‘राष्ट्र सेविका समिति’ स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारेः दीपज्योतिर्नमोऽस्तुते

    04-Jan-2026
Total Views |
Vandaniya Kelkar
 
मी विवेकानंद म्हणाले, "गरुड पक्षी जरी अत्यंत बलवान असला, तरी त्याला उडण्यासाठी दोन पंखांची जरुरी असते. एका पंखाच्या बळावरती तो उडू शकत नाही. त्याचा कोणताही एक पंख कमजोर असून चालणार नाही. तेव्हा या भारतरूपी गरुडाचा उत्कर्ष साधावयाचा असेल, तर पुरुष आणि स्त्री हे दोन, हे त्याचे दोन्ही पंख बळकट असणे अत्यंत जरुरी आहे.” वंदनीय मावशींना स्वामी विवेकानंदांच्या या वाक्याने खूपच धीर आला आणि या शब्दांनी प्रेरित होऊन स्त्रीच्या जीवनात राष्ट्रीयतेला महत्त्वपूर्ण स्थान असले पाहिजे, याकरिता केलेले कार्य, त्याकरिता निर्माण केलेली संघटनेच्या संस्थापिका वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांच्यावर आधारित हे ‘दीपज्योतिर्नमोऽस्तुते’ हे पुस्तक...
 
१९३०च्या आसपासचा काळ स्वातंत्र्यलढ्याच्या देशभक्ती आणि समाजाभिमुखता यांनी भरलेला होता. नाना विचारधारा आणि विविध कार्यपद्धती यातून असंख्य संस्था-संघटना सुरू झाल्या होत्या. अशा वातावरणात स्त्रियांनीसुद्धा समाजकार्यात भाग घेतला पाहिजे आणि स्वसंरक्षणार्थ सक्षम झाले पाहिजे, या भावनेतून वंदनीय केळकर मावशींनी ‘राष्ट्र सेविका समिति’ची स्थापना केली. त्याआधी काही वर्षे पू. डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. परंतु, ही संस्था केवळ पुरुषांसाठी मर्यादित होती. त्यामुळे डॉक्टरांशी विचारविनिमय करून संघासारखेच; पण संघापेक्षा पूर्ण वेगळी अशी ‘समिति’ त्यांनी स्थापन केली. मुलींनी-महिलांनी एकत्र यावं, अबला न राहता सबला करण्यासाठी लाठीकाठी शिकावी, काही बौद्धिक मार्गदर्शन घ्यावे, अशा सुरुवातीच्या कल्पनेतून वर्गात सुरू झालेली ‘समिति’ देशभर पसरली. ९० वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली आणि अजूनही संस्था चालू आहे, हे विशेष. चूल आणि मूल या परिघाबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करणार्‍या स्त्रिया आजसुद्धा शहरी-निमशहरी भागात जास्त आहेत. इतरत्र कमी, मग ९० वर्षांपूर्वी स्त्रियांना उपलब्ध अवकाश किती मर्यादित होते. तरीही, त्या अवकाशात जितके होईल, तितके संघटन आणि समाजकार्य मावशींनी केले. त्याही स्वतः सहा मुलांच्या आई होत्या आणि तिशीतच वैधव्य नशिबात आलेले. पुस्तकात दिलेल्या त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल थोडं वाचा, म्हणजे या नायिकेबाबत आपल्याला अजून कल्पना येईल.
 
फाळणीच्या आधी ‘समिति’च्या शाखा सिंध प्रांतातही सुरू झाल्या होत्या. त्यातून महिलांना आत्मरक्षणाचे धडे दिले गेले. पाकिस्तानात गेलेल्या सिंध प्रांतातील भगिनींना भेट देण्यासाठी दंगली होत असतानाही, स्वतः मावशी दि. १४ ऑगस्ट १९४७ला कराचीत गेल्या होत्या. नंतर सुमारे १०० युवतींची सोय त्यांनी ‘समिति’मार्फत लावली. अन्यायग्रस्त आणि हिंसाग्रस्त हिंदुबांधवांना आपलं म्हणून साथ देण्याचं मोठं काम त्यांनी केलं. हे रोमांचक प्रसंग पुस्तकात वाचायला मिळतात. गांधीहत्येनंतर संघावरच्या बंदीमुळे ‘समिति’चं काम स्थगित करावं लागलं. त्या दोन-अडीच वर्षांत विस्कळीत झालेली संस्था पुन्हा उभारावी लागली. धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, थोर पुरुष व स्त्रियांची जयंती, त्याचबरोबर ‘रामायणा’वरचे प्रवचन यांतून त्यांनी सेविका जोडल्या. गुण हेरून योग्य जबाबदार्‍या दिल्या. त्यासाठी सदैव फिरतीवरती राहिल्या. या जोडीला घरगुती आघाड्या, आघाडीवरती जिवलगांचे मृत्यू, आर्थिक ताण हे होतेच. ज्याला स्वतःची अशी संस्था सुरू करायची असेल, त्याला काय कष्ट घ्यावे लागते, हे यातून अधोरेखित होते.
 
‘आणीबाणी’ हेसुद्धा संघ आणि समितिवरती आलेले असेच एक संकट. या पुस्तकाच्या लेखिकेने स्वतः समितिमध्ये मावशींबरोबर काम केले आहे, त्यांना अगदी जवळून पाहिले आहे आणि त्या पूज्यतेच्या भावनेतून हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यामुळे मावशींच्या किंवा समितिच्या कामाच्या साधक-बाधक चर्चा किंवा त्यावेळी त्यांच्याविरुद्ध असणारी मतमतांतरे यात नाहीत. मावशींना कोण-कोण सेविका कधी- कधी भेटल्या, त्यांना कुठली जबाबदारी देण्यात आली, याचे बरेचसे तपशील, खूप नावं पुस्तकात आहेत. समितिच्या संबंधित लोकांसाठी ही मोठी पर्वणीच आहे. संस्था आणि प्रसंगांचा उल्लेख आहे. पण, समितिच्या तत्कालीन कामांचा समाजावरती किती प्रभाव पडला होता, हे स्पष्टपणे पुढे येत नाही. असं मला वाटलं, तरी समाजासाठी तन-मन-धन अर्पण करणार्‍या या दीपज्योतीला नमस्कार करण्यासाठी ‘दीपज्योतिर्नमोऽस्तुते’हे पुस्तक नक्की वाचा.
 
२४० पानांच्या या पुस्तकात एकूण २० प्रकरणे असून, त्यातील पहिले प्रकरण हे वंदनीय मावशींचा जन्म, बालपणाविषयी आहे. वंदनीय मावशींचा जन्म अद्भुतरम्य शैशव्य असा असून, अर्थातच मावशींच्या बालपणीचा काळ, त्याचबरोबर शालेय जीवनातील घटनांचा उल्लेख या प्रकरणात वाचायला मिळतो. इसवी सन १९१४च्या जूनमध्ये कमलने (माहेरचे वं. मावशींचे नाव) महाल विभागातील ख्रिश्चन शाळेमध्ये चौथीत प्रवेश घेतला. घरी पुराणातल्या अनेक गोष्टी कमल वडील माणसांकडून ऐकत असे. राम, कृष्ण आणि देवादिकांबद्दल मनात श्रद्धा निर्माण होईल, असेच त्यांच्या घरातील वातावरण होते. राम-कृष्ण जन्मोत्सवानिमित्ताने होणारी कथा-कीर्तने त्या ऐकत असत. शेवटी एक दिवस राष्ट्रीय विचारांच्या हिंदुत्ववादी घरात वाढणार्‍या या मुलीने एकाप्रसंगी आपला विरोध शिक्षिकेपुढे प्रगट केला. तो प्रसंग साधाच होता. येशूची प्रार्थना रोज डोळे मिटून म्हणायची, ही शाळेची शिस्त होती. पण, ते डोळे मिटणे आणि मनात काडीचे प्रेम नसताना येशूची प्रार्थना म्हणणे, हा ढोंगीपणा कमलला असह्य झाला. त्यामुळे कमल प्रार्थनेच्या वेळी डोळे मिटतच नसे व तोंडाने मात्र पुटपुटत असे.
 
एक दिवस शिक्षिकेने ते पाहिले व कमलला दरडावून विचारले की, "तुझे डोळे उघडे का? नियम माहीत नाही का?” त्यावर त्या छोट्या धिटुकल्या मुलीने निर्भीडपणे प्रतिप्रश्न केला, "ते तुम्हाला कसे दिसले?” झाले, शिक्षकेचा भयंकर अपमान झाला आणि कमलला छडीचा प्रसाद मिळाला. मोठेपणीसुद्धा मावशी हा प्रसंग सेविकांना वर्णन करून सांगत असत. दुसर्‍या प्रकरणात वैवाहिक जीवनातील ऊन-पावसाची कथा लेखिकेने मांडली आहे. १९२० साल उजाडले. सासरी येऊन जेमतेम वर्ष झाले आणि त्यांना मातृत्वाची चाहूल लागली. १५ वर्षे पूर्ण झालेली मुलगी आई होणार होती. आजच्या काळात तर आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही. दि. १० ऑक्टोबर १९२० रोजी मावशींना मुलगा झाला. घरातील कामे, लहान मुलांचं करून मावशी वेळात वेळ काढून तेव्हा गांधीजीप्रणीत कार्यक्रमात भाग घेत असत. १९३० मध्ये भाऊसाहेब (मावशींचे यजमान) विषमज्वराने आजारी पडले. मग, मावशींचेही बाहेर पडणं बंद झालं आणि तिसाव्या वर्षी त्यांना वैधव्य आलं. त्यांच्या जीवनातील अशा हलाखीच्या प्रसंगांचे वर्णन लेखिकेने पुस्तकात केले आहे. ते वाचताना डोळ्यातील अश्रूंचे दोन थेंब पुस्तकावरती नक्कीच पडतील.
 
मावशींच्या कसोटीचा काळ झाला. आता त्यांना आपल्या घरसंसाराला सांभाळणे-सावरणे भाग होते. जमाखर्चाची तोंडमिळवणी करणेही जरुरीचे होते. त्याचबरोबर विधवांनी कोणत्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, अशा अनिष्ट रूढी मावशींनी कशा मोडीत काढल्या, लेखिकेने त्यावेळचे प्रसंग तिसर्‍या प्रकरणात वाचकांसोबत सहजपणे; पण खास शब्दशैलीतून उलगडून दाखवले आहेत. याच प्रकरणातून ‘राष्ट्र सेविका समितिची स्थापना शाखा’ हा विषय उलगडत जातो. त्यानंतरच्या सगळ्या प्रकरणांत वंदनीय मावशींची पूजनीय डॉक्टरांशी केलेली चर्चा आणि त्यातून निर्माण झालेली संस्था ‘राष्ट्र सेविका समिति’ आणि त्यांच्या दैनंदिन शाखा-समितिचा विचार, विकास आणि विस्तार क्रमशः कसा केला, याकडे लेखिकेने लक्ष वेधले आहे. संघटनेचे नेतृत्व करणारी व्यक्ती किती नम्र, शीतल, प्रसंगावधान राखणारी असावी, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वंदनीय मावशी. पायी चालण्यात आपला वेळ जातो, म्हणून आपल्याच मुलाकडून त्यांनी सायकल शिकून घेतली, ज्याला आज आपण ‘टाईम मॅनेजमेंट’ म्हणतो, ते त्या काळात मावशींनी अंगीकारले. संघटनेप्रती अत्यंत निष्ठा कशी असावी, याचे उत्तम उदाहरण वंदनीय मावशी!
 
वं. मावशींच्या स्वभावात धर्म, संस्कृती, शील आणि सचोटी हे गुण जन्मतःच होते. त्यामुळे हे सर्व सद्गुण समितिच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये निर्माण करण्याचे त्यांनी त्यावेळी ठरवले. कोणाही व्यक्तीमध्ये सद्गुण निर्माण करण्याचे काम फार खडतर असते. वं. मावशींनी आपले जीवन तसे घडवले. वं. मावशी तत्त्व आणि शिस्त या दोन गोष्टींबाबत अत्यंत कठोर होत्या. भारतीय परंपरेने घालून दिलेल्या आदर्शांनुसार, हिंदू स्त्री सदैव सशक्त, नीतिमान आणि कार्यप्रवण राहावी, यासाठी तिला संघटनेच्या सूत्रात बद्ध करणे, हे समितिचे कार्य आहे. राष्ट्राचे उत्थान व्हायचे असेल, तर स्त्रीशक्तीला एकत्रित आवाहन करण्याची आवश्यकता आहे.
स्त्री ही राष्ट्राची जननी आहे. प्रेम आणि संस्कार करण्याचे गुण तिच्या अंगी असतात आणि पर्यायाने समाज घडविणे हे तिचे आद्यकर्तव्य आहे. ती विशेष कर्तव्यदक्ष आणि कार्यकुशल असायलाच हवी, ही वं. मावशींची शिकवण आणि ‘समिति’स्थापनेच्या वेळी बघितलेले स्वप्न आज पूर्णत्वास जाताना दिसत आहे. स्त्रीशक्ती जागृतीचा वं. मावशींनी आरंभिलेला हा यज्ञ अगणित अशा सेविकांच्या श्रद्धायुक्त श्रम आणि अजोड त्यागाच्या आहुतींनी सदोदित प्रज्वलित ठेवला आहे. ध्येयाबद्दल नितांत श्रद्धा, कार्यवाढीची कळकळ आणि कोणत्याही परिस्थितीत कार्य करीत राहण्याची जिद्द,ही त्यांची विशेषत्वाची त्रिसूत्री. थोडक्यात, त्यांचे जीवन म्हणजे साधारणत्वाकडून असाधारणत्वाकडे उंचावलेला आलेखच आहे, असे म्हणता येईल.
 
वं. मावशींच्या जीवनचरित्रातून कार्य करण्याची अक्षय स्फूर्ती राष्ट्रकार्य करणार्‍या प्रत्येकाने आत्मसात करावी. कारण, हिंदू समाजाला शक्तीसंपन्न करून त्याला परम वैभवाकडे नेण्यासाठी कोणत्या तत्त्वज्ञानाची व कार्याची कास धरली पाहिजे, याची जाणीव करून देण्याचे दायित्व आपल्यावरच आहे. वेळ फार थोडा आहे, तरीही प्रत्येकाने शर्थ करून समाजात तो बदल घडवून आणण्यासाठी वं. मावशींसारख्या आधारवेलीच्या शिकवणीतून सदैव प्रेरणा देणार्‍या, स्त्रीशक्तीचा आविष्कार असलेल्या, वं. मावशी केळकर यांच्यावर आधारित ‘दीपज्योतिर्नमोऽस्तुते’ असे हे पुस्तक लेखिकेने आपल्या सहज लेखनशैलीतून उपलब्ध करून दिले आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. एकाच बैठकीत हे पुस्तक वाचक पूर्ण वाचून हातावेगळे करतील, यात शंकाच नाही. शेवटी, या पुस्तकातील शेवटच्या पानावरील लाखो मुखांतून जे शब्द बाहेर पडले-
 
प्रणाम घे हा कोटी करांचा
कृतज्ञतेने करितो वंदन
राष्ट्र सेविका समिति स्थापून
राष्ट्रभक्तीचा दीपही लावून
कर्तव्याची दिली जाणीव
सर्वस्व तुझे हे देशा अर्पण
 
पुस्तकाचे नाव : दीपज्योतिर्नमोऽस्तुते
 
लेखिकेचे नाव : सुशीला महाजन
 
प्रकाशक : सेविका प्रकाशन, पुणे
 
पृष्ठसंख्या : २४०
 
आवृत्ती : पाचवी
 
पहिली आवृत्ती : गुरुवार दिनांक ०६-११-१९८६
 
मूल्य : १५०/- रुपये
 
- आरती धर्माधिकारी