ या शब्दाला समानाथ असणारे गतकाळातील आक्रमणकर्ते, आता हवेत विरून गेले आहेत. इतिहासाच्या पानांवरील तळटीपांप्रमाणे ते उरले आहेत. दुसरीकडे सोमनाथ तळपत क्षितिजापार आपले तेज पसरवत, आपल्याला 1026 मध्ये झालेल्या आक्रमणानेही क्षीण न झालेल्या शाश्वत आत्म्याचे स्मरण करून देत आहे. सोमनाथ एक आशेचे गाणे आहे, जे आपल्याला सांगते की, एका क्षणासाठी विनाश करण्याचे सामर्थ्य द्वेष आणि कट्टरतेमध्ये असेल; मात्र चांगुलपणावरील श्रद्धा आणि दृढ विश्वास यांच्या सामर्थ्यामध्ये, अनंत काळाची सृजनक्षमता आहे.

हजारो वर्षांपूव सोमनाथ मंदिरावर आक्रमण झाले आणि सातत्याने हल्ले होऊनही सोमनाथ मंदिर पुन्हा उभे राहू शकत असेल, तर आपणही आपल्या महान राष्ट्राला आक्रमणांपूव असलेल्या हजारो वर्षांपूवच्या वैभवापर्यंत निश्चितच पुन्हा पोहोचवू शकतो. श्री सोमनाथ महादेवाच्या आशीर्वादाने, एक विकसित भारत घडवण्याच्या नव्या संकल्पाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत, जिथे आपल्याला सांस्कृतिक वारशातून संपूर्ण जगाच्या कल्याण्ाासाठी कार्य करण्याचे मार्गदर्शन मिळेल. जय सोमनाथ!

- नरेंद्र मोदी