कॅरम हा खेळ भारतात घराघरात खेळला जाणारा खेळ. अनेक सोसायटी, अनेक संस्थांचे वार्षिक कार्यक्रम किंवा अगदी चार मित्र जमल्यावर हमखास या खेळाच्या स्पर्धा सुरु होतात. मात्र, हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळला जात असून, या खेळाच्या वाढीसाठी अनेकांचे बहुमोल योगदान आहे. अशाच काही खेळाडूंचा लेखात घेतलेला आढावा...
‘स्ट्राईक अॅण्ड पॉकेट टेबल गेम’ असा इंग्रजाळलेला शब्द वाचला की, कदाचित आपण एखाद्या युरोपियन खेळाबाबत तर बोलत असल्याचा भास होतो. जर असा विचार एखाद्याच्या मनात येत असेल, तर ते चुकीचे ठरेल. ‘स्ट्राईक अॅण्ड पॉकेट टेबल गेम’ याचा सरळसरळ अर्थ आहे, घरोघरी खेळला जाणारा कॅरम! कामावरून घरी आल्यावर, रविवारचा दिवस घालवण्यासाठी, नाताळची सुटी असो किंवा उन्हाळ्याची मोठी सुटी असो, या काळात वेळ घालवण्यासाठी बहुसंख्य भारतीयांच्या आवडीच्या खेळात सापशिडी, पत्ते, बुद्धिबळाबरोबरच कॅरमचाही आवर्जून समावेश असतो. लहान मुलांना सुटीत शिकायला जशी छोटीशी सायकल आणून दिली जाते, तसेच लहान आकाराचे कॅरमही आजकाल बाजारात सहज उपलब्ध असतात. किशोरवयीन असो वा वयस्कर, कॅरम बोर्ड अनेकजणांकडे हमखास असतोच. आता कॅरम खेळणार्यांपैकी काहीजण हौशी असतात, तर काहीजण व्यावसायिक. खूप आधीपासूनच कॅरम हा खेळ घरोघरी लोकप्रिय झालेला आहे. जेव्हा घराबाहेर खेळायला जायला ‘कोरोना’ काळात परवानगी नसायची, त्या काळातही अनेक जण घरात कॅरम खेळत असायचे. गरीब असो अथवा श्रीमंत, फ्लॅटमध्ये,बंगल्यामध्ये राहणारे असोत किंवा चाळीत राहणारे, यांपैकी अनेकांकडे कॅरम हमखास आढळणारच.
कोरोनाच्या काळात तर ‘सेल्यूलॉइड के सितार्यां’च्या मदतीला सुद्धा, हा ‘स्ट्राईक अॅण्ड पॉकेट टेबल’चा खेळच धावून गेला होता. सेल्यूलॉइड के सितारे म्हणजे, चित्रपटसृष्टीतील पडद्यावर चमकणारे तारे होय! याचे ठळक उदाहरण म्हणजे, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर. कोरोना काळात अनेक पुरुष मंडळी स्वयंपाकघरात काही पदार्थ करायला शिकत होते. पण अनिल कपूरला ना तर स्वयंपाक करायचा होता, ना काही सर्जनशील काम करायचे होते. म्हणून त्याने त्याची पत्नी सुनीता कपूरसोबत, कॅरम खेळण्यासारखे सोपे आणि आरामदायी काहीतरी निवडलेे. एका वृत्त समुहाने या जोडप्याचा कॅरम खेळतानाचा फोटोही प्रसिद्ध केला होता. अनिल कपूरनेही एक छोटेखानी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. कॅरम बोर्डवरील राणी पटकावत त्यात अनिल कपूरने म्हटले होते की, ‘आणि सामन्याचा विजेता आहे... मी (अर्थातच.)’ अनेक वृत्तपत्रे, व्यापारी अस्थापने त्यांच्या वर्धापन दिनी कर्मचारीवर्गात क्रिकेट, बुद्धिबळ यांसारख्या विविध स्पर्धा घेतल्या जातात, त्यात कॅरमचाही आवर्जून समावेश असतो.
अशा या लोकप्रिय कॅरमची नेमकी उत्पत्ती काहीशी अस्पष्ट आहे; परंतु १८व्या शतकात भारतीय उपखंडात त्याची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. काही सिद्धांत असे सूचित करतात की, भारतीय राजामहाराजांनी या खेळाचा शोध लावला होता. पंजाबमधील पटियाला येथील राजवाड्यात सापडलेले काचेच्या कॅरम बोर्डासारखे पुरावे, या दाव्याला समर्थन देतात. पहिल्या महायुद्धानंतर विशेषतः जनतेत हा खेळ खूपच लोकप्रिय झाला. १९व्या शतकाच्या सुरुवातीला भारतातील विविध राज्यांमध्ये, या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धांचेही आयोजन होत असे. एके काळी मनोरंजन म्हणून खेळला जाणारा कॅरम, आता एकट्या भारतात सुमारे दोन कोटी लोक खेळत आहेत. हा खेळ भारतीय उपखंडाबरोबरच, पश्चिमेकडेही मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. जगभरात त्याची लोकप्रियता वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन आणि संबंधित खंडीय महासंघांद्वारे नियंत्रित केला जातो.
आपण आता महाराष्ट्राने कॅरमला दिलेल्या योगदानाबद्दल बोलूया. ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना’ ही राज्यातील खेळांच्या विकासासाठी आणि ऑलिम्पिक चळवळीला चालना देण्यासाठी काम करणारी प्रमुख संस्था आहे. ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटने’च्या कामकाजात आणि निवडणुकीत ज्यांना मतदानाचा अधिकार असतो, अशा ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटने’चे असोसिएट मेंबर असलेल्या कॅरम खेळाच्या अरुण केदार यांची आपण ओळख करून घेऊया.
‘महाराष्ट्र कॅरम संघटने’चे सन्माननीय सचिव, मुंबई जिल्हा कॅरम संघटनेचे मानद सरचिटणीस, ‘भारतीय कॅरम संघा’चे प्रशिक्षक, कॅरमसाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, तसेच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केलेले, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅरमपटू, भारतीय कॅरम संघाचे माजी कर्णधार असे कॅरममध्ये मोठे नाव कमावलेल्या मुंबईच्या अरुण केदार यांच्याशी कॅरमसंदर्भात चर्चा करत असताना, आम्ही खेळांसंबंधित सरकारी पुरस्कारांबद्दलही चर्चा केली. तेव्हा मागे माझ्या कानांवर आलेली बातमी मी सांगितली. ती बातमी अशी होती, की महाराष्ट्र शासनाने क्रीडा पुरस्कारांसाठी नवीन नियमावली आणली होती, ज्यामध्ये बॉडीबिल्डिंग, पॉवरलिफ्टिंग, बिलियर्ड्स-स्नूकर, अॅक्वेस्ट्रियन (अश्वारोहण), गोल्फ आणि यॉटिंग या खेळांबरोबरच, कॅरमलादेखील वगळण्यात आले होते. आजच्या स्थितीबाबत अरुण केदार यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, "होय, हे खरं आहे. पण आता सरकारने त्यात बदल केला असून, आता कॅरमसहित या सर्व खेळांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामध्ये अरुण केदार यांनी मोलाची भूमिका घेतली होती. त्यासाठी क्रीडा संघटनेतील सर्वांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे काम अरुण केदार यांनी केले होते. याठिकाणी अजून एक नमूद करायला हवे की, अरुण केदार हे जसे श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते कॅरमपटू आहेत, तशाच त्यांच्या पत्नी अनुपमा यादेखील श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आहेत.
१९५४ साली ‘महाराष्ट्र कॅरम संघटना’ची स्थापन झाली. ७१ वर्षांची दीर्घ परंपरा महाराष्ट्रात कॅरम या खेळाला आहे. त्यापूर्वीदेखील हा खेळ खेळला जात असे. महाराष्ट्राने देशाला तीन विश्वविजेते कॅरमपटू दिले आहेत, पुण्याचा योगेश परदेशी, मुंबईचा प्रशांत मोरे आणि मुंबई उपनगराचा संदिप दिवे. महाराष्ट्रात आज ३० आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आहेत, ५६ राष्ट्रीय विजेते कॅरमपटू आहेत, ५४ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पंच मंडळी आहेत. २५ जणांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले असून, १४८ राज्य विजेते आहेत. दरवर्षी दहा ते १२ मोठ्या स्पर्धांचे आयोजन होत असते. २०१५ पासून राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्र आयोजित करत आलं आहे. एका वर्षी तर पुण्यातच कॅरमच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये कॅरम लोकांना नीट समजण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतही धावते समालोचन केले जाते.
अनेकजण असे असतात की, ज्यांना कॅरमच्या खेळातील स्ट्रोक्सची नावं माहीत नसतात. पूर्वी अनेकजणांनी क्रिकेटसंदर्भात ‘फॉरवर्ड शॉर्टलेग’ला एकनाथ सोलकर झेल घेतो, हे रेडिओवर समालोचनात ऐकले असेल. पण ‘फॉरवर्ड शॉर्टलेग’ हे नेमके स्थान कुठे असतं, हे कळतं नसे. पण जेव्हा दूरदर्शनवर सामने दिसू लागले, तेव्हा बेदी,चंद्रशेखर, प्रसन्नाच्या फलंदाजाने टोलवलेल्या चेंडूचे झेल अधिकतर सोलकरच का व कसा घेत असे! क्रिकेटसारखे कॅरमचे शॉट्सही लोकांना कळायला हवेत, म्हणून कॅरमनेही तसेच चालू केले आहे. ‘महाराष्ट्र कॅरम संघटने’चे आता संकेतस्थळही आहे. ही संघटना ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ व ‘ट्विटर’वरदेखील असून, त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनेलही आहे. जवळपास तीन हजार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॅरमपटूंचे सामने, युट्यूब चॅनेलवर आज उपलब्ध आहेत. दोन लाखांच्या आसपास सब्स्क्रायबर असून, ७ कोटी, ८८ लाख, २९ हजार, ६२१ एवढी प्रेक्षकसंख्या आहे. क्रिकेटसारख्या खेळांची ज्याप्रमाणे सांख्यिकी आकडेवारी उपलब्ध असते, तशी आकडेवारी आता कॅरमचीपण करून देण्यासाठी अरुण केदार आणि त्यांचे सहकारी सध्या कार्यमग्न आहेत. कॅरमपटूंची, सामन्यांची माहितीच्या संकलनाबरोबरच सर्वेक्षण, विश्लेषणातून मिळणारी माहितीही आता वापरली जात आहे.
दि. २ ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान मालदीव येथे झालेल्या कॅरमच्या विश्वचषक स्पर्धेत, पुण्याच्या अभिजीत त्रिपणकर याने दोन सुवर्णपदके आणि एक कांस्यपदक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. पुण्यातील एका कार्यक्रमात अभिजीत त्रिपणकरचा नुकताच सत्कारही झाला. त्याच कार्यक्रमात विश्वविजेते ज्येष्ठ कॅरमपटू योगेश परदेशी यांचाही, ’युएस ओपन’ स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच छत्रपती पुरस्कार विजेते अनिल मुंडे यांनी सलग तीनवेळा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवत आपल्या कारकिर्दीतले ३०वे अजिंक्यपद मिळवले म्हणून त्याला, आणि उदयोन्मुख कॅरमपटू आयुष गरुड याने ग्वाल्हेर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला म्हणून त्यालाही गौरविण्यात आले. आजकाल कॅरमपटूंबद्दलही असे वरचेवर काही ना काहीतरी ऐकू येऊ लागले आहे. पुरुष कॅरमपटूंप्रमाणेच महिलादेखील, कॅरम खेळामध्ये राज्याचे- देशाचे नाव जसे उज्ज्वल करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी सोमवारच्या ‘क्रीडाविश्व’ या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या साप्ताहिक सदरात, ‘कारागृहातील चतुरंग सेना’ हा येरवडा कारागृहातील कैद्यांवर आधारित लेख आपण वाचला असेल. त्यात आपण बुद्धिबळपटू केतन खैरे पती-पत्नींची ओळख करून घेतली होती. कैद्यांमध्ये बुद्धिचातुर्य बर्याच प्रमाणात आढळते. यातील अनेकजण कारागृहातून सुटल्यावर, आपल्या बुद्धिचातुर्याचा आणि तंत्रकौशल्यांचा उपयोग सत्कारणी लावण्याचे ठरवतात. क्रीडावृत्तीद्वारे मानसिक आणि भावनिक कल्याण वाढवून सामाजिक परिवर्तन आणि पुनर्वसन सुलभ करण्याचे उद्दिष्ट ठेवूनच, कारागृह प्रशासन कैद्यांना बुद्धिबळ, बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस अशा विविध खेळांमध्ये प्रशिक्षण देते. विश्वचषक विजेते कॅरमपटू योगेश परदेशी हेदेखील त्या उपक्रमात सहभागी होते.
योगेश परदेशी यांना आपण आज ‘जागतिक विजेता कॅरमवीर’ म्हणून ओळखत असलो, तरी त्याचे युवा अवस्थेपासूनचे खडतर जीवन समजून घ्यायचे असेल, तर त्यासाठी अजून एका संपूर्ण लेखाची गरज पडेल. योगेश सांगतो की, "प्रत्येक खेळाला योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असते, पण माझ्याबाबतीत मी कधीच असे केले नाही. मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांचे निरीक्षण करून माझा खेळ शिकलो. मी कष्टाने माझ्या चुका ओळखू लागलो आणि त्या स्वतःहून सुधारण्याचा प्रयत्न केला. कॅरमसाठी मला इतके काही सहन करावे लागण्याचे एक कारण म्हणजे, आमची गरिबी आणि माझ्याभोवती असलेली निरक्षरता.” येरवड्याजवळील सुभाष नगर या झोपडपट्टीत वाढलेल्या योगेशने पुण्यातील लहान-मोठ्या स्पर्धा जिंकत, जवळपास राज्यातील प्रत्येक स्पर्धा जिंकली. लहानपणी आई आणि आता पत्नी यांची घरून मिळणारी भक्कम साथच, त्याला ‘कॅरमवीर’ बनवू शकली. यशस्वी झाल्यावरही राजन झरेकर आणि नितीन बोरा यांच्या सहकार्याला योगेश विसरला नाही. योगेशचा असा प्रवास सुरु असतानाच, ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’ने हेरले आणि आपल्या सेवेत दाखल करून घेतले. त्यामुळेच तो आपल्या आज खेळात उत्तरोत्तर प्रगती करू शकला. योगेश २००६ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या दुसर्या कॅरम विश्वचषकात, २००८ मध्ये फ्रान्स (कान्स) येथे झालेल्या पाचव्या जागतिक कॅरम स्पर्धेत विश्वविजेता ठरला. २०१० मध्ये अमेरिकेत झालेल्या तिसर्या कॅरम विश्वचषकातही योगेशने विजेतेपदाची मालिका कायम ठेवली.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय खेळांना सशक्त करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत असलेल्या, ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’सारख्या संस्थांकडून आज योगेश परदेशीसारख्या कॅरमपटूची दखल घेतली जाते, हे उत्तमच आहे. तथापि, योगेश परदेशी जेव्हा कॅरम विश्वचषक पटकावून येतो, त्यानंतर सरकार मात्र त्यांची दखल घेताना आढळत नाही ही बाब खटकणारी नाही का! सरकारने परदेशीच्या ‘स्ट्राईक अॅण्ड पॉकेट टेबल गेम’ला परदेशी न मानता आपले मानले तरी पुरेसे आहे. सरकार कॅरमलादेखील अन्य खेळांबरोबर आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचा विचार करत असेल का!
- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)