आकलनाच्या अभावामुळे रहस्यकथा दुर्लक्षित!

प्रख्यात लेखक हृषिकेश गुप्ते यांचे प्रतिपादन

    04-Jan-2026   
Total Views |
 Hrushikesh Gupte
 
सातारा : ( Hrushikesh Gupte ) “ मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा दुर्लक्षित असण्याचे कारण त्यामध्ये असणारा आकलनाचा अभाव हेच आहे.” असे मत प्रख्यात लेखक हृषिकेश गुप्ते यांनी मांडले. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एका परिसंवादात ते बोलत होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की “ भय ही खरे तर आदीम भावना आहे; परंतु भय म्हणजे भूत इथपर्यंतच मर्यादित दृष्टीने आपण पाहिले. वस्तुतः आपले संपूर्ण आयुष्य भीती व गूढपणाने व्यापलेले आहे. भयकथा लेखकसुद्धा रंजनाच्या चौकटीत अडकून राहिले त्यामुळे लेखकांनीही स्वतःला अद्ययावत करणे गरजेचे आहे आणि वाचकांनीही आपले आकलन वाढवायला हवे.”
 
दि. ३ जानेवारी रोजी, ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?’ या विषयावर विशेष परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. यात प्रसिद्ध भयकथा लेखक हृषिकेष गुप्ते, समीक्षक व लेखक गणेश मतकरी, ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक प्रवीण टोकेकर, संभाजीनगरहून आलेले समीक्षक डॉ. गोविंद बुरसे, अमरावतीहून आलेले अभ्यासक डॉ. राजेंद्र राऊत हे सहभागी झाले होते. पत्रकार जयदीप पाठक यांनी त्या सर्वांशी संवाद साधला.
 
या वेळी गणेश मतकरी म्हणाले, “भयकथा, रहस्यकथा यांचा दुष्काळ अगदी सुरुवातीपासूनच आहे. रहस्य साहित्य मुख्य धारेतील साहित्य मानले न गेल्याने कायमच दुय्यम लेखले गेले. रत्नाकर मतकरी, नारायण धारप अशा काही लेखकांचे अपवाद वगळता आपल्याला या विषयात लिहिणारी किती नावे आज आठवतात? त्यासाठी अधिक समकालीन लेखन नव्याने होणे गरजेचे आहे. गूढकथा हा एक लोकप्रिय प्रकार नक्कीच होऊ शकतो; मात्र त्यामध्ये अधिकाधिक लेखकांनी उतरून त्या प्रकारचे लेखन करण्याचे आवाहन घ्यायला हवे.”
 
हेही वाचा : केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक संपन्न
 
प्रवीण टोकेकर म्हणाले की “रहस्यकथा, भयकथा आणि गूढकथा हे स्वतंत्र प्रकार आहेत वाचक हा त्यांचा साक्षीदार आहे. पूर्वीच्या काळात हे चोरून वाचायचे साहित्य म्हणून गणले गेले. आजही त्याला म्हणावे तशी समाजमान्यता मिळालेली नाही हे वास्तव आहे. भयकथा, रहस्यकथा लिहिताना लेखकाचा कस लागतो. त्यासाठी खरी बुद्धिमत्ता लागते. खूप आव्हानात्मक असे हे लेखन असल्यामुळे या लेखनाला स्वतंत्र साहित्य प्रकार म्हणून दर्जा मिळायला हवा.” डॉ. राजेंद्र राऊत म्हणाले, चोरून वाचायचे साहित्य आणि हे साहित्य वाचून पिढी बिघडेल अशी भीती पूर्वी व्यक्त केली जात असे त्यातून हा वाङ्मय प्रकार दुर्लक्षित राहिला. आजकाल हिंदी तसेच अन्य भाषांमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात रहस्यकथा, भयकथा व गूढकथा लिहिल्या जातात तेवढे प्रमाण मात्र मराठीत दिसून येत नाही. आपण त्यात खूप मागे पडतो आहोत.
 
डॉ. गोविंद बुरसे म्हणाले, लोकांना या विषयात खूप रस आहे. त्यांना समजून घेण्याचीही खूप इच्छा आहे परंतु दुर्देवाने या विषयात दर्जेदार लेखनाची वानवा आहे. हे चित्र बदलण्यासाठी अनेकांनी पुढे येऊन या विषयांत लेखन करायला हवे.
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.