कोकणात ठाकरे हद्दपार

    30-Jan-2026   
Total Views |
Uddhav Thackeray
 
एकेकाळी ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकण विभागात आता पक्ष नावापुरता शिल्लक राहिल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीपासून कोकणात ‘उबाठा’ गटाला लागलेली गळती जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही कायम आहे. विशेषत: कोकणातील सिंधुदुर्गातील अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने ‘उबाठा’ गटाचा सुपडा साफ झाला. जिल्हा परिषदेत भाजप-महायुतीचे आठ उमेदवार, तर पंचायत समित्यांमध्ये १७ उमेदवार बिनविरोध विजयी ठरले आहेत. खरेतर, ही कोकणात ‘उबाठा’ गटाच्या अस्ताची नांदी म्हणावी लागेल. सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने पाय रोवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे गेली अनेक वर्षे इथे ठाकरेंचीच सत्ता होती. मात्र, खासदार नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कोकणात भाजपची पकड मजबूत होत गेली. त्यानंतर नितेश राणे आणि निलेश राणे या दोन्ही बंधूंनी आपला करिश्मा कायम ठेवला. त्यामुळे ‘कोकण म्हणजे ठाकरे’ हे समीकरण आता संपुष्टात आले आहे. खरेतर, लोकसभा निवडणुकीत कोकणात ठाकरेंचा दारुण पराभव झाला. त्यानंतर विधानसभेत भास्कर जाधव यांच्या रूपाने फक्त एक उमेदवार त्यांच्या पदरात पडला. मात्र, या अपयशानंतरही उद्धव ठाकरे यांना पराभवाचे आत्मचिंतन करणे योग्य वाटले नसावे. त्यामुळेच एकेकाळी बालेकिल्ला असलेला कोकण विभाग त्यांच्या हातून वाळूसारखा निसटत गेला आणि आता या वाळूचे केवळ दोन-चार कण हातात उरलेले दिसतात. आता तर ‘उबाठा’ गटाकडे अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत देण्यासाठी उमेदवारच नाहीत.
 
खा. नारायण राणे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका भाजप-शिवसेना महायुती म्हणून लढण्याची घोषणा केली, तर नितेश राणे यांनी निवडणुकांची जबाबदारी खांद्यावर घेत सिंधुदुर्गात ‘बिनविरोध पॅटर्न’ सुरू केला. हा पॅटर्न आता यशस्वी होताना दिसतोय. दुसरीकडे, कोकणात ‘उबाठा’ गटाकडे नसलेली संघटनात्मक ताकद, संपत चाललेला राजकीय प्रभाव आणि पक्षातील नेत्यांची उदासीनता या सगळ्या कारणांमुळे कोकणात ‘उबाठा’ गट हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे, हे नक्की.
 
राऊतांची पोपटपंची
 
महाराष्ट्राच्या राजकारणात काळ, वेळ, परिस्थिती, प्रसंग यापैकी कशाचीही तमा न बाळगता तोंडाला येईल ते बोलत सुटणारा नेता म्हणजे संजय राऊत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही त्यांच्या बौद्धिक पातळीची कीव करावी, अशीच आहे. राजकारणात सर्व निवडणुकांमध्ये हव्यास असतो. सर्व निवडणुकांसाठी सर्व राज्यकर्ते धावाधाव करत आहेत, याला बांध घातला पाहिजे. काही निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडल्या पाहिजे. परंतु, गेल्या काही काळात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री २४ तास राजकीय स्पर्धांमध्ये गुंतल्याने त्यांचे बळी जात आहेत, असे बेताल वक्तव्य संजय राऊत यांनी केले. खरेतर, कुठलीच वेळ कधीही सांगून येत नाही. अशा वेळी मरणाच्या भीतिपोटी कुठल्याही माणसाने काम सोडून घरात बसून राहावे, असे संजय राऊत यांना म्हणायचे आहे का? घरातून राज्यकारभार चालवणारे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची आज काय अवस्था आहे, हे संपूर्ण राज्याला ठाऊक आहे. ठाकरे जसे केवळ मुंबई महापालिकेसाठी ‘अ‍ॅटिव्ह’ झालेत आणि नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये बिनधास्त राहिलेत, तसेच सर्वांनी वागावे, अशी राऊतांची अपेक्षा आहे का? वास्तविक, नेत्यांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करायचे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या की, त्यांना वार्‍यावर सोडायचे हा कुठला न्याय? आजवर उद्धव ठाकरे याच सूत्राने निवडणुका लढवत असल्याने रोज त्यांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना ‘जय महाराष्ट्र’ करीत आहेत.
 
राज्यकर्त्यांनी धावाधाव केली, जनतेत गेले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तरच जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते, हे साधे गणित आहे. आपल्या हाकेला कोण धावून येतो? आपले प्रश्न कोण सोडवतो? या सगळ्या गोष्टींवर जनतेचे बारकाईने लक्ष असते. म्हणूनच, आज अजितदादा गेल्यानंतर एवढा मोठा जनसमुदाय त्यांना बघण्यासाठी जमला होता. दुसरीकडे, संजय राऊत जनतेत जात नसल्यामुळेच ते एकदाही जनतेतून निवडून येत नाहीत, हेही तितकेच खरे. त्यामुळे अशी असंवेदनशील विधाने करून ते आपल्या बौद्धिक क्षमतेचे दर्शन घडवून देत आहेत, असेच म्हणावे लागेल.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....