मुंबई : ( Tirupati ) तिरुपती लाडू घोटाळा प्रकरणी सीबीआयद्वारे नेल्लोर येथील एसीबी न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, लाडू तयार करण्यासाठी दुधापासून बनवलेले गायीचे तूप न वापरता कृत्रिम (सिंथेटिक) तुपाचा वापर करण्यात आला होता. त्याचवेळी, तिरुमला तिरुपती देवस्थानमला पुरवण्यात आलेल्या तुपामध्ये प्राणिजन्य चरबीचे मिश्रण होते, असा उल्लेख चार्जशीट मध्ये कुठेही करण्यात आलेला नाही. त्यामुळे या वादात आधी करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या दाव्यांपैकी एकाला पूर्णविराम मिळाल्याचे दिसते आहे.
सीबीआयच्या विशेष तपास पथकानुसार, प्रयोगशाळेतील तपासणीत असे आढळून आले की लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरलेले तूप कृत्रिम स्वरूपाचे होते आणि त्यामध्ये वनस्पती तेलांचे मिश्रण करण्यात आले होते. तपासात असे निष्पन्न झाले की हे तूप दुधापासून बनवलेले नव्हते. जुलै २०२४ मध्ये एआर डेअरीकडून पुरवण्यात आलेल्या टँकरमधील नमुने तपासण्यात आले आणि ते कृत्रिम तूप असल्याची पुष्टी झाली. तसेच भोले बाबा डेअरी आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांकडून पुरवलेले तूपही बनावट असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
सप्टेंबर २०२४ दरम्यान तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू केलेल्या दाव्यानंतर हा वाद चांगलाच चर्चेत आला होता. ते म्हणाले होते की, २०१९ ते २०२४ या वायएसआर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात लाडू प्रसादासाठी प्राणिजन्य चरबी मिसळलेले तूप वापरण्यात आले होते. या दाव्यानंतर, तिरुमला तिरुपती देवस्थानमसाठी पुरवण्यात येणाऱ्या तुपामध्ये टॅलो किंवा लार्डचा वापर झाला आहे का, याची चौकशी करण्यासाठी सीबीआय अंतर्गत विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.
तपासादरम्यान, सीबीआयने राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला कच्च्या आकडेवारीची पुन्हा तपासणी करण्यास आणि ६ व १२ जुलै २०२४ रोजी एआर डेअरीच्या चार टँकरमधून देवस्थानमने घेतलेल्या उर्वरित तुपाच्या नमुन्यांवर नव्याने चाचण्या करण्यास सांगितले. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने या चाचण्या पूर्ण करून २७ मार्च रोजी सविस्तर अहवाल सादर केला, जो आता चार्जशीटचा महत्त्वाचा भाग ठरला आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक