२०२५ मधील ‘ऑपरेशन सिंदूर’चा विजय भारताच्या सर्वांगीण शक्तीचे जगाला दर्शन घडवणारा ठरला. लष्करी शक्ती, राजकीय इच्छाशक्ती, नागरिकांचा विश्वास आणि एकी याबरोबरच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारताच्या नेत्रदीपक कामगिरीने सारे जग चकीत झाले. आधुनिक युगातील महत्त्वाचे शस्त्र ठरलेल्या सायबर युद्धातही भारताने केलेली कामगिरी निव्वळ लक्षणीयच! ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने सायबर युद्धाच्या क्षेत्रात केलेल्या कारवाईचा आणि त्याचबरोबर त्याच्या परिणामांचा घेतलेला आढावा...
पाकिस्तानला मोठा मानसिक आणि तांत्रिक धक्का : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘सायबर युद्ध’ हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा घटक ठरला. लष्करी संघर्ष केवळ रणांगणावरच होत नाही, तर ‘सायबर स्पेस’मधूनसुद्धा प्रतिस्पर्ध्याला घायाळ करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. सायबर युद्ध हे चीनच्या ‘मल्टी-डोमेन वॉरफेअर (बहु-आयामी युद्धशास्त्र)’ धोरणाचा एक मुख्य आधारस्तंभ झाले आहे. केवळ पारंपरिक लष्करी कारवायांना पाठिंबा देण्याऐवजी, चीन सायबर क्षेत्राकडे शांततेच्या काळात धोरणात्मक वर्चस्व मिळवण्याचे एक निर्णायक मैदान म्हणून पाहतो. याचे वर्णन अनेकदा, युद्ध न करता विजय मिळवणे असेच केले जाते. भारताने या महिमेमध्ये पाकिस्तान आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या चीनच्या सायबर हल्ल्यांचा प्रभावी प्रतिकार केला आणि त्याच वेळी आक्रमक सायबर धोरणाचा अवलंब क्रून, पाकिस्तानला मोठाच मानसिक आणि तांत्रिक धक्काही दिला. यासाठी भारताने या नव्या युद्ध पद्धतीचे अत्यंत सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन करून, ‘सायबर स्पेस’चा योग्य वापर केल्याचे दिसून येते.
गुप्तचर माहिती संकलन : भारतीय सायबर यंत्रणांनी पाकिस्तानची लष्करी मुख्यालये, दहशतवादी तळ आणि कम्युनिकेशन नेटवर्क यांवर नजर ठेवली. पाकिस्तानातील वायुदल व सेनेच्या काही नेटवर्कमध्ये, भारताने आधीपासूनच प्रवेश करून संवेदनशील आणि कारवाईच्या दृष्टीने महत्त्वाची गोपनीय माहितीही मिळवली.
सायबर संरचनेवर दबाव : पाकिस्तानच्या सरकारी संकेतस्थळांवर, बँकिंग प्रणालीवर आणि लष्करी नेटवर्कवर सतत छोटे-छोटे सायबर हल्ले भारताच्यावतीने करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानी संरक्षण यंत्रणा सतत तणावाखाली राहिली.
युद्धकाळ : युद्धादरम्यान विविध सायबर युद्धांची तंत्रे वापरली.
पाकिस्तानी लष्करी नेटवर्कवर हल्ला: भारतीय सायबर दलाने पाकिस्तानच्या कम्युनिकेशन सिस्टममध्ये व्यत्यय आणला. परिणामी, त्यांची हवाई संरक्षण प्रणालीच काही तास निष्क्रिय झाली. दहशतवादी गट आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील संपर्क तुटल्यामुळे, त्यांच्यातील समन्वय बिघडला.
ड्रोन आणि मिसाईल संरक्षण प्रणालीतील आघाडी : भारतीय सायबर टीमने ड्रोननाशक प्रणालींना ‘हॅक-प्रूफ’ केल्याने, पाकिस्तानकडून येणारे ड्रोन हल्ले यशस्वीपणे परतवता आले. ‘आकाशतीर’सारखे स्वदेशी प्रणालींचे डेटा नेटवर्कही सुरक्षित ठेवण्यात आले.
आर्थिक आणि सामाजिक संरचनेवर परिणाम : पाकिस्तानच्या बँकिंग नेटवर्क, स्टॉक एसचेंज आणि काही वीज वितरण प्रणालींवर, भारताच्या सायबर हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावरच गोंधळ उडाला.
मानसिक युद्ध : समाजमाध्यमांवरून भारताने पाकिस्तानी नागरिकांना, त्यांच्या सैन्याची असफलता दाखवणारे संदेश पोहोचवले. यामुळे पाकिस्तानी जनतेत निराशा आणि सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले.
चीनच्या भूमिकेला प्रतिकार : भारताच्या ‘सीईआरटी इन’ आणि सायबर संरक्षण यंत्रणेच्या मदतीने सायबर हल्ले रोखले. परिणामी, भारतीय ५जी नेटवर्क आणि संरक्षण प्रणालींमध्ये कुठलीही मोठी घुसखोरी चीनला करता आली नाही.
सायबर मुत्सद्देगिरी : युद्धानंतर भारताने जागतिकस्तरावर पाकिस्तान व चीनच्या सायबर आक्रमणांचे पुरावे सादर केले.
चीनची मदत : या सायबर आणि तांत्रिक संघर्षात, चीनकडून पाकिस्तानला पुरवण्यात आलेली मदत एक महत्त्वाचा घटक आहे. चीनने पाकिस्तानला सायबर युद्धात तांत्रिक सहाय्य केले. भारतीय सैन्याच्या हालचालींची माहिती पाकिस्तानला पुरवण्याचे काम चीनने केले. मात्र, भारतीय सायबर संरक्षण यंत्रणा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘अल्गोरिदम’मुळे, चीनचे बहुतेक प्रयत्न अपयशी ठरले.
प्रॉसी हालचाल : पाकिस्तानच्या ‘एपीटी-३६‘ (ट्रान्सपरंट ट्राईब)ने वेबसाईटचे विद्रुपीकरण आणि ‘क्रिमसन रॅट’द्वारे ‘स्पिअर-फिशिंग’सारखे उघड हल्ले केले; तर चीनने यासाठीची सुविधा पुरवली.
मल्टी-व्हेटर हल्ला : भारत पाकिस्तानच्या या युद्धामध्ये १५ लाखांहून अधिक सायबर हल्ल्यांची नोंद झाली. यामध्ये भारतीय रसद (लॉजिस्टिक्स) गोंधळात टाकण्यासाठी, ‘जीपीएस स्पूफिंग’ आणि खोलवर केलेली हेरगिरी लपवण्यासाठी सरकारी पोर्टल्सवरील हल्ल्यांचाही समावेश होता.
हल्ल्याचे स्वरूप आणि ‘ड्युअल-फ्रन्ट’ धोरण : या महिमेमध्ये पाकिस्तानचा वापर, केवळ लक्ष विचलित करण्यासाठी केला जात होता. पाकिस्तानचे ‘एपीटी-३६‘हे गट भारतीय सरकारी वेबसाईट्स हॅक करणे आणि ‘फिशिंग’ ईमेल्स पाठवण्यात व्यस्त होते, जेणेकरून भारताच्या तपास यंत्रणांचे लक्ष तिकडेच राहील. त्याच वेळी चीनचे ’रेडएको’ आणि ’टॅग-२८’ हे गट भारताच्या वीज ग्रीड आणि संरक्षण दलांच्या रसदपुरवठा साखळीत घुसखोरीचा प्रयत्न करत होते. भारताने हे हल्ले कसे परतवून लावले? भारताने केवळ हल्ल्यापासून स्वतःचा बचावच केला नाही, तर शत्रूच्या यंत्रणेवर उलट हल्लाही चढवला.
सक्रिय हंटिंग : भारताच्या सायबर संरक्षण यंत्रणेने चिनी मालवेअरचा शोध घेण्यासाठी, ‘हनीपॉट्स’ तयार केले होते. हे बनावट सर्व्हर्स होते, ज्यांना चीनचे हॅकर्स खरे सर्व्हर समजून त्यात शिरले आणि स्वतःच्या आयडेंटिटी उघड करून बसले.
‘एआय’ आधारित ‘थ्रेट प्रेडिशन’ : भारताने नवीन विकसित केलेल्या ‘एआय’ सिस्टम्सचा वापर करून, असामान्य डेटा ट्राफिक ओळखला. जेव्हा पाकिस्तानकडून १.५ दशलक्ष हल्ले झाले, तेव्हा ‘एआय’ने ते त्वरित ओळखून स्वयंचलितपणे ब्लॉक केले. यामुळे धोकादायक हल्ल्यांचाही सरकारी पोर्टल्सवर काहीही परिणाम झाला नाही.
बॅक-डोर डिटेशन : भारताने वीज ग्रीडमध्ये चीनने लपवलेले ’शॅडोपॅड’ मालवेअर शोधून काढले. हे मालवेअर कार्यान्वित होण्यापूर्वीच, भारताने त्या यंत्रणांना मुख्य नेटवर्कपासून वेगळे केले आणि स्वदेशी सॉफ्टवेअर पॅचेस वापरून ती छिद्रे बंद केली.
शत्रूला निष्क्रिय करण्यासाठी उचललेली रणनीती : केवळ तांत्रिकच नाही, तर धोरणात्मक पातळीवरही भारताने आक्रमक पावले उचलली.
अॅट्रिब्युशन आणि ‘नेम अॅण्ड शेम’ : भारताने पुराव्यासह हे सिद्ध केले की, पाकिस्तानला तांत्रिक बळ चीनच पुरवत आहे. जागतिकस्तरावर या युनिट्सचे नाव घेतल्यामुळे चीनवर राजनैतिक दबाव वाढला.
डिजिटल स्ट्राईक : भारताने केवळ बचावच केला नाही, तर ‘अॅटिव्ह सायबर डिफेन्स’चा वापर करून शत्रूचे ‘कमांड अॅण्ड कंट्रोल’ सर्व्हर्स तात्पुरते निकामी केले. यामुळे चीनच्या हॅकर्सना त्यांच्याच मालवेअरला सूचना देणे कठीण झाले.
माहिती युद्धाला उत्तर : चीन आणि पाकिस्तानने समाज माध्यमांवर पसरवलेल्या खोट्या बातम्यांना खोडून काढण्यासाठी, भारताच्या ‘नॅरेटिव्ह रिस्पॉन्स युनिट’ने २४ तासांच्या आत फॅट-चेक आणि सत्य माहिती प्रसारित केली. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकणारा गोंधळ टळला.
परिणाम : भारतासाठी हा विजय का महत्त्वाचा ठरला?
भारताने मिळवलेल्या यशाने, पाकिस्तानच्या लष्करी आणि आर्थिक संरचनेला धक्का बसला. चीनचे सायबर हल्ले निष्फळ ठरले. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला आणि विश्वासाला धक्का लागू दिला नाही. आंतरराष्ट्रीय समुदायात, भारताची ‘सायबर सामर्थ्यशाली राष्ट्र’ म्हणून ओळख निर्माण झाली.
पायाभूत सुविधांचे रक्षण : इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होऊनही, भारताची वीज ग्रीड, बँकिंग सिस्टम किंवा रेल्वे नेटवर्क एक मिनिटासाठीही कोलमडली नाही.
सायबर डिटेरन्स : भारताने हे दाखवून दिले की, आता भारत सायबर क्षेत्रात केवळ ‘बचावात्मक’ नाही, तर शत्रूच्या घरात घुसून ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचीही क्षमता ठेवतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताच्या सायबर सुरक्षा इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. त्यामुळेच भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘डिजिटल युद्ध’, हा एक महत्त्वाचा टप्पा ठरते.
सायबर रणांगणात भारत विजयी
‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ पारंपरिक रणांगणावर जिंकलेले युद्ध नव्हते, तर ते सायबर रणांगणातही भारताच्या विजयाचे उदाहरण ठरले. पाकिस्तान आणि चीन दोघांनीही, सायबर हल्ल्यांद्वारे भारताच्या सुरक्षेला तडा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताच्या सज्ज आणि बहुआयामी सायबर संरक्षण यंत्रणेमुळे त्यांना यश आले नाही. उलट, भारताने ‘सायबर स्पेस’चा आक्रमक आणि रक्षणात्मक दोन्ही प्रकारे वापर करून शत्रूला पराभूत केले. युद्धानंतरही भारताने पाकिस्तानवर सायबर दबाव कायम ठेवून, त्याला धोरणात्मक पातळीवर मागे रेटले. यावरून स्पष्ट होते की, युद्ध आता केवळ बंदुकी व क्षेपणास्त्रांनी लढले जाणार नाही, तर ‘सायबर स्पेस’वर अधिराज्य गाजवणार्याचे भविष्य सुरक्षित राहील.
मात्र, येणार्या काळामध्ये जास्त आक्रमक होऊन भारताने आपल्या सायबर सीमांचे रक्षण करण्यासाठी, तैवानसोबत एक ‘अनौपचारिक सायबर इंटेलिजन्स ब्रिज’ स्थापित केला पाहिजे. तैवान जागतिकस्तरावर चिनी सायबर हल्ल्यांचा सर्वाधिक सामना करतो आणि त्यांनी प्रगत ‘अॅट्रिब्युशन’ तंत्रज्ञानही विकसित केले आहे. याचा फायदा घेऊन, केवळ प्रतिबंधात्मक उपायांचाच विचार न करता, तैवानच्या धोरणाप्रमाणे प्रतिरोध म्हणून लवचीक प्रारुपाकडे वळणे आवश्यक आहे.
- (नि.) ब्रि. हेमंत महाजन