गेली चार दशके रांगोळी आणि चित्रकलेतून भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणार्या कलाकार प्रकाश सुखराम नवाळे यांच्याविषयी...
कलेचा वारसा हा शब्दांत नाही, तर जगण्यातून पुढे नेला जातो. हाच मंत्र उराशी बांधून, गेली चार दशके आपला रंगमय प्रवास अखंड सुरू ठेवणारे नाव म्हणजे प्रकाश सुखराम नवाळे. शिक्षकाच्या घरात जन्म, कष्टांची शिस्त आणि मनात खोलवर रुजलेली चित्रकलेची ओढ या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला हा प्रवास आज पनवेल, रायगडपासून थेट पॅरिसपर्यंत पोहोचला. प्रकाश यांचे बालपण रायगड जिल्ह्यातील चिर्लेत विंदाने या छोट्याशा गावात गेले. त्यांचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. शिक्षणाची शिस्त, संस्कारांची बैठक आणि साधेपणाची शिकवण त्यांना घरातूनच मिळाली. पाच भावंडांपैकी सर्वांत लहान असलेल्या प्रकाश यांच्यावर, कुटुंबातील मोठ्या भावंडांच्या कर्तृत्वाचा मोठाच प्रभाव होता. मोठे बंधू अॅड. भारत नवाळे गेली २५-३० वर्षे वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत, तर बहिणी जयंती लोहारे (ओएनजीसी) आणि विजया म्हात्रे (सिडको) या सरकारी सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. सर्वच भावंडांनी आपापल्या क्षेत्रांत ठसा उमटवला असून, याच वातावरणात प्रकाश यांचीही घडण झाली.
प्रकाश यांचे औपचारिक शिक्षण ‘बीएस्सी’पर्यंत झाले असून, शिक्षणानंतर त्यांनी विविध रासायनिक कारखान्यांत काम केले. रात्रपाळी, कामाचा ताण आणि मनाला न पटणार्या दिनचर्येमुळे त्यांनी नोकरी सोडून, स्वतःचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. तरीही, लहानपणापासून मनात घर करून बसलेली कला त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. साधारण सातवीत असतानाच प्रकाश यांना चित्रकलेची खरी गोडी लागली. शाळेतील रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा, हे त्यांच्या हक्काचे व्यासपीठ झाले. मिळणारी बक्षिसे, शिक्षकांचे कौतुकचे बोल आणि पाठीवर पडणार्या शाबासकीच्या थापा या सार्यांनीच त्यांच्या आत्मविश्वासाला बळ दिले. अकरावी, बारावी आणि पदवी शिक्षणाच्या काळात प्रकाश यांनी, अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही सहभाग घेतला. बारावीत असताना एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या चित्राला, तब्बल ८३ महाविद्यालयांतून द्वितीय पारितोषिक मिळाले. हा प्रकाश यांच्या प्रतिभेचा पहिला मोठा सार्वजनिक स्वीकार होता.
आज गेली सुमारे ४२ वर्षे प्रकाश नवाळे हे पनवेल आणि रायगड जिल्ह्यात, रांगोळी व चित्रकलेसाठी ओळखले जातात. पनवेलमध्ये दरवर्षी दिवाळीनिमित्त आयोजित होणारे भव्य रांगोळी प्रदर्शन, हे प्रकाश यांच्या कार्याचे मूर्त स्वरूप आहे. २५ ते ३० कलाकार या प्रदर्शनात, आपले कलाविष्कार सादर करतात. ‘पनवेल रंगावली’ या संस्थेच्या माध्यमातून, गेली दहा-१५ वर्षे हा उपक्रम अखंड सुरू आहे. तरुण आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांना घडवता यावे हाच या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचेही प्रकाश ठामपणे सांगतात.
"रांगोळी आणि चित्रकला हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अनमोल वारसा आहे. तो जपून, पुढच्या पिढीकडे सोपवला पाहिजे,” असेही प्रकाश सांगतात. आम्ही उद्या नसू, पण आमची कला टिकली पाहिजे हा विचारच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. विशेष म्हणजे या संस्थेशी डॉक्टर, इंजिनिअर, रिक्षाचालक अशा विविध क्षेत्रांतील कलाकार जोडलेले आहेत. दैनंदिन काम सांभाळत ते कलेसाठी वेळ काढतात, हीच खरी सांस्कृतिक ऊर्जा आहे. २०१५ पासून प्रकाश यांनी चित्रप्रदर्शनांचीही सुरुवात केली. पहिले प्रदर्शन त्यांनी पनवेलमध्येच भरवले. मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांऐवजी पनवेललाच प्राधान्य देण्यामागे, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याची भूमिका होती. या पहिल्या प्रदर्शनानंतर त्यांच्या चित्रांनी मुंबई, पुणे, नाशिक, गोवा, कोलकाता, कुलू-मनाली अशी प्रदीर्घ मजल मारली. विशेष आनंदाची बाब म्हणजे, त्यांच्या चित्रांना पॅरिसमधील प्रदर्शनातही स्थान मिळाले आणि नवेलच्या मातीतील कलाकार जागतिक व्यासपीठावर पोहोचला.
आपल्या प्रवासाकडे वळून पाहताना प्रकाश सांगतात, "मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी माझ्याकडून अधिकाधिक ज्ञान घ्यावे, अशी माझी अपेक्षा असते. कारण सुरुवातीला मला खूप अडचणी आल्या. प्रोफेशनल रांगोळीचे रंग, त्यांचा वापर, उपलब्धता या सार्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. शेजारच्या एका काकांनी मार्गदर्शन केले. तीच मदत आज मी माझ्या विद्यार्थ्यांनाही देतो, जेणेकरून त्यांना माझ्यासारखाच संघर्ष करावा लागू नये.” प्रकाश यांच्या कार्याची दखल घेत २०२१ मध्ये त्यांना, ‘रायगडभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२२ मध्ये ‘उरण-द्रोणागिरीभूषण’ आणि पुण्यातील ‘गुरुगौरव’ पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला. २०२१ मध्ये, दहा देशांतील कलाकारांच्या चित्रांमधून त्यांच्या चित्रांची ‘टॉप टेन’मध्ये निवड झाली. ‘कलाविष्कार अकादमी’च्या माध्यमातूनही ते, विविध वयोगटांतील मुलांना कलेचा वारसा देत आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण कलाप्रवासात त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करून, आता स्वतंत्र प्रॅटिसही सुरू केली आहे. रंगांशी निष्ठा, संस्कृतीशी बांधिलकी आणि पुढच्या पिढीसाठी असलेली तळमळ यांचा संगम म्हणजे प्रकाश नवाळे. प्रकाश यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा.