पणजीमधील आमच्या नव्या कार्यालयाच्या पत्त्यावर आलेले ते बहुधा पहिलेच पत्र असावे. छानदार अक्षरात पत्ता लिहिलेले फिकट निळ्या रंगाचे आंतरदेशीय पत्र. मला त्याचीच प्रतिक्षा होती. उत्सुकतेने मी पत्र उघडले आणि वाचले. थोडी निराशाच पदरी पडली. पत्र सरळ घडी केले आणि माझ्या बॅगेत ठेऊन दिले. मी विचारलेल्या व्यवहारिक प्रश्नांना उत्तर म्हणून अशोकरावांनी थेट मला भगवद्गीतेतील एक श्लोक पाठवून त्याचे संक्षिप्त निरुपणच केले होते ! "स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः" या भगवद्गीतेतील १८व्या अध्यायातील श्लोकाने सुरुवात केलेले सरांच्या सुवाच्य अक्षरातील ते पत्र डोळ्यांपुढे अगदी आजही लख्ख उभे राहते !
आपण कोणतेही काम करत असू — मोठे असो वा लहान -- ते जर पूर्ण निष्ठेने, भक्तिभावाने आणि समर्पण भावनेने केले, तर तेच ध्येयप्राप्तीचे साधन ठरते. कोणतेही कार्य तुच्छ नाही; तेच ईश्वरसेवेचे साधन आहे. अशा आशयाच्या त्या पत्राने मी तेंव्हा खट्टू झालो खरा पण खरे तर आजपर्यंतच्या वाटचालीत कितीतरी वेळा ते आठवले आणि त्या त्या वेळी साचलेले मनावरील मळभ आणि कामाविषयीचे संभ्रम त्याच ओळींनी दूरही झाले !
गोष्ट अगदी साधी होती. खरे तर समस्या अशी काही नव्हतीच. विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी माझी एम.एस्सी.ची परीक्षा संपताच मी गोव्यात दाखल झालो. काही महिन्यातच तेथील स्थायी कार्यकर्त्यांनी निधी उभारून दादा वैद्य रोडवर परिषदेसाठी एक नवे कार्यालय विकत घेतले. एका मोठ्या अपार्टमेंट मधील या फ्लॅटमध्ये पाण्याची समस्या होती. काही कारणांनी नगरपालिकेच्या पाइपलाइनचे पाणी आमच्या या फ्लॅटमधील कोणत्याच नळांना येत नव्हते आणि त्यासाठी नगरपालिकेत वारंवार जाऊन अर्ज, विनंत्या करण्याचे काम मलाच करावे लागत होते. एकतर पणजीत राहणारा आणि भरपूर वेळ उपलब्ध असणारा असा कोणीही व्यावसायिक, स्थायी कार्यकर्ता गोव्याच्या तेव्हाच्या टीममध्ये नव्हता आणि त्या तुलनेत माझ्याकडे वेळच वेळ होता.
शिवाय नगरपालिकेचे कार्यालय आमच्या या नव्या जागेपासून अगदी जवळच होते. पण तरीही आपण पूर्णवेळ कार्यकर्ते आहोत, त्यामुळे अशी व्यवस्थात्मक कामे आपली नाहीत असा एक बालसुलभ अहंकार माझ्या मनात निर्माण झाला होता. आज हसू येते पण वयाच्या चोविशीत असे बरेच गंड मनात असायचे...मी उद्विग्न होऊन तेंव्हा आमचे प्रांतप्रमुख असलेले डॉ.अशोकराव मोडक यांना एक पत्र लिहिले आणि माझी 'व्यथा' थेट त्यांच्यापुढे मांडली ! मला वाटले, सर माझ्या या 'व्यथे'ची दखल घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांना कामाला लावतील आणि मला सांत्वनाचे चार शब्दही लिहितील. पण झाले उलटेच. कोणतेही काम तुच्छ न समजता केले पाहिजे. ते अंततः संघटनेच्या ध्येयाकडेच आपल्याला घेऊन जाते अशा आशयाचा तो श्लोक, ते निरूपण म्हणजे अशा तक्रारी पुन्हा न करण्याची मला दिलेली सौम्यशी तंबीच होती !
सरांचे मला आलेले हे बहुधा पहिलेच पत्र ! पुढे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून दोन-अडीच वर्षे आणि त्या नंतरही थोडा काळ काही तात्कालिक निमित्ताने सरांशी होणारा पत्रव्यवहार कायम राहिला. अभ्यास, लेखन, प्रवास, बैठका यां सर्व व्यापातून वेळ काढून सर आवर्जून प्रत्येक पत्राला सविस्तर उत्तर द्यायचे. त्यांना पत्र पाठवणारा केवळ मीच एकटा नव्हतो. आपल्या मासिक खर्चाचे अयव्यय पत्रक आणि सोबत महिनाभरात आपण काय काम केले, काय अडचणी जाणवल्या याविषयी विस्तृत पत्र प्रत्येक पूर्णवेळ कार्यकर्त्याने प्रांतप्रमुख या नात्याने अशा कार्यकर्त्यांचे पालक असणाऱ्या मोडक सरांना पाठवले पाहिजे हा एक अलिखित दंडकही होता. पण सरांना पाठवल्या गेलेल्या प्रत्येक पत्राचे काळजीपूर्वक वाचन करूनच ते प्रत्येकाला उत्तर देत असत. ही उत्तरे वरवरची नसत. त्यात त्या कार्यकर्त्याला त्याच्या आणि संघटनेच्या विकासासाठी आवश्यक असणारे नेमके मार्गदर्शन असायचे.
१९७५ ते १९९५ हा खऱ्या अर्थाने विद्यार्थी परिषदेच्या स्थित्यंतराचा काळ होता. यशवंतराव केळकरांच्या कुशल संघटनशास्त्राच्या आधारे जी सशक्त पायभरणी झाली होती त्यावर विविध आयामांची, संघर्षशील चळवळीची आणि पर्यायाने नेतृत्व निर्माणाची सुडौल रचना उभी राहिली ती याच काळात. स्व.बाळासाहेब आपटे, अशोकराव मोडक आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्यासारखे धुरीण हे या काळातील बिनीचे शिलेदार ! डॉ.विश्वासराव पाटील आणि डॉ.सर्जेराव ठोंबरे यांसारख्या प्राध्यापकांनी नंतरच्या दशकात हीच परंपरा पुढे चालवली.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले 'एकात्म मानव दर्शन' हा आज केवळ अभ्यासाचा, भाषणाचा विषय राहिलेला नसून केंद्र आणि अनेक राज्यसरकारांतर्फे राबविल्या जाणाऱ्या कितीतरी कल्याणकारी योजनांचा पायाभूत विचार बनला आहे. अशोकराव हे या विचारांचे साक्षेपी अभ्यासक. त्यांनी या विषयी लिहिलेली पुस्तके त्यांच्या व्यासंगाची साक्ष तर देतातच पण हा वरवर कठीण वाटणारा विषय आणि विचार उलगडवून दाखवताना ते किती सहजतेने मुद्देसूद लिखाण करतात याचाही प्रत्यय येतो.
केवळ लिखाणच मुद्देसूद नाही तर भाषणही तसेच. एखादी भूमितीतील आकृती काढावी तसे मोजून, मापून बेतलेले आणि त्यामुळेच प्रभावी आणि परिणामकारक होणारे. 'आजच्या माझ्या मांडणीचा विषय हा आहे...त्यात मी एकूण इतके मुद्दे मांडणार आहे...पूर्वार्धात त्या सर्व मुद्द्यांची संक्षिप्त जंत्री सांगतो, नंतर उरलेल्या वेळात त्याचे थोडे सविस्तर स्पष्टीकरण देतो आणि शेवटी पुन्हा एकदा सर्वांची उजळणी करून माझे बोलणे मी संपवणार आहे...' असे म्हणत त्यांनी अभ्यासवर्गात किंवा जाहीर भाषणांमध्ये आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली की नकळत आम्ही अनेकजण आपापल्या डायऱ्या आणि पेन सरसावून बसायचो. अशा नोट्स घेणाऱ्यांच्या दृष्टीने अशोकरावांचे भाषण म्हणजे निव्वळ पर्वणीच असायची ! अगदी अलीकडेच दाजीशास्त्री पणशीकरांच्या उपस्थितीत झालेले पार्ले येथील त्यांचे भाषणही त्याला अपवाद नव्हते. मोजका अभिनवेश, मध्येमध्ये साजेशा कोपरखळ्या आणि तुडूंब भरलेला आशय ही त्यांच्या भाषणाची वैशिष्ट्ये ! संदर्भांची भरपूर रेलचेल. किंबहुना त्याशिवाय ते बोलतच नसत.जवळ त्यांच्या स्वतःच्या टिपणांच्या फुलस्केप कागदांची चळत असायचीच. छानदार लकबीने मान हलवत ते त्यांच्या मांडणीतील महत्वाच्या मुद्द्यांना संदर्भांची जोड द्यायचे. 'अमुक अमुक यांनी लिहिलेले, इतक्या साली प्रकाशित झालेले हे पुस्तक, त्यातील पृष्ठ क्रमांक हा आणि त्यातील हा उल्लेख....' असे ते जेव्हा सांगत तेंव्हा अनेकदा मी ते लिहून घेतले आहे आणि चक्क पडताळूनही पाहिलेले आहे !
धुळे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचा संघ, विद्यार्थी परिषदेशी असणारा संपर्क अधिक गतिमान झाला. त्याच दरम्यान एकदा पंडित दीनदयाळ उपाध्याय हे जनसंघाच्या कार्यक्रमासाठी धुळे येथे येणार असल्याची बातमी त्यांना समजली आणि आपल्या महाविद्यालयात त्यांचे व्याख्यान ठेवण्याची संधी त्यांनी व्यवस्थापनाशी संघर्ष करून साधली. प्राचार्य नानासाहेब वैद्य हे वेगळ्या विचारधारेचे. त्यांनी प्रथम पंडितजींच्या व्याख्यानाला परवानगी नाकारली. होकार मिळवण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला. अखेर सातशे विद्यार्थ्यांसमोर पंडितजींचे 'भारतीय संस्कृती और समाजवाद' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. ते इतके परिणामकारक आणि प्रभावी झाले की खुद्द प्राचार्यांनीच पुढे येत या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. एका अभ्यासू कार्यकर्त्याच्या सामाजिक कार्याची सुरुवातच अशी संघर्षातून झाल्याने आपल्या हक्कांसाठी विद्यार्थ्यांना कराव्या लागणाऱ्या आंदोलनांचे मोल त्यांनी जाणले आणि वेळोवेळी सर्वांपुढे आग्रहाने मांडले देखील !
प्रत्यक्ष पंडितजींच्या व्याख्यानातून समजलेला एकात्म मानवतावाद पुढे त्यांच्या चिंतनाचा आणि लिखाणाचाही विषय झाला. त्यांच्या या विषयाच्या आकलनाच्या सखोलतेला ही पार्श्वभूमी होती. चाळीसगाव येथे प्राध्यापक म्हणून नोकरीची सुरुवात झाली. स्व.यशवंतराव केळकर यांच्याशी परिचय झाला तो याच काळात. प्राध्यापक कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यशवंतराव. शनिवार,रविवार या दोन दिवशी परिषदेच्या कामासाठी नियमित प्रवास सुरू होणे हे मग ओघानेच आले. नाशिक, धुळे आणि जळगाव या खानदेशातील तीनही जिल्ह्यात अशोकरावांनी त्या चार वर्षांच्या काळात सतत प्रवास केले. आज अग्रगण्य असलेल्या एका विद्यार्थी संघटनेच्या जडणघडणीचा हा काळ ! सामाजिक कार्य आणि स्वतःचे अध्ययन यांच्यातील सुवर्णमध्य शोधत अशोकरावांसारखी काही तरूण प्राध्यापक मंडळी याकाळात सक्रीय होती.
पुढे काही काळाने एका शिष्यवृत्तीच्या आधाराने सरांनी दिल्लीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून रशियन भाषा या विषयात एम.फील. केले आणि त्यांना काही वर्षे रशियात जाण्याची संधीही मिळाली. मार्क्सवाद,रशियन क्रांती,त्याचे परिणाम हा त्यांच्या अध्ययनाचा प्रमुख विषय बनला तो याच काळात. रशियाहून परतताच काही काळातच ते मुंबईच्या राम नारायण रुईया महाविद्यालयात रुजू झाले आणि मग एका अर्थाने कायमचेच मुंबईकर झाले.
जडवाद हाच आत्मा असलेले मार्क्सवादी तत्वज्ञान आणि चैतन्यमय आत्मा असलेले भारतीय तत्त्वज्ञान यांचा तौलनिक अभ्यास ऐकवा तो सरांकडून ! हे भाग्य त्याकाळात कित्येकदा मिळाले. आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे बघतांना आपण आपल्या राष्ट्रवादाच्या पार्श्वभूमीवर त्याचे बलाबल तोलले पाहिजे हा त्यांचा आग्रह लक्षात यायला लागला. स्वामी विवेकानंद हा ही त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या अध्ययनाचा विषय म्हणून निवडला. मनुष्य,त्याचे अस्तित्व, त्याचा विकास, समाज आणि राष्ट्र या कल्पना, त्यातील माणसाचे स्थान , त्यातून निर्माण होणारे सामाजिक व राष्ट्रीय प्रगतीचे विविध मार्ग आणि अंततः त्यातील शाश्वत पर्याय या विषयीचे मार्क्स, विवेकानंद आणि दीनदयाळ यांचे विचार हा विस्तीर्ण पट सरांनी गेली चाळीस वर्षे आपल्यापुढे मांडला.
१९१७ ते १९८७ हा साधारण ऐंशी वर्षांचा कालखंड म्हणजे मार्क्सवादाचे सत्ताकारण ते त्याचे अधःपतन हा प्रवास आहे. अशोकरावांच्या अभ्यासाचा हा अगदी खास विषय ! परिषदेच्या कितीतरी अभ्यासवर्गांमध्ये या विषयावरची त्यांची सत्रे आजही स्मरणात आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख आणि अनुभवी कार्यकर्तेच अशा वर्गांना उपस्थित असत. त्यामुळे थट्टा-मस्करीला मज्जाव नसायचा. अशोकरावांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे त्यांच्या अर्कचित्रासह आणि 'मोदकेश्चेव्ह' (ख्रुश्चेव्ह,गोर्बाचेव्ह या धर्तीवर) या त्यांच्या कार्यकर्त्यांत लोकप्रिय असणाऱ्या टोपणनावासह दुसऱ्या दिवशीच्या भित्तीपत्रकात लावले जायचे ! त्यांच्या भाषणाची हुबेहुब नक्कल केली जायची, प्रत्येक गोष्टीची, घटनेची प्रथम मार्क्सवादी दृष्टीने मीमांसा आणि नंतर सरांच्या दृष्टीने त्यावर टीकाही केली जायची. विशेष म्हणजे हास्याच्या या गदारोळात सर स्वतःच अग्रभागी असायचे !
गोवा येथे मी पूर्णवेळ काम करीत असताना त्यांचे गोवा विद्यापीठात एक व्याख्यान प्राध्यापकांच्या एका रिफ्रेशर कोर्समध्ये होणार होते. स्वाभिकपणेच त्यांनी मला ते आधीच कळवले व त्या ठराविक दिवशी आपण विद्यापीठात भेटू, तू तेथे ये असेही मला सांगितले. विद्यापीठीय कामानिमित्ताने होणाऱ्या प्रवासात त्या त्या ठिकाणच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना आवर्जून वेळ काढून भेटणे हा शिरस्ता ते कसोशीने पाळत असत. त्यात उपचार नसायचा तर एक मनःपुतता असायची. ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो. माझ्या कामाबद्दल बरीचशी माहिती त्यांच्याकडे पोहचलेली होती. मी भरपूर प्रवास करतो हे त्यांना ठाऊक होते. दक्षिण गोव्यातील काही तालुक्यांमध्ये काम करतांना मात्र कमी पडतो हे ही त्यांना समजले होते. काय अडचणी आहेत हे त्यांनी आपणहून विचारले आणि काही व्यवहारीक व उपयोगी अशा सूचनाही दिल्या. काय वाचतो आहे हे विस्ताराने विचारले. घरच्या गोष्टींबद्दल आपुलकीने चौकशी केली. एक पालक आणि एक पाल्य अशीच ती भेट होती.
खरे तर त्यांच्या या प्रवासाचा फायदा घेत मी एक आगाऊपणा केला होता. पणजीच्या आमच्या कार्यालयासमोरच असलेले महाराष्ट्र परिचय केंद्र आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचे एक व्याख्यान मी परस्परच ठरवून टाकले होते. ते तसेही चार-पाच दिवस राहणार होते. ते गोव्यात आल्यावर पहिल्याच दिवशी आमची भेट झाली. मी त्यांना थोडे दबकतच या ठरवलेल्या भाषणाबद्दल सांगितले. मला वाटले ते खूश होतील आणि शाबासकीही देतील. पण तसे काहीच झाले नाही. त्यांनी त्या संस्थांनी तसे पत्र दिले आहे का असे विचारले. मुळात माझाच उत्साह अधिक असल्याने मीच या संस्थांना राजी केले होते. त्यामुळे त्यांनी पत्र वगैरे देण्याचा विषयच नव्हता. तसे पत्र घ्यायला हवे याचा मलाही उत्साहाच्या भरात विसर पडला. त्या कार्यक्रमाची तयारी काय झाली आहे असे त्यांनी विचारातच मी पुन्हा नकारात्मक मान हलवली. सरांचा होकार आल्यावर आम्ही हा कार्यक्रम जाहीर करू असे त्या संस्थांनी मला आधीच सांगितले होते. एकूण प्रकार सरांच्या लक्षात आला. त्यांनी हा कार्यक्रम होणार नाही व असे ऐनवेळेस ठरलेले व्याख्यान मी देणार नाही असे मला स्पष्टपणे सांगितले.
सहाजिकच माझा चेहरा पडला. थोडा वेळ असाच गेला. बहुधा सरांनी तो मुद्दामच जाऊ दिला आणि मग ते शांतपणे आणि नेहमीच्या सहजतेने पुन्हा बोलू लागले. 'जयंत, परिषद-संघ या कामासाठी आपण एका पायावर कोठेही जायला तयार असतो. तेथे उपचारांची गरज नसते कारण त्यात आपलेपणा असतो. पण काही ठिकाणी ही औपचारिकता पाळणे गरजेचे असते. केवळ तुझा उत्साह पाहून त्या संस्था तयार झाल्या असाव्यात असे मला वाटते. संस्थात्मक कार्यक्रम मुळात असे ऐनवेळेस ठरत नसतात. त्यामुळे तू माझ्याकडून होकार आण मग आम्ही कार्यक्रम जाहीर करतो अशी सावध भूमिका त्यांनी घेतली. त्यांचे काहीच चूक नाही. मी नकार देतोय त्यात माझीही काही चूक नाही. मधल्यामध्ये तू पकडला गेलास. याचे कारण उत्साहाच्या भरात तू हे सर्व ठरवलेस. आपल्या वक्त्यांना आपणच under estimate करण्याचा धोका यात असतो, म्हणून मी येत नाहीये...' मला त्यांनी नेमकेपणाने सांगितले. मला चूक समजली. चेहरा पूर्ववत झाला. ‘खरे तर तुला फक्त चहासाठी येथे बोलावले होते, पण तुझ्या या चुकीची शिक्षा म्हणून तू आता जेवायलाही इथेच थांब. आपण आणखी थोड्या गप्पा मारू..’ असे म्हणत त्यांनी माझ्या मनावरचा उरलासुरला ताणही दूर केला.
१९८५ हे आंतररराष्ट्रीय युवा वर्ष. त्या काळात सर अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्षही होते. दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनात झालेली ‘जागतिक विद्यार्थी व युवा संघटने’ची स्थापना, त्याला अटलजींची उपस्थिती आणि जागतिक विचारधारांच्या संघर्षांत ‘वसुधैव कुटुंबकम’ हे भारतीय तत्त्वज्ञान जागतिक पातळीवर नेण्यास सिद्ध असणारी विद्यार्थी व युवकांची ही नवी संघटना या मुद्द्याभोवती झालेले सरांचे भाषण या सर्व गोष्टी म्हणजे परिषदेच्या आजवरच्या वाटचालीतील एक लक्षणीय टप्पा ठरल्या आहेत !
विद्वत्ता आणि राजकीय व सामाजिक घटनांचे विश्लेषण करण्याची प्रभावी हातोटी याचा परिणाम म्हणून विधानपरिषदेत कोकण पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. सलग दोन वेळेस ते आमदार म्हणून निवडून आले. ना.स.फरांदे, सूर्यभानजी वहाडणे पाटील यांसारख्या तत्कालीन दिग्गज आणि अभ्यासू लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने त्यांनी या कालखंडात विविध समस्यांवर उठवलेला आवाज, विचारलेले प्रश्न, तयार केलेले अहवाल आणि सुचवलेले पर्याय हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे ! विधान परिषदेतील आमदारकीची दुसऱ्या वेळेची जबाबदारी संपली आणि हळूहळू सरांनीही राजकारणातून निवृत्ती घेतली.
रशिया, हॉलंड, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये पाठ्यवृत्तीच्या निमित्ताने झालेला दीर्घकाळाचा अध्ययन प्रवास, अनेक देशांना व्याख्यान आणि परिषदांच्या निमित्ताने दिलेल्या भेटी यातून आंतरराष्ट्रीय घटनांचे भाष्यकार हा त्यांच्या व्यक्तित्वातील पैलू आपोआपच साकारत गेला. अभ्यास आणि अनुभव या आधारे हिंदुत्व चळवळीला त्यांनी नव्वदीच्या दशकात, या विचारधारेच्या ऐन कसोटीच्या काळात एक मोठाच वैचारिक आधार दिला. स्वामी विवेकानंद, स्वा.सावरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारातील आणि कृतीतील समानता शोधून त्यावर भाष्य करणारे त्यांचे पुस्तक, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मौलिक योगदानाविषयी त्यांनी दिलेली व्याख्याने ह्या आम्हां कितीतरी कार्यकर्त्यांच्या वैचारिक प्रगतीला हातभार लावणाऱ्या गोष्टी आहेत.
अगदी अलीकडे जवळपास तीन वर्षे मी म्हाळगी प्रबोधिनीत कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत होतो. प्रत्येक महिन्यांत एक-दोनदा तरी त्यांचा फोन येणारच. त्यांनी वाचलेले आणि काही वेगळे मुद्दे समोर आणणारे लेख ते आवर्जून मला वाचायला सांगत असत. विजय गोखले यांनी बरीच वर्षे चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले. त्या अनुभवांवर आणि त्यांच्या अभ्यासावर आधारित ‘तियानानमेन : द मेकिंग ऑफ अ प्रोटेस्ट’ हे पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले. त्यातील काही महत्वाचा अंश सरांच्या वाचनात आला. त्यांनी फोन करून प्रबोधिनीच्या ग्रंथालयात हे पुस्तक आपण मागवले पाहिजे हे सांगितले. योगायोगाने माझ्या व्यक्तिगत संग्रहात हे पुस्तक असल्याने मी ते वाचले होते.
कितीतरी मुद्द्यांवर मग आम्ही चर्चा केली. तियानानमेन चौकात प्रत्यक्ष मोठे हत्याकांड घडलेच नाही हे गोखलेंच्या पुस्तकातील विधान त्यांना अचंबित करणारे होते. मीही त्या विधानाला दुजोरा दिला आणि चौकात विदयार्थ्यांना नव्हे तर बीजिंगमधील रस्त्यांवर रणगाड्यांना विरोध करणाऱ्या अनेक निरपराध नागरिकांना सैनिकांनी बेछूट गोळीबार करून मारले हे सांगितले. मी चीनमधील लोकशाही आंदोलनावर आणि त्यासाठी लढणाऱ्या काही कार्यकर्त्यांवर अभ्यास करतो आहे हे त्यांना सांगताच त्यांना स्वाभाविकच आनंद झाला. या आमच्या संभाषणाच्यावेळी ते खरेतर दुर्धर आजारावर उपचार घेत होते. कमालीचा अशक्तपणा त्यांना जाणवत होता. मी बोलणे आवरते घेत होतो आणि ते एकेक मुद्दे मांडत होते. त्यांच्या शोधकतेचा आणि इच्छाशक्तीचा असा दुहेरी प्रत्यय होता तो !
पवईतील त्यांच्या फ्लॅटचे काही प्रमाणात नूतनीकरण करायचे होते. सर्व घर व्यापून राहिलेला त्यांचा ग्रंथसंग्रह मी काही काळ प्रबोधिनीत घेऊन जावा असे त्यांनी सुचवले आणि मी माझ्या दोन सहकाऱ्यांसह त्यांच्या घरी हजर झालो. वर्गवारी करून ठेवलेली हजारपेक्षा अधिक पुस्तके आणि बऱ्याच फाईल्स आम्ही घेऊन आलो. खरी गंमत इथून पुढे सुरू झाली. ग्रंथ संग्रह आमच्या हवाली केला पण त्यांचा अभ्यास आणि लिखाण सुरूच होते. अचानक एखादा संदर्भ त्यांना हवा असायचा. मग ते फोन करीत. अमुक एका पुस्तकात अमुक एक तपशिलाचा कागद घालून ठेवला आहे,तो कागद किंवा त्याची फोटोकॉपी पाठव असे ते सांगत. मी ती सूचना पुढे पाठवायचो आणि आमचे ग्रंथालय सहाय्यक पाचव्या मिनिटाला ते टिपण घेऊन हजर व्हायचे. पुस्तकाचे नांव, वर्गवारी, टिपणाचा विषय आणि कागदांची साधारण संख्या यात कुठेही गोंधळ नसायचा. मला तत्क्षणी तीसेक वर्षांपूर्वी व्याख्यान देणारे सर आठवायचे. 'मुद्दा क्रमांक अमुक, संदर्भ पुस्तकाचे नांव हे, त्यातील पृष्ठक्रमांक हा....' तोच नेटकेपणा आणि तीच स्पष्टता !
केंद्र सरकारतर्फे सन्मानपूर्वक दिले जाणारे ‘राष्ट्रीय संशोधक-प्राध्यापक’ हे पद स्वीकारून त्यांनी त्यांच्या संशोधन क्षेत्रातील कामाला गेल्या काही वर्षांत अधिक वेळ दिला आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या कल्पनेतील सर्वांगीण विकासाचे पैलू उलगडवून दाखवणारा मौलिक ग्रंथ प्रकाशित केला. छत्तीसगड केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती.
सरांना अगदी अलीकडेच चतुरंग संस्थेचा जीवन-गौरव पुरस्कार जाहीर झाला तेंव्हा सहजच त्यांना फोन केला. ‘मी तुमच्या व्यक्तित्वावर लिहिणार आहे..’ हेही सांगितले. गोव्यात त्यांच्या भाषणाच्या बाबतीत केलेला आगाऊपणा मला पुन्हा करायचा नव्हता. त्यांनीही हसून परवानगी दिली. आठवडाभर मी मनात जुळणी करीत होतो. परिषदेतील दिवस आठवित होतो. त्या काळात पुन्हा जगत होतो…आणि मग अशी सर्व सिद्धता करून लेख लिहायला सुरुवात केली. अनाहूतपणे पहिलेच वाक्य लिहिले.......
' माझ्या या लेखातील मुद्दा क्रमांक एक....' !
अशोकरावांच्या स्मृतीला मनःपूर्वक वंदन !!
- जयंत कुलकर्णी..