पळसनाथ मंदीर, पळसदेव भिमा नदीच्या कुशीत विसावलेले शिवतत्व

    04-Jan-2026
Total Views |
Palasnath Temple
 
पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात, दौंड-इंदापूर मार्गावर, भीमा नदीच्या शांत वळणावर वसलेले पळसदेव गाव हे महाराष्ट्रातील अशा दुर्मीळ स्थळांपैकी एक आहे, जिथे इतिहास, निसर्ग आणि श्रद्धा एकमेकांत विलीन झालेल्या दिसतात. या गावाच्या सांस्कृतिक स्मरणात सर्वात मध्यवर्ती स्थान आहे, ते पळसनाथ (पालेशनाथ/पालेश्वर) मंदिराचे. हे मंदिर केवळ एक देवस्थान नसून ते नदी, ऋतू आणि काळ यांच्याशी सतत संवाद साधणारे जिवंत स्थापत्य आहे.
 
भिमा नदीवर उभारलेल्या उजनी धरणामुळे तयार होणार्‍या बॅकवॉटरमध्ये पावसाळ्यात हे मंदिर पाण्याखाली बुडालेले असते. शिखराचा थोडा भाग दृश्य असतो. भीमा नदीच्या शांत प्रवाहाजवळ वसलेले पळसदेव हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व धार्मिकस्थळ आहे. हे गाव पुण्यापासून सुमारे १२० ते १२५ किलोमीटर अंतरावर आहे. भीमा नदीवर झालेल्या उजनी धरणाच्या बांधकामानंतर या परिसराचा भूगोल मोठ्या प्रमाणात बदलला, ज्यामुळे येथील अनेक प्राचीन मंदिरे, विशेषत: पावसाळ्यात बॅकवॉटरमध्ये अंशतः बुडून जातात. पळसदेव हे ८०० वर्षांहून अधिक जुन्या मंदिरांच्या समूहासाठी प्रसिद्ध आहे. पालेशनाथ (पळसनाथ) मंदिरासह सारडेश्वर, काशी-विश्वनाथ आणि विष्णू यांसारखी प्राचीन मंदिरे अजूनही येथे स्थित आहेत.
 
पळसदेव येथील मंदिरे टिकाऊ अशा काळ्या बेसाल्ट ( hard black basalt ) दगडाचा वापर करून बांधलेली आहेत, जी त्यांची दीर्घकाळ पाण्याशी संपर्क होऊनही टिकून राहण्याची क्षमता स्पष्ट करते. अनेक वेगवेगळ्या राजघराण्याचा प्रभाव इथल्या स्थापत्यावर आणि कलेवर बघायला मिळतो. पळसनाथ मंदिराचे स्थापत्य प्रथमदर्शनी साधे; पण बळकट वाटते. यात चौकोनी गर्भगृह आणि त्यावर अल्प अलंकरण असलेले माफक उंचीचे शिखर आहे. गर्भगृहातील शिवलिंग लोकपरंपरेनुसार स्वयंभू मानले जाते. पण, याचीही निर्मिती मंदिराच्या बरोबरच झाली असावी. या मंदिराचे शिखर बॅकवॉटरमधून दूरवरून स्पष्टपणे दृश्यमान होते.
 
या समूहातील विष्णू मंदिर (ज्याला ‘श्रीराम मंदिर’ असेही ओळखले जाते) हे द्विदल प्रकारचे असून, ते एका उंच पीठावर
( platform ) उभारलेले आहे. त्याचे मुखमंडप, सभामंडप आणि अंतराळ यांसारखे घटक यादवकालीन स्थापत्यकलेची साक्ष देतात. या मंदिराच्या बाह्य भिंतींवर ‘रामायणा’तील दृश्यांचे अप्रतिम आणि प्रमाणबद्ध कोरीवकाम आढळते, जे महाराष्ट्रात दुर्मीळ मानले जाते. या कोरीवकामांमध्ये हनुमान आणि राक्षसांचे युद्ध, तसेच विष्णूचे अवतार दर्शविलेले आहेत. पळसनाथ मंदिर अनेक महिने पाण्याखाली राहूनही टिकून आहे, हे त्याच्या बांधकाम कौशल्याचे द्योतक आहे.
 
स्थानिक परंपरेनुसार, ‘पळसनाथ’ हे नाव परिसरातील ‘पळस’ ( palas ) वृक्षाच्या दाट वनराईतून आले असावे. पळस वृक्ष भारतीय संस्कृतीत तपस्या आणि यज्ञ यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या शिवलिंगाला ‘पळसनाथ’ (पळसाचा देव) ही संज्ञा प्राप्त झाली असावी. पळसनाथ मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भीमा नदीशी असलेले त्याचे घट्ट नाते. वर्षानुवर्षे पाण्याचे आवरण स्वीकारणारे हे देवालय, जणू शिवाच्या तपस्वी स्वरूपाचे प्रतीक आहे. शिव हा ‘जलसमाधी’ घेणारा योगी मानला जातो, जो प्रवाहामध्ये असूनही आपल्या केंद्रस्थानी स्थिर असतो.
 
जेव्हा दुष्काळ पडतो किंवा पाणी कमी होते, तेव्हा हे मंदिर पाण्यातून वर येते, जणू ते आपल्या भक्तांची विचारपूस करत आहे. मंदिराच्या शिखराची (सुमारे ३० फूट उंचीची) सावली सूर्यास्ताच्या वेळी पाण्यावर पसरते, तेव्हा हे दृश्य अत्यंत विलोभनीय वाटते. हे मंदिर केवळ धार्मिकस्थळ नसून, नदी, धरण आणि संस्कृती यांच्या परस्पर नात्याचे एक जिवंत उदाहरण आहे. हे मंदिर आपल्याला शिकवते की, निसर्गात बदल होत राहतात. पण, श्रद्धा आणि सांस्कृतिक स्मृती टिकून राहतात.
 
हे मंदिर शैव परंपरेशी निगडित असून, स्थानिक लोकांसाठी हे केवळ पूजेचे स्थान नाही, तर गावाच्या अस्तित्वाचा आधार आहे. पिढ्यान्पिढ्या येथे श्रावण, महाशिवरात्र आणि विशिष्ट ग्रामदेवता उत्सवांच्या वेळी पूजाअर्चा केली जाते. विशेष म्हणजे मंदिर पाण्याखाली असले, तरी त्याची पूजा थांबत नाही. श्रद्धेचा हा अखंड प्रवाह पळसनाथच्या महत्त्वाला अधिक गहिरेपण देतो.
इथल्या परिसरात अनेक शिल्पे इतस्ततः पसरली आहेत. असाच एक आडवा दगड दिसतो आणि त्यावर सलग कोरलेल्या काही आकृती दिसतात. ते विष्णूचे विविध अवतार आहेत. मत्स्यावतार हा भग्न झालेला असून, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम आणि शेवटी कल्की असे अवतार दिसतात. मधल्या आकृती फार ओळखता येत नाहीत. या संपूर्ण परिसरात अनेक वीरगळदेखील आहेत. येणार्‍या पिढ्यांना युद्धात हुतात्मा झालेल्या शूरवीरांच्या कथा समजाव्यात, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून या वीरगळांची निर्मिती केली गेली. यांच्याबरोबरच जवळ असलेल्या विष्णू मंदिरावर ‘रामायणा’तल्या अनेक कथादेखील कोरलेल्या दिसतात.
 
इथून जवळच असलेल्या भिगवण भागात ऑक्टोबरनंतर अनेक विविध जातींचे स्थलांतरित पक्षीदेखील दिसायला लागतात. या सगळ्या भागातला प्रवास हा आपल्याला समृद्ध करणारा ठरू शकतो. कदाचित, म्हणूनच तिथे असलेले हे मंदिर आपल्याला सांगत असेल,
शिव येथे बुडलेला नाही;
तो भीमेच्या प्रवाहात ध्यानस्थ आहे.

- इंद्रनील बंकापुरे