
जबाबदारीची सावली, मायेचा प्रकाशआणि संपूर्ण देशात ‘द्राक्षपंढरी’ म्हणून ओळखल्या जाणार्या निफाड तालुक्यातल्या पिंपळस या अगदी छोट्याशा गावात, एका साध्या शेतकरी कुटुंबात बेबी सुभाष डेर्ले यांचा जन्म झाला. आई-वडील आणि चार भावंडे असा त्यांचा सुखी संसार. वडील काळ्या आईची सेवा करून आपला उदरनिर्वाह करत होतेे, तर या कामात अर्धांगिनीची त्यांना भक्कम साथ होती. मातीचा गंध, कष्टाची शिकवण आणि माणुसकीचे संस्कार हेच त्यांचे भांडवल. पण, आयुष्याने लवकरच कठोर परीक्षा घेण्यास सुरुवात केली.बेबी यांच्या आईला कर्करोगाचे निदान झाले. आईवर उपचार सुरू झाले. आईसाठी वडिलांची आणि मामांची सतत धावपळ सुरू होती पण, नशिबाने साथ दिली नाही. अखेर मातृविरहाचा प्रसंग बेबी यांच्या आयुष्यात आला. आईच्या मायेला सर्वच भावंडे पारखी झाली. आईच्या जाण्याने घरातील आर्थिक, भावनिक आणि मानसिक घडी विस्कटली. दुःखाच्या या वावटळीत घरातील मोठी या नात्याने, बेबींच्या खाद्यांवर मोठी येऊन पडली. घरातील सर्वांसाठी बेबीच एक आसरा होत्या.
या काळात शिक्षण हा एकमेव आधार ठरेल याची जाणीव त्यांना होती. सर्व भावंडांना शिक्षणाचा आधार मिळावा, स्वतःही सक्षम व्हावे अशीच त्यांची इच्छा होती. मात्र, शेतीची कामे कशी करावी याचीही त्यांना माहिती नव्हती. पण, जबाबदारी अंगावर पडल्यावर शिकण्याशिवाय काही गत्यंतरच नव्हते. सुरुवातीला शेतीची कामे करणे, स्वयंपाक करणे आणि सोबत शिक्षण घेणे अशी बेबी यांची कसरत सुरू झाली. या काळात त्यांनी ‘बी.ए.’ पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत, घराला हातभार लावण्याची इराद्याने नोकरी करण्याचा विचार केला. भावंडांच्या शिक्षणासाठी आणि बहिणींच्या लग्नासाठी पुंजी साठवावी, या आशेने त्यांनी नाशिक गाठले.
त्यांची एक मैत्रीण रमाबाई आंबेडकर वसतिगृहात अधीक्षक म्हणून कार्यरत होती. बेबी यांनी नाशिकमध्ये आल्यावर, या मैत्रिणीकडेच सहकार्य मागितले. त्यातूनच पुढे दोघींनी ‘बी.एड.’ करण्याचेही ठरवले. तिच्या मैत्रिणीचे नशीब बलवत्तर म्हणून, तिचा ‘बी.एड.’ला प्रवेश मिळाला पण, बेबी यांना पुन्हा नशीब आडवे आले. ‘बी.एड.’ला काही त्यांचा नंबर लागला नाही. पण, मैत्रिणीच्या रिक्त झालेल्या जागेवर अधीक्षक म्हणून काम करण्याची संधी मात्र मिळाली.
यानंतरच त्यांच्या आयुष्याची खरी परीक्षा सुरू झाली. स्वयंपाक करणार्या मावशी, मदतनीस आणि काही कर्मचारी बेबी यांच्यावर खार खाऊन असत. त्यातूनच इतर कर्मचारीवर्गाने थेट वसतिगृह सोडण्याचा निर्णय घेतल्याने, बेबी एकट्या पडल्या. ५० पेक्षा जास्त मुली आणि मदतीला कोणीही नाही, काय करावे हे बेबी यांना सूचत नव्हते. मग, स्वतःच पुढे होत दोन-तीन मुलींच्या मदतीने चुलीवर खिचडी शिजवली. घराची आणि आईची तीव्र आठवण येत होती. आई असती तर मला नक्कीच म्हणाली असती, ‘बाळा, घरी ये,’ असे बेबी यांना वाटत होते. गोधडीत तोंड खुपसून अनेकदा बेबी रडल्या पण, पुन्हादुसर्या दिवशी उठून कामालाही लागल्या. मुलींच्या मदतीने सर्व कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली.
अनेकदा आईची आठवण मनात दाटून येई पण, त्यांनी ती लपवली. अशाप्रकारे अनेक संकटे, भीती, डोळ्यात अश्रूू आणि स्वाभिमान यांना सोबत घेऊनच बेबी यांच्या नोकरीचा ‘श्रीगणेशा’ झाला. अधीक्षकाच्या मोजक्याच पगारावर त्यांनी नेटाने घर चालवले. तीन बहिणींना आणि एका भावाला आधार दिलाच; पण त्यांचे लग्नदेखील धुमधडाक्यात केले. स्वतःच्या स्वप्नांपेक्षा कुटुंबाच्या जबाबदार्या बेबी यांच्यासाठी नेहमीच प्रथम राहिल्या. रात्रंदिवस हॉस्टेलवर राहून बेबी यांनी केवळ नोकरीच नाही, तर सेवाही केली. आजही ती सेवा अविरतपणे सुरू आहे. मधल्या काळात बेबी यांचेही लग्न झाले; पण ते टिकले नाही. आयुष्याने पुन्हा एकदा कठोर वळण घेतले, तरी यावेळी मात्र त्या कोलमडल्या नाहीत.