न्यूयॉर्कचा महापौर ममदानी; आपला महापौर कोण?

    04-Jan-2026   
Total Views |

Mamdani–Umar Khalid Controversy

बांगलादेशमध्ये मुस्लीम कट्टरपंथीयांनी जिवंत जाळलेल्या हिंदू-दलित तरुण दीपू चंद्र दासबद्दल न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी चकार शब्द काढला नाही. मात्र, महापौर झाल्या-झाल्या दिल्ली दंगलीचे षड्यंत्र रचणारा म्हणून आरोपी असलेल्या उमर खालिदला ममदानी यांनी चिठ्ठी लिहिली. यावर भारतातून संताप व्यक्त केला जात आहे. कारण, हा भारतातल्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेपच! या परिक्षेपात झोहरान ममदानी, उमर खालिद, ती चिठ्ठी आणि आपले शहर याचा मागोवा घेणारा हा लेख...

न्यूयॉर्कचे महापौर झाल्या-झाल्या झोहरान ममदानी यांनी (अहो-जाहो करणे अपरिहार्य आहे, नाहीतर अरे-तुरेच करावे अशी ही व्यक्ती!) दि. १ जानेवारी २०२६ रोजी उमर खालिदला चिठ्ठी लिहिली, ”प्रिय उमर, कटुतेबद्दल तुमचे विचार मला अनेकदा आठवतात आणि ती कटुता स्वतःवर हावी होऊ न देण्याचे महत्त्वही जाणवते. तुमचे आई-वडील यांना भेटून आनंद झाला. आम्ही सर्वजण तुमच्याबद्दल विचार करत आहोत.” हे पत्र चर्चेत आले. पण, यात काही नवल नाही. कारण, ममदानी यांचा वैचारिक वारसाच उमर खालिदच्या विचारांच्या तोडीचा असल्याने खालिदशी त्यांची जोडी जमणारच! ममदानी यांची वैचारिक जडणघडण दर्शवणार्‍या दोन घटना- भारतात अयोध्येमध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना न्यूयॉर्कमध्ये याविरोधात कट्टरपंथीयांनी हिंदूविरोधी-भारतविरोधी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व झोहरान ममदानी यांनीच केले होते. त्यावेळी या आंदोलनात हिंदूंबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने करण्यात आली. त्यांनी धादांत खोटे वक्तव्य केले की, "मोदी हे युद्धअपराधी आहेत. त्यांनी गुजरातमध्ये मुस्लिमांचा नरसंहार केला. आता गुजरातमध्ये एकही मुस्लीम शिल्लक नाही.” तर अशा या ममदानींची उमरला लिहिलेली चिठ्ठी याचे संदर्भ विचारात घ्यायला हवी.

मुस्लिमांचे मसिहा दाखवण्यासाठी ममदानींची कट्टरता

सध्या न्यूयॉर्क शहरात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून, शहरात महागाई, घरांची टंचाई, बेघरपणा, वाहतुकीचे प्रश्न, गुन्हेगारी, आरोग्य, पर्यावरण आणि स्थलांतरितांचा प्रश्न या काही प्रमुख समस्या आहेत. कालपरवाच दि. १ जानेवारी रोजी अमेरिकेत एका १८ वर्षांच्या मुलाने शहरात चाकूहल्ला करून हातोड्याची दहशत दाखवत किराणा माल, रेस्टॉरंटमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला. या मुलाचे नाव स्टर्डिव्हेंट असून, तो जन्माने ख्रिश्चन. मात्र, ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने प्रेरित झाला होता. दहशतवादी हल्ल्यात शेकडो लोकांचे जीव जाऊ शकत होते. कोणत्याही शहरात हे घडले असते, तर तिथल्या नेत्यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असती. शहराची, देशाची काळजी वाटली असती; पण न्यूयॉर्कच्या नवनिर्वाचित महापौराला ज्या शहराने, देशाने त्याला महापौर बनवले, त्याला त्याची चिंता नाही; तर त्याला चिंता आहे, दिल्ली दंगलीच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात खितपत पडलेल्या उमर खालिदची‘आम्ही उमर खालिदच्या सोबत आहोत,’ अशी चिठ्ठी ममदानींनी का लिहिली असेल? कारण, आशियाई मुस्लिमांचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा या ममदानींना आहे.

त्यामुळेच त्यांनी न्यूयॉर्क शहराचे ‘अटर्नी’ म्हणून अशा वकिलाची नियुक्ती केली की, त्या वकिलाने ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याचा बचाव केला होता. तसेच झोहरान यांनी इमाम सिराज वहाज याची भेट घेतली होती. वहाजवर १९९३च्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ बॉम्बस्फोटाचे षड्यंत्र रचणार्‍यांशी संबंध ठेवण्याचे गंभीर आरोप आहेत. ममदानी यांनी भारतातील राम मंदिर, ‘सीएए’ आणि ‘वक्फ कायद्या’विरोधात अनेकदा जाहीर वक्तव्ये केली आहेत. दुसरीकडे त्यांनी नेहमीच गाझापट्टीतील मुस्लिमांचे समर्थन केले, तर ज्यूंचा प्रतीकात्मक विरोध केला. आताही कुराणावर हात ठेवून शपथ घेतल्यानंतर त्यांनी ज्यूंचे शिरकाण करणार्‍या नाझींच्या पद्धतीने अभिवादन केले. हे अभिवादन काय उगीच होते? तर त्यातून ज्यू-समुदायला स्पष्ट संदेश होता. तसेच न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर एरिक एडम्स यांनी इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक आदेश पारित केला होता. त्यानुसार, ”इस्रायलच्या विरोधातील कोणतीही कृती ही ज्यूविरोधी मानली जाईल आणि इस्रायलवर कोणताही बहिष्कार टाकला जाणार नाही.” पण, ममदानी यांनी महापौर होताच हा निर्णय रद्द केला.

ज्यू आणि हिंदूंना प्रतीकात्मकरित्या किंवा एनकेनप्रकारे लक्ष्य करण्यामागे ममदानींचा हेतू काय? तर हेतू स्पष्ट होता. जगभरात त्यातही आशिया खंडातील मुस्लीम राष्ट्रे, बहुसंख्य मुस्लीम समुदाय हा गैरमुस्लिमांच्या समर्थनार्थ सहसा नसतोच. ही मनोवृत्ती ‘कॅश’ करण्याचा ममदानींचा प्रयत्न दिसतो. त्यातच न्यूयॉर्क शहरात जवळजवळ नऊ टक्के मुसलमान राहतात, तर ३८ टक्के प्रवासी नागरिक राहतात. हे मुस्लीम बहुतांशी पाकिस्तानी, बांगलादेशी, भारतीय किंवा इतर आशियाई देशाचे आहेत. प्रतीकात्मकरित्या का होईना, हिंदू किंवा ज्यू-विरोधी मानसिकता दर्शवली. दुसरीकडे आपण कट्टर मुस्लीम आहोत हे दाखवले, तर शहरातील मुस्लीम एकगठ्ठा मत आपल्यालाच देतील, याची खात्री ममदानींना होती. झालेही तेच.

ममदानींचा मोदी-विरोध योगायोग की, आणखी काही?

चिठ्ठीद्वारे उमर खालिदची काळजी ममदानींनी का केली असेल? बरं, असा हा उमर खालिद कोण लागून गेला? तो जगाच्या किंवा गेलाबाजार एखाद्या व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करून तुरुंगात गेलेला आहे का? तर अजिबात नाही. २०२० साली दिल्लीत दंगल उसळली. कट्टरपंथीय धर्मांधांनी दिल्लीत अक्षरश: हैदोस घातला. या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू, तर ७०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या दंगलीचे षड्यंत्र रचणारा म्हणून उमर खालिद आणि इतरांवर दहशतवादविरोधी कायदे, बेकायदेशीर क्रिया (रोखणे) ‘अधिनियम, १९६७ यूएपीए’ आणि भारतीय दंड संहिताअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वीही ‘जेएनयू’मध्ये भारताचे तुकडे पडावेत, याअर्थाचे विधान त्याने केले होते, असा आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळे उमर खालिदचे समर्थन कुणीही निष्ठावान भारतीय करणार नाही. पण, ममदानींनी त्याचे समर्थन केले. याआधीही २०२३ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कला जाणार होते. नेमके त्याचदरम्यान उमर खालिदने तुरुंगात बसून जे पत्र, मनोगत लिहिले होते, ते ममदानींनी न्यूयॉर्कच्या सार्वजनिक कार्यक्रमात वाचले. हा योगायोग होता का? असाच योगायोग कालपरवा ममदानींच्या भाषणातही झाला बरं. महापौर झाल्यावरच्या पहिल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नेहरूंनी केलेल्या ‘ट्रियस्ट विथ डेस्टिनी’ या भाषणाचा संदर्भ दिला. या सगळ्यांचा थेट संबंध काय असावा? उमरला सोडा, अशी मागणी अमेरिकेच्या आठ खासदारांनी केली. यातील एक खासदार जैपन शाकोव्स्की आहे. ती आणि हिंदुद्वेष्टी, ‘काश्मीर पाकिस्तानचा आहे,’ असे म्हणणारी एल्हन ओमर या दोघांनाही राहुल गांधी भेटले होते; असे भाजपच्या नेत्यांनी त्या भेटीचे फोटो दाखवत म्हटले आहे.

झोहरान ममदानी यांची जडणघडण आणि...

झोहरान ममदानी यांची आई आहे मूळच्या भारतातल्या; पण आता अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या मीरा नायर, तर पिता आहेत मूळचे भारताचे; पण नंतर युगांडामध्ये स्थायिक झालेले मुहमद ममदानी. मीरा नायर यांचा पहिला विवाह एका ख्रिस्ती व्यक्तीशी झाला होता. मात्र, नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्या ‘मिसिसिपी मसाला’ या चित्रपटासाठी कंपाला येथे गेल्या. तेव्हा तिथे मुहमद ममदानी भेटले. लंडनमधील गरीब निर्वासित लोकांवर चर्चा करता-करता दोघांची मैत्री झाली. याबद्दल स्वतः मुहमद यांनी सांगितले की, "मीरा गरोदर होती (झोहरान त्यांच्या पोटात होते); पण तरीही ती माझ्याशी विवाह करण्यास घाबरत होती. कारण, तिचा पहिल्या विवाहाचा अनुभव चांगला नव्हता.” विवाह करूनही मीरा यांनी ‘ममदानी’ नाव धारण केले नाही. पण, नायर नावाआड भारतीय संस्कृती-नीतिमत्तेवर प्रश्न उपस्थित होतील, असे सिनेमा केले. ‘ए सुटेबल बॉय’ या वेबसीरिजमध्ये त्यांनी मंदिरामध्ये मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलगी लैंगिक चाळे करताना दाखवले. त्यामुळे झोहरान ममदानींची मानसिकता अशी का, हे समजून घेण्यासाठी ही पार्श्वभूमी विशद करणेही आवश्यक होते.

न्यूयॉर्कचा महापौर ममदानी; आपल्या शहरांचा कोण?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, "ममदानी हा १०० टक्के कम्युनिस्ट वेडा आहे. आपल्याकडे कट्टर वामपंथी आधीच आहेत. पण, हा जरा हास्यास्पद आणि भयंकर आहे.” तर, काही अमेरिकन नेत्यांचे म्हणणे आहे की, ममदानी म्हणजे इस्लामिक धार्मिक कट्टरतेचा ‘एलाईट’ मुखवटा आहे, तर ममदानींनी उमर खालिदला चिठ्ठी लिहिणे आणि भारतीय नेत्यांनी त्याला विरोध करणे, यावर उमर खालिदच्या पित्याचे सैयद कासिम रसूल इलियास याचे म्हणणे काय तर, "ममदानी यांनी उमर खालिदला चिठ्ठी लिहिणे, हे भारताच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप कसा असेल? भारतात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आश्रयास आहेत. हे दुसर्‍या देशाच्या (म्हणजे बांगलादेशमध्ये) राजकारणात हस्तक्षेप करण्यासारखे नाही का?” काय म्हणावे? पण, हा सगळा घटनाक्रम पाहून वाटते की, शहरांचेही आपले एक नशीब असते; सुदैवी किंवा दुर्दैवी. न्यूयॉर्कमधील नऊ टक्के मुस्लिमांनी एक गठ्ठा मतदान करत त्या शहराचे त्यांच्या इस्लामिक अजेंड्याप्रमाणे भविष्य ठरवलेले आहे. या परिक्षेपात आपल्या महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह सर्वत्र निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. न्यूयॉर्कचा महापौर ममदानी, मग आपल्या शहराचा महापौर कोण होणार? हे न्यूयॉर्ककडे पाहून तरी निर्धारपूर्वक ठरवायलाच हवे.

 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.