दादांचा आदर्श...

    31-Jan-2026
Total Views |
Ajit Pawar
 
महापालिका निवडणुका आटोपल्यावर खरेतर जिल्ह्यात राजकारणातील चैतन्य आणखी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपर्यंत नंतर काहीकाळ राहणार, असेच चित्र होते. तथापि, अजित पवार यांच्या निधनाने सगळा माहोलच बदलला आणि राजकारणातील हालचालींची गती मंदावली. त्यात अजितदादांचा कामांचा धडाका अतिशय जबरदस्त होता. ती गती बघता, कार्यकर्ते आणि अधिकार्‍यांनादेखील कामांचा हुरूप आला होता. भलेही महापालिका निवडणुकांतील अपयश त्यांना धक्का देणारे ठरले असले, तरी त्यांनी ते कधी जाणवू दिले नाही. त्याच अनुषंगाने त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आपल्या पक्षाला मोठे यश मिळवून देण्याची तयारीदेखील केली होती. मात्र, नियतीला हे मान्य नसावे. त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राजकारणात निरसता आली. आता निवडून आलेले नगरसेवक आपापल्या भागात कार्यरत आहेत, त्यांनी स्वतःला सत्कार सोहळ्यात गुंतवून घेतले नाही.
 
काहींनी परिसर स्वच्छता आणि अन्य कामांना गती दिली. काही ठिकाणी नगरसेवक प्रभागात जाऊन लोकांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेत आहेत, तर काही नगरसेवकांनी सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवातदेखील केली आहे. अजित पवारांच्या जाण्याचे दुःख खरेतर सर्वच पक्षांतील नगरसेवकांना झाले आहे. किंबहुना, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तर त्यांची ‘विकासाचे शिल्पकार’ म्हणूनच ओळख आहे. एकेकाळी काँग्रेस पक्षाचा वरचष्मा असलेल्या पुण्यात भाजप महापौरांच्या आधीच्या काळात काँग्रेस पक्षाला घरी बसविण्यात मोठी भूमिका त्यांनी बजावली होती. त्यामुळे जे काही स्थानिक राजकारण या दोन्ही महानगरात घिरट्या घालीत असते, त्यात अजित पवारांचे नाव असतेच. त्यामुळे आतादेखील पुढील अनेक दशके अजितदादांचा उल्लेख होत राहणार, यात शंका नाही. आता महापालिकेत दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे, तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेदेखील नगरसेवक असणार आहेत. तेदेखील आपल्या नेत्याच्या या पावलावर पाऊल ठेवून पक्षवाढीसाठी विकासकामे करण्यावर भर देतील, यात संदेह नाही. एकूणच, अजित पवारांचे जाणे हे अतिशय क्लेशकारक असले, तरी विकासाचा मार्ग दाखवून त्यांनी नगरसेवकांपुढे कामांच्या धडाडीचा आदर्श ठेवला आहे, एवढे नक्की म्हणता येईल!
 
नियोजनाचा परामर्ष
 
उद्या केंद्राचा आणि येत्या काळात राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. शिवाय, महापालिकांचा अर्थसंकल्पदेखील लवकरच सादर होणार असल्याने भविष्यात ही पैशाची तरतूद आणि नियोजन परिसरातील विकासाची दिशा ठरविणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरे ही विकासाच्या वाटेतील आघाडीवर असलेली शहरे आहेत. या महानगरांमध्ये मोठी विकासाची कामे सुरू आहेत. विकास होत असल्याने आपसूकच पायाभूत सुविधांची अधिक गरज भासणार आहे. त्यामुळे यात कोणकोणत्या कामांचा समावेश अग्रक्रमाने करावा लागणार आहे, याचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. महानगरात सध्या अतिशय भेडसावणारा आणि सर्वांनाच त्रासदायक असणारा प्रश्न म्हणजे वाहतुककोंडीचा आहे. यावर कशाप्रकारे उपाययोजना करता येतील, हे जलदगतीने अमलात आणणेदेखील तितकेच गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टीचा विचार करून ही कोंडी टाळण्यासाठी भुयारी मार्गांची संकल्पना अमलात आणणार असल्याचे स्पष्ट केलेलेच आहे.
 
तथापि, या कामांना शहराची भौगोलिक रचना बघता, आणखी काहीकाळ लागू शकतो. तथापि, महानगरात येणार्‍यांची संख्या, दरवर्षी मार्गांवर वाढणार्‍या वाहनांची संख्यादेखील अधिक असल्याने ही कोंडी सोडविणे अत्यावश्यक आहे. विकासाचा ‘रोडमॅप’ सुरळीत करण्यासाठी हे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे. शिवाय, जी विकासकामे रखडलेली आहेत, ती अनेक आहेत. रिंगरोड असो की, मिसिंग लिंक; पुरंदर विमानतळ, लॉजिस्टिक पार्क, नाशिक रेल्वेमार्ग, नव्या येणार्‍या कंपन्यांसाठी लागणार्‍या मूलभूत सुविधा, तसेच मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असणार्‍या ‘पीएमपीएमएल’ बसेसची संख्या वाढविणे, त्या सेवेत सुधारणा घडवून आणणेदेखील प्राधान्याने बघितले पाहिजे. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींवरील ही जबाबदारी आता वाढली आहे. यासाठी ते किती तत्परतेने कामे करतात, आणखी कोणत्या कामांना प्राधान्य देतात, यावरच हे विकासाचे मॉडेल झळकत राहील. नागरिकांनीदेखील अशा विकासकामात सहकार्य करताना जे कोणते चुकीचे आणि नागरिकांना त्रासदायक काम होत असल्यास सतर्क राहून, याबाबत जाब विचारायची तयारीदेखील ठेवली पाहिजे.
 
- अतुल तांदळीकर