रंगाचे आकर्षण कोणाला नाही? सर्वांच्याच मनाला रंगांची भूरळ पडते. यासाठी बालरंगभूमीमध्येही अनेक रंगछटांचा वापर करण्यात येतो. कलाकारांच्या कपड्यांकडे भूमिकेच्या गरजेपलीकडे जाऊनही विचार केला जातो. त्यामुळेच बालरंगभूमीवरील पात्रांचे कपडे रंगीबेरंगी दिसतात. मात्र, हे सगळे करताना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो. बालरंगभूमीवरील रंग आणि ते खुलवण्याच्या वाटेमध्ये येणार्या समस्या यांचा घेतलेला आढावा...
रंगभूमी ही केवळ अभिनयाची जागा नाही; ती कल्पना, आविष्कार आणि सर्जनशीलतेची जननी आहे. इथेच शब्दांना रंग मिळतो, भावनांना आकार मिळतो आणि कल्पनांना उंच भरारी घेण्याचं आकाश मिळतं. विशेषतः बालरंगभूमी ही अशा अनेक शक्यतांनी भरलेली असते, जिथे मुलांचं भावविश्व, त्यांची कल्पनाशक्ती आणि त्यांचा आनंद एकत्र नांदतो.
बालरंगभूमीवर रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा आणि आभूषणं यांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. प्रत्येक रंग काहीतरी सांगत असतो, प्रत्येक वेश एखादी कथा उलगडत असतो. त्यामुळे मुलांना हे सगळं का वापरायचे, हे समजावून सांगणंही तितकंच आवश्यक असतं. जेव्हा मुलं स्वतःकडे पाहायला शिकतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वासही वाढीस लागतो. ते आपल्या पात्रात शिरतात आणि रंगभूमीवर खर्या अर्थाने बोलके होतात.
लहान मुलांचा रंगांशी अतिशय जिव्हाळ्याचा संबंध असतो. आकाश निळंच का असावं? ढग पांढरेच का असावेत? ते गुलाबी, जांभळे किंवा इंद्रधनुष्याच्या रंगाचे का नसावेत? अशा प्रश्नांतूनच त्यांची कल्पनाशक्ती आकार घेत असते. म्हणूनच बालनाट्यातील चटकदार, चमकदार, आकर्षक रंग मुलांना अधिक भावतात. एखादी चेटकीण काळ्या रंगाऐवजी लाल कपडे घालू शकते, एखादा राजा नेहमीच सोनेरी पोशाखातच असावा असं नाही, ही मोकळीक बालरंगभूमीच देते.
अशी नाटके ज्यामध्ये रंगभूषा, वेशभूषा आणि केशभूषा प्रभावीपणे वापरल्या जातात, ती मुलांना आपलीशी वाटतात. अशा नाटकांमध्ये काम करण्याचा लहान मुलांंचा उत्साह वेगळ्याच पातळीवर दिसतो. मुलं केवळ अभिनय करत नाहीत, तर रंगांशी खेळतात, प्रयोग करतात. हीच प्रक्रिया त्यांच्या भविष्यातील वाटचालीचं बीज पेरते. म्हणूनच लहानपणी नेपथ्य, रंग आणि वेशभूषेत रमलेली मुलं, पुढे जाऊन नेपथ्यकार, फॅशन डिझायनर, इंटिरिअर डिझायनर होताना दिसतात. फोटोमध्ये कार्तिक आहे, याने ‘राजे शिवबा’ नाटकासाठी ७५ साड्या जमा केल्या; काही काकू, काही आत्या, तर काही मावशीकडून. यातून मुलाचं नाटकाविषयी प्रेम दिसून येतं. त्याचबरोबर त्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तयार केलेल्या ग्रीटिंग कार्डमधून,यातून घरचे संस्कारही दिसून येतात. बालरंगभूमी मुलांना कलागुणांसहित अंतर्मुख आणि बहिर्मुख व्हायलाही शिकवते.
सध्या बालरंगभूमीवर काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे; ही रंगभूमी अजूनही व्यावसायिक रंगभूमीसारखी श्रीमंत नाही. बालनाट्य करणार्यांचा प्रवास मोठा खडतर आणि संघर्षपूर्ण आहे. एका प्रयोगातून खर्च निघेलच असं नाही. अनेकदा नाटक बसवताना तांत्रिक बाजू डावलली जाते. काहीतरी करून निभावूया, हलक्या दर्जाचे किंवा उंचीला न साजेसे कपडे चालतील अशा विचारांमध्ये निर्माते अडकतात. पण गंमत म्हणजे, हेच घटक मुलांना सर्वात जास्त आवडतात.
अशा वेळी पालकांची साथ हीच खरी गुरुकिल्ली ठरते. जेव्हा एखादं मूल नाटक करू लागतं, तेव्हा त्याचं संपूर्ण कुटुंब नाट्यमय होतं. सध्या फेब्रुवारी महिन्यात सादर होणार्या ‘सियावर रामचंद्र की जय’ आणि ‘राजे शिवबा’ या दोन बाल-महानाट्यांमध्ये सुमारे पंच्याहत्तर मुलं सहभागी आहेत. ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांमध्ये रंगभूषा, वेशभूषा आणि दागदागिन्यांना भरपूर वाव असतो, त्यामुळे त्यांचा खर्चही तितकाच वाढतो.
म्हणूनच, या नाटकांसाठी आई-वडिलांनी पुढाकार घेतला. जुन्या, टिकाऊ; पण आता न वापरण्यात येणार्या साड्या त्यांनी दिल्या. त्या साड्यांमधून मावळे, सरदार, नववारी, मुघलांचे अंगरखे, राम, लक्ष्मण, रावण, हनुमान, वानरसेना, रामसेना, रामाची प्रजा, राक्षशीणी असे असंख्य वेश तयार झाले. या साड्यांमधून केवळ कपडेच तयार झाले नाहीत; तर त्यातून प्रेम, वात्सल्य आणि सहकार्यही विणलं गेलं.
जिथे अभाव असतो, तिथेच कला जन्माला येते. जिथे साधनांची कमतरता असते, तिथे कल्पकता फुलते. म्हणूनच आईनं दिलेल्या साड्यांमधूनच अख्खं रामराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ उभा करणं शक्य झालं. मात्र, हेही तितकंच खरं आहे की, वर्षानुवर्षे हवा असलेला परिणाम केवळ पैशांच्या गणितात जुळत नाही. कधी-कधी माघार घ्यावी लागते आणि तेव्हा मनाला वाईटही वाटतं.
तरीही, मला ठाम विश्वास आहे की, बालरंगभूमीलाही चांगले दिवस येतील. जसं आजपर्यंत रंग जुळून आले आहेत, तसंच पुढेही होईल. आतातरी या साड्यांच्या गोधड्यांत मी आहे आणि या रंगांतून मुलं मला रंगभूमीवर आपले रंग खुलवताना दिसत आहेत, तोपर्यंत हा प्रवास असाच सुरू राहील आणि प्रेक्षकही चालवून घेतील.
- रानी राधिका देशपांडे