मुंबई :( Ram mandir ) अयोध्येतील राम जन्मभूमी संकुलात राम मंदिर बांधकाम समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राम कथा संग्रहालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिराशी संबंधित सर्व बांधकाम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. सध्या मंदिरातील सभागृहाचे काम प्रलंबित आहे.
त्यांनी वाल्मिकी रामायणावर बोलताना सांगितले की, दिल्लीतील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने ४०० वर्षे जुने वाल्मिकी रामायण ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना दान केले होते. ते आता राम मंदिर संकुलात पोहोचले आहे. राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर रामायण कथांचे मंदिर विकसित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाल्मिकी रामायणाच्या विविध भाषांमधील सर्व अधिकृत आणि प्राचीन आवृत्त्या येथे ठेवल्या जातील.
नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, रामकथांच्या मंदिरात रामयंत्र देखील ठेवण्यात येणार आहे, जे कांची कामकोटीचे शंकराचार्य यांनी आधीच ट्रस्टला भेट दिले आहे. प्राचीन रामायणाच्या संग्रहासाठी एक समिती स्थापन केली जाईल. त्यात तज्ञांचा समावेश केला जाईल जे प्राचीन रामायणाचे वय आणि सत्यता तपासतील. त्यानंतर त्यांच्या शिफारसीनुसार ते राम मंदिरात ठेवण्यात येईल.
मंदिर परिसरात राम मंदिर आंदोलनात बलिदान देणाऱ्यांचे स्मारक बांधण्याचे काम चालू आहे ते मार्चपर्यंत पूर्ण होईल. हे स्मारक ११ मीटर उंच असेल आणि लाल दगडांनी सजवले जाईल.
१९ मार्च रोजी गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मंदिर परिसरात येणार आहेत. यावेळी त्या मंदिर बांधकामात असणाऱ्या ४०० कामगारांचा सन्मान करणार आहेत. या कार्यक्रमासाठी चार हजारांहून अधिक पाहुण्यांना आमंत्रित केले जाणार आहे.
रामजन्मभूमी संकुलाच्या सीमा भिंतीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. ८०० मीटर लांब आणि १४ फूट उंच सीमा भिंतीला लागून बांधण्यात येणाऱ्या दोन अत्याधुनिक टेहळणी बुरूजांचे काम पूर्ण झाले आहे. आणखी तेवीस बुरूज बांधले जाणार आहेत. ज्यामुळे परिसराची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होईल. हे बुरूज आधुनिक सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असतील.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.