फिलीपिन्सची जागतिक झेप

Total Views |
New Manila International Airport
 
फिलीपिन्सच्या बुलाकान येथे उभारण्यात येते असलेले ‘न्यू मनीला इंटरनॅशनल एअरपोर्ट’ हे केवळ एक विमानतळ नसून, देशाच्या दीर्घकालीन विकास धोरणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणावा लागेल. मनीला महानगरावरील वाढता ताण कमी करणे आणि राजधानीच्या उत्तरेला एक नवे आर्थिक व वाहतूक केंद्र निर्माण करणे, हा या महाप्रकल्पाचा मुख्य उद्देश. सध्या कार्यरत असलेला ‘निनॉय अक्विनो इंटरनॅशनल एअरपोर्ट’ हा दक्षिण-पूर्व आशियातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असला, तरी तांत्रिकदृष्ट्या तो तितकासा अद्ययावत आणि कालानुरूप नाही. केवळ तीन धावपट्ट्या आणि मर्यादित विस्तार क्षमता यामुळे ‘निनॉय अक्विनो इंटरनॅशनल एअरपोर्ट’वर प्रचंड ताण येतो. ३० दशलक्ष प्रवाशांसाठी डिझाईन केलेला हा विमानतळ आज ४५ ते ५० दशलक्ष प्रवासी हाताळतो. त्यामुळे भौगोलिक मर्यादा, वाढती लोकसंख्या आणि वाहतुककोंडी यामुळे त्याचा विस्तार जवळजवळ अशक्य झाला आहे.
 
मेट्रो मनीलाच्या सुमारे ३५ किलोमीटर उत्तरेला बुलाकान प्रांतातील बुलाकान नगरपालिकेत दोन हजार, ५०० हेक्टर क्षेत्रावर हा विमानतळ उभारला जात आहे. मनीला, सेंट्रल लुझोन, कॅलाबारझोन, तसेच उत्तर व पूर्वेकडील प्रांतांशी तो राष्ट्रीय आणि प्रांतीय रस्त्यांद्वारे जोडला जाणार आहे. यासाठी आठ किलोमीटरचा विमानतळ टोल रोड, नॉर्थ लुझोन एक्सप्रेस-वे, तसेच १८ किलोमीटरचा ‘स्काय-वे स्टेज-३’ मार्ग विकसित केला जात आहे, जो थेट ‘साऊथ लुझोन एक्सप्रेस-वे’शी जोडला जाणार आहे. या कनेक्टिविटीमुळे विमानतळाभोवती निवासी व औद्योगिक विकासासोबतच सागरी बंदर आणि ‘लॉजिस्टिक हब’ उभे राहणार आहेत. या विमानतळाची प्रारंभिक टप्प्यात ३५ ते ५० दशलक्ष प्रवाशांची क्षमता असून, पूर्ण क्षमतेत हाच आकडा १०० ते १२० दशलक्षांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे ‘न्यू मनीला इंटरनॅशनल एअरपोर्ट’ हे आशियातील सर्वात मोठ्या हवाई केंद्रांपैकी एक ठरेल, अशी आशा आहे.
 
फिलीपिन्स सरकारच्या पूर्ण मालकीखाली विकसित होत असलेले हे विमानतळ सुमारे ७३५ अब्ज पेसो (१२.५७ अब्ज अमेरिकी डॉलर्स) गुंतवणुकीतून उभारले जात आहे. हा प्रकल्प सरकारच्या ‘बिल्ड! बिल्ड! बिल्ड!’ या राष्ट्रीय पायाभूत सुविधा कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये फिलीपिन्सच्या परिवहन विभागाने बहुराष्ट्रीय समूह ‘सान मिगेल कॉर्पोरेशन’च्या पायाभूत सुविधा शाखा ‘सान मिगेल एरोसिटी’सोबत ५० वर्षांचा ‘बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर’ करार केला. २०१९ मध्ये प्राथमिक बांधकामास सुरुवात झाली असून, २०२८ पर्यंत हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची अपेक्षा आहे.
 
हा विमानतळ भविष्यातील ‘ग्रीन एअरपोर्ट’ संकल्पनेनुसार विकसित केला जात आहे. सौरऊर्जेचा वापर, पावसाचे पाणी-साठवण, पर्यावरणस्नेही वास्तुरचना, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि इलेक्ट्रिक वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रवासी टर्मिनल सुमारे १.२ दशलक्ष चौ. मीटर क्षेत्रफळावर उभारले जात असून, स्वयंचलित चेक-इन, इमिग्रेशन, सुरक्षा, रिटेल आणि लाँज सुविधा यांचा समावेश असेल. याशिवाय, पाच लाख, पाच हजार टन क्षमतेचा ‘कार्गो टर्मिनल’ आणि अत्याधुनिक ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर’ही उभारला जात आहे.
 
विशेष म्हणजे, विमानतळाभोवती विकसित होणारी ‘एअरोट्रोपोलिस’ संकल्पना म्हणजेच कार्यालये, तंत्रज्ञान उद्याने, हॉटेल्स व निवासी भागांसह ही जागा जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे. २०२० मध्ये काम सुरू होण्यापूर्वीच परिसरातील जमिनीच्या किमतींमध्ये ३० ते ५० टक्के, तर काही ठिकाणी ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ‘न्यू मनीला इंटरनॅशनल एअरपोर्ट’ हा प्रकल्प फिलीपिन्सला जागतिक हवाई, आर्थिक आणि शहरी विकासाच्या नकाशावर नव्या उंचीवर नेण्याची क्षमता बाळगतो. म्हणूनच, आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रकल्प लक्षवेधी ठरतो आहे. त्यामुळे एका विमानतळाच्या माध्यमातूनही किती मोठी समांतर अर्थव्यवस्था उभी राहू शकते, याचे हे आणखीन एक उदाहरण. तेव्हा, एकीकडे आपल्याकडचे काही बोलबच्चन नेते ‘बंदराजनजीक विमानतळ का हवे? विमानतळाच्या व्यवस्थापनाचे काम खासगी कंपनीला का?’ यांसारखे प्रश्न उपस्थित करताना, जगाच्या पाठीवर मात्र विमानतळांनी घेतलेली भरारी कौतुकास्पदच!
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.