मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रायगडच्या किनाऱ्यावरुन २०० किलो वजनाच्या आणि सहा फूट लांबीच्या नर ग्रीन सी कासवाचा बचाव कांदळवन कक्ष दक्षिण कोकण विभागाने सोमवार दि. ५ जानेवारी रोजी केला (male green sea turtle). हे अजस्त्र सागरी कासव बागमांडला जेट्टीवर वाहून आले होते (male green sea turtle). यावेळी वन कर्मचाऱ्यांनी स्थानिकांसोबकत या कासवाला चिखलातून बाहेर काढून खाडीत पुन्हा सोडले (male green sea turtle). रायगड जिल्ह्यात प्रथमच नर ग्रीन सी कासव वाहून आल्याचे निदर्शनास आले. (male green sea turtle)
महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात सागरी कासवांच्या पाच प्रजाती आढळतात. आॅलिव्ह रिडले, ग्रीन सी, हाॅक्स बिल, लाॅगरहेड आणि लेदरबॅक या प्रजातींचा त्यात समावेश आहे. यामधील ग्रीन सी कासव हे सोमवार दि. ५ जानेवारी रोजी बागमांडला जेट्टीवर वाहून आल्याची माहिती फेरीबोटीच्या कर्मचाऱ्यांनी वेळास येथील कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांना दिली. त्यांनी ही माहिती कांदळवन कक्षाच्या दक्षिण कोकण विभागाच्या विभागीय अधिकारी कांचन पवार यांना कळवली. पवार यांनी तातडीने वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. घटनास्थळी २०० किलो वजनाचे आणि सहा फूट लांब असणारे अजस्त्र ग्रीन सी कासव चिखलात रुतून पडले होते. हे कासव नर होते. घटनास्थळी पोहोचलेल्या उपाध्ये यांनी वनरक्षक तुषार बटे, आकाश पाडलेकर, तेजस सालदुरकर आणि फेरी बोटीतील कर्मचाऱ्यांसोबत या अजस्त्र कासवाला उचलून खाडीत सोडले.
समुद्रात सोडण्यापूर्वी वनकर्मचाऱ्यांनी या कासवाची तपासणी केली असता, त्याला कुठेही दुखापत झाल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे त्याला आम्ही खाडीत सोडल्याची माहिती कांचन पवार यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. ग्रीन सी प्रजातीची कासवे ही कांदळवनांमध्ये खाद्य शोधण्यासाठी येतात. ती शाकाहारी असून समुद्री गवत खातात. बागमांडला जेट्टीच्या परिसरातील कांदळवनांमध्ये आल्यानंतर या कासवाला ओहोटीचा अंदाज आला नसावा आणि त्यामुळे ते येथील चिखलात अडकून पडल्याची शक्यता उपाध्ये यांनी वर्तवली. ग्रीन सी कासवाच्या नराला मोठी शेपूट असते. त्यावरुनच या कासवाची नर आणि मादी अशी ओळख पटवली जाते. शक्यतो समुद्री कासवांचे नर हे किनाऱ्यावर येत नाहीत. काही अपवादात्मक परिस्थितीमध्येच ते किनाऱ्यावर वाहून येतात. बांगमांडल्यात वाहून आलेले हे नर ग्रीन सी कासव रायगड जिल्ह्यात प्रथमच आढळून आले.