कळ्या चिरडणारा देश...

    30-Jan-2026   
Total Views |
Child Marriage in Pakistan
 
"१६ वर्ष, १२ वर्ष आणि दहा वर्षांच्या मुलींचा निकाह होण्यासाठी मी स्वतः मदत करणार, त्या निकाहमध्ये सामील होणार,” असे ‘जमियत-उलेमा-ए-इस्लाम’चा प्रमुख नेता मौलाना फजलुर रहमान याने म्हटले. पाकिस्तानी संसदेमध्ये बुरखा घातलेल्या राजकीय नेत्या, महिला बसल्या होत्या. त्यांच्यामध्ये उभे राहून मौलाना रहमान म्हणाला, "लहान मुलांच्या निकाहाला विरोध पाकिस्तानमध्ये होतो आहे. आता पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक नाही, तर सेक्युलर देश म्हणावे.” काय म्हणावे, बिचार्‍या पाकिस्तानच्या बालिका! वय वर्षे दहाच्या बालिकेचा निकाह हा धर्मसंमत आहे, असे म्हणणारा हा मौलाना पुढे म्हणतो की, "पाकिस्तानी कायद्याला असा कायदा बनवण्याचा अधिकार नाही. जर बालनिकाहविरोधी कायदा बनवायचा होता, तर त्यासंबंधी निवेदन आधी ‘इस्लामिक विचारधारा परिषद’ला द्यायचे होते. मग, मौलाना आणि इतर इस्लामिक तज्ज्ञांनी ‘शरिया’ आणि ‘कुराण’च्या नजरेतून हे प्रकरण हाताळले असते. आम्ही निर्णय दिला असता. पाकिस्तानी संसद असा कायदा पारित करू शकत नाहीत.”
 
अर्थात, जगभरात बालिकांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. निकाह-विवाहाच्या नावावर बालिकेचे आयुष्यभराचे मानसिक आणि शारीरिक शोषण होते. काही कळायच्या आतच त्या बालिकांवर मातृत्व लादले जाते. या मातृत्वासाठी ना त्या बालिकेची मानसिक तयारी असते, ना शारीरिक. एक कळी उमलण्याआधीच खुडली जाते आणि कोमेजून जाते. पण, हे सगळे पाकिस्तानी कट्टरपंथी मौलाना आणि त्याच्या समर्थकांच्या समजण्यापलीकडे आहे. त्यांनाच याबाबत अपराधी भाव नाहीत, तर मग या मुल्ला-मौलवींना मानणार्‍या लोकांचे काय? त्यामुळेच पाकिस्तानमध्ये बालिका-विवाह अगदी सामान्य बाब आहे. कर्ज झाले ते फेडण्यासाठी किंवा काही मदत मिळावी म्हणून सर्रास बालिकांना विकले जाते, तेही निकाहाच्या नावावर.
 
मागे पाकिस्तानच्या ‘जमियत-उलेमा-ए-इस्लाम’चा बलुचिस्तानच्या ६२ वर्षांचा खासदार मौलाना सलाहउद्दीन अयुबीने १४ वर्षांच्या बालिकेशी निकाह केला होता; तर महिन्यापूर्वी पाकिस्तानमध्ये १२ वर्षांच्या बालिकेचा निकाह तिच्या बापाने ७० वर्षांच्या वृद्धाशी, तर एका माणसाने त्याच्या तीन वर्षांच्या बालिकेचा निकाह कर्ज देणार्‍याशी लावून दिला होता. या दोन्ही घटनांमध्ये पाकिस्तानी पोलिसांनी हस्तक्षेप केला. असो. पाकिस्तान काय, अफगाणिस्तान काय, इस्लामिक कट्टरपंथी देश आहेत. मागे अफगाणिस्तानमध्ये एका ५५ वर्षांच्या माणसाने सहा वर्षांच्या बालिकेशी निकाह केला. त्यावेळी तालिबानी सरकारने हस्तक्षेप केला. तालिबान्यांचे म्हणणे ती आता सहा वर्षांची आहे. थोड थांब, ती नऊ वर्षांची झाली की, तिला सोबत ने. भयंकर आणि दुःखद. सहा वर्षांची, तीन वर्षांची बालिका? त्या न पाहिलेल्या बालिकांबाबत आताही मनात सल दाटून आहे.
 
पाकिस्तानमध्ये आजही सहापैकी एका मुलीचा बाल-निकाह झालेला असतो. बालविवाहाने बालवयातच मातृत्व लादल्या गेलेल्या करोडो मुली पाकिस्तानमध्ये आज आहेत. समाजअभ्यासकांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानमध्ये नदीकाठच्या भागात राहणार्‍या परिसरामध्ये दर पावसाळ्यानंतर बालिका-निकाहाचे प्रमाण वाढते. कारण, पावसाळ्यात नदी-ओढ्यांना पूर येणे आणि घरदार वाहून जाणे, हे तिथे नेहमीचे आहे. मग, जीवन पुन्हा सुरू करण्यासाठी तिथले लोक त्यांच्या लहान मुलींचा निकाह कर्ज देणार्‍या, कर्ज माफ करणार्‍यांसोबत लावून देतात. ही गोष्ट तिथे सामान्य आहे. याला पायबंद बसावा म्हणून पाकिस्तानने घरगुती हिंसाविरोधी कायद्यांतर्गत बाल-निकाहाला बंदी आणली. मात्र, आता तिथले कट्टरपंथी मौलवी विरोध करत आहेत. तसे पाहायला गेले, तर मौजमजेसाठी भारतात येणार्‍या अरबांशी बालिकांचा निकाह लावून देणारे कपाळकरंटे अब्बू-अम्मी भारतातही आहेतच. दुर्दैव असे की, कधी बालिका-निकाह पैशासाठी, तर कधी रीतिरिवाज म्हणूनही होतात. मुस्लीमच का, हिंदूंमध्येही असे बालविवाह लपून-छपून का होईना, सुरू आहेत. या सगळ्यांवर कायद्याने बंदी आहे; पण समाजाने पूर्ण बंदी आणल्याशिवाय हे थांबणार नाही. या सगळ्या बालिकांसाठी पुरोगामी निधर्मी मेणबत्त्या लावताना किंवा किमान ‘ब्र’ शब्द उच्चारताना दिसलेले नाहीत. कधीपर्यंत या बालिकांचा बळी जाणार?
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.