मुंबईची लढाई सत्तेसाठी नाही, हिंदू अस्तित्वासाठी! नितेश राणे

Total Views |
Nitesh Rane
 
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व, शहरांमधील सुरक्षा, लोकसंख्येतील बदल, सागरी किनारपट्टीची कडक निगराणी आणि कोळी समाजाच्या प्रश्नांवर स्पष्ट व आक्रमक भूमिका मांडणारे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री, भाजपचे नेते नितेश राणे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन प्रचारात उतरली आहे, तर ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हात घातला आहे. याकडे आपण कसे बघता?
 
हिंदुत्व हा आमच्यासाठी निवडणुकीपुरता मुद्दा नाही, तोच आमचा आत्मा आहे. माझी मंत्री, आमदार ही ओळख तात्पुरती आहे; पण हिंदू म्हणून ओळख शेवटच्या श्वासापर्यंत कायम असेल. आज मुंबईत जे काही सुरू आहे, ते आपण सगळेच पाहत आहोत. मुंबई आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. काही भागांत उभे राहिल्यावर आपण कराची किंवा इस्लामाबादमध्ये आहोत, असे वाटावे. ही परिस्थिती गंभीर आहे आणि ती योग्य वेळी थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. आज हिंदू सणांवर सातत्याने हल्ले होतात, दगडफेक होते, देवतांच्या मूर्तींची विटंबना केली जाते. अशा परिस्थितीत जर हिंदुत्व विचारांचा प्रतिनिधी सत्तेत नसेल, तर आपली मंदिरे, सण आणि आपली सुरक्षितता कशी टिकणार? मराठी-अमराठीचा मुद्दा निवडकपणे फक्त हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी उचलला जातो. मुस्लीमबहुल भागात जाऊन कोणी मराठी बोलण्याचा आग्रह धरत नाही, हे वास्तव आहे. भाजपला मराठीपणाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. मुंबईचा महापौर मराठीच आणि हिंदूच असेल. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हेच आमच्या मराठी अस्मितेचे उत्तर आहे. आम्ही अस्सल हिंदू आहोत आणि जो कडवट हिंदू आहे, त्यालाच महापौरपदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी आम्ही जनतेकडे विनंती करणार आहोत.
 
झोपडपट्टी पुनर्विकास व विकास योजनांनाही ठाकरे आणि काँग्रेस सातत्याने विरोध करतात. ही बाब लक्षात घेता, वाढत्या अनधिकृत वस्त्या आणि लोकसंख्येतील असमतोल रोखण्यासाठी काय पावले उचलावी लागतील?
 
आज मुंबईतील हे वास्तव स्वीकारले पाहिजे. मुंबईत मराठी माणसाचा टक्का सातत्याने कमी होत आहे, तर मुस्लीम समाजाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ‘टीस’सारख्या विश्वासार्ह संस्थेच्या आकडेवारीनुसार, हा आकडा तब्बल ३० टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे. ज्या काळात उद्धव ठाकरेंकडे सत्ता होती, त्या काळात मराठी माणसाची संख्या घटली आणि त्याच वेळी रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली आहे. मुंबई महापालिकेवर ३०-३५ वर्षे कोणाची सत्ता होती? पाण्याचे कनेक्शन, झोपड्यांना संरक्षण, आधारकार्ड, प्रॉपर्टी कार्ड हे सर्व कोणाच्या काळात दिले गेले? रोहिंग्या-बांगलादेशी यांच्या वाढीस संपूर्णपणे ठाकरेंची पालिकेतील सत्ताच जबाबदार आहे. एकीकडे मराठी माणसाला मुंबईबाहेर वसई, विरार, नालासोपारा, कल्याण-डोंबिवलीकडे ढकलले गेले आणि दुसरीकडे मुंबईत कोणाची संख्या वाढली, हे सर्वांनाच माहीत आहे. मराठी माणसाची संख्या वाढायला हवी होती; पण त्याच्यावर अन्याय झाला.
 
घुसखोरांची ही वाढती संख्या मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी किती धोकादायक आहे?
 
आता हिंदूंनी हे समजून घ्यायला हवे की, एकजुटीने मतदान करण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकांत काय झाले, ते सर्वांनी पाहिले. विशिष्ट समाजाने फतवे काढून एकजुटीने मतदान केले. ईशान्य मुंबईत भाजप-एनडीएला भरघोस मते मिळाली; पण मानखुर्द-शिवाजीनगरसारख्या भागात आमचा उमेदवार पराभूत झाला. निकालानंतर निघालेल्या मिरवणुकांमध्ये ‘सर तन से जुदा’, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या गेल्या, मंदिरांसमोर उभे राहून हिंदू समाजाला चिथावणी देण्यात आली. जर अशा विचारांची सत्ता मुंबई महानगरपालिकेत आली, तर उद्या आपण आपल्या घरात साधी सत्यनारायणाची पूजासुद्धा करू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल.
 
मंत्रिपद स्वीकारल्यानंतर आपण सागरी सुरक्षेसाठी कोणती महत्त्वाची पावले उचलली आहेत? सद्यस्थिती काय आहे?
 
मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच आम्ही सागरी किनारपट्टीचे ‘जीआय मॅपिंग’ केले आणि धक्कादायक वास्तव समोर आले. सुमारे ७० टक्के किनारपट्टीवर जिहादी मानसिकतेची घुसखोरी आढळली. त्यामुळे राज्याची ८७७ किलोमीटर लांबीची संपूर्ण सागरी किनारपट्टी ‘जिहादमुक्त’ करण्याचा आम्ही ठाम निर्णय घेतला. सागरी व्यापार, मच्छीमारी, बर्फाचे कारखाने हे सर्व केवळ राष्ट्रभक्तांच्या हातात असतील. देशविरोधी विचारांना येथे कोणतीही जागा नाही. ‘२६/११’सारख्या हल्ल्यांतून समुद्रमार्गे आलेला धोका आम्ही विसरलेलो नाही. म्हणून सागरी सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ड्रोन सर्वेक्षणाद्वारे बेकायदेशीर हालचालींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. १२ नॉटिकल मैलांच्या आत अनधिकृत प्रवेशाला पूर्ण बंदी आहे. कोणीही कितीही मोठा किंवा श्रीमंत असो, कायदा सर्वांसाठी समान आहे. आम्ही देशभक्त मच्छीमारांना बोटी, बर्फाचे कारखाने देऊन सक्षम केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात मी पाच स्टीलच्या आधुनिक गस्ती नौका आपल्या किनार्‍यावर येणार असल्याचे जाहीर केले. लवकरच १५ आधुनिक स्टील गस्ती नौका तैनात होतील. नेव्ही, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त ताकदीने महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी पूर्णतः सुरक्षित केली जाईल.
 
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंसह काँग्रेसनेही विशिष्ट अल्पसंख्याकांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सत्तेत आल्यास ‘खान महापौर होईल’ हा भाजपचा दावा सत्यात येईल, असे वाटते का?
 
उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवण्याची चूक कोणीही करू नये. २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना जेवढी मदत केली, तेवढी मदत कदाचित त्यांच्या नातेवाईकांनाही केली नसेल. मात्र, तरीही ते देवेंद्र फडणवीसांचे होऊ शकले नाही. आज ते ज्या पद्धतीने पक्षप्रवेश करून घेत आहेत, ते अत्यंत बारकाईने पाहिले पाहिजे. जिहादी विचारांना बळ देणार्‍यांना ताकद दिली जात आहे. उद्या जर हे लोक मुंबईच्या सत्तेत आले, तर लंडन, न्यूयॉर्क आणि युरोपमध्ये जे घडते आहे, तीच परिस्थिती मुंबईत निर्माण होईल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. एकदा तिचा ताबा गेला, तर देशासाठी मोठा धोका निर्माण होईल. आमच्यासाठी ही निवडणूक मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही, नगरसेवक येतील, पाच वर्षांत जातील. मात्र, हिंदू म्हणून आम्ही इथे जगूच शकलो नाही, हिंदू म्हणून आम्ही मिरवणूक काढू शकलो नाही, हिंदू म्हणून सिद्धिविनायकाला जाऊ शकलो नाही, हिंदू म्हणून साधे ‘जय श्रीराम’ म्हणू शकलो नाही, हिंदू म्हणून साधे ‘आय लव्ह महादेव’चे बॅनर लावू शकलो नाही, तर आमच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळेच तुम्हाला सुरक्षित राहायचे असेल, तुमच्या कुटुंबीयांसोबत सण साजरे करायचे असतील; तर मतभेद विसरून, जुनी भांडणे विसरून हिंदूंनी एकत्र यावे. जर त्याला मत देऊन हिंदू म्हणून मी मुंबई सुरक्षित राहू शकणार असेल, तर त्यालाच तुम्ही मतदान करावे, असे आवाहन यानिमित्ताने मी करतो.
 
मुंबई महानगरपालिकेत भाजप सत्तेत आल्यास विकासाचा अजेंडा काय असेल? 
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम हे विकासाचे व्हिजन मांडण्यास सक्षम आहेत. मात्र, मी एवढेच सांगेन की, केलेली विकासकामे बघण्यासाठी हिंदू म्हणून तुमचे अस्तित्व तर असले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबईचा विकास होणारच. देवेंद्रजींच्याच माध्यमातून २०१४ ते १९चा आणि आताचाही प्रवास बघा. मुंबईकरांचे आंतरराष्ट्रीय शहर बनविण्याचे प्रत्येक स्वप्न साकारण्याची क्षमता आमच्या नेतृत्वाकडे आहे.
 
मुंबईतील कोळीवाडे, मासळी बाजार आणि मच्छीमार महिलांचे प्रश्न कसे सोडवणार?
 
मुंबईतील मासळी बाजार टिकवणे हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मुंबईतील मासळी बाजार आमच्या कोळी महिलांची फसवणूक करून काढून घेतले जात आहेत. नाव असते आमच्या कोळीबांधवांचे आणि मासे विकायला बसणारा कोणीतरी अब्दुल, खान असतो. यावर आता आम्ही खूप बारकाईने लक्ष ठेवत आहोत. आम्ही मरोळला खूप मोठा मासळी बाजार उभारत आहोत. यामध्ये ‘कोळी भवन’देखील आहे. यात मासेमारी करणार्‍या कोळीबांधवांना अनेक सोयी-सुविधा असणार आहेत. मुंबईत अनेक मासळी बाजारांचा पुनर्विकासही मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने सुरू आहे. सगळ्या पद्धतीचा विकास होईल. मात्र, तो आमच्या कोळीबांधवांसाठी होईल; जो या मुंबईचा मूळ नागरिक आहे. त्यांचे अस्तित्व, त्यांची लोकसंख्या कमी होता कामा नये. या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून मच्छीमारांचा विकास, कोळीवाड्यांचा विकास हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात नक्कीच होणार.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.