क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले : भारतीय स्त्रीवाद आणि आधुनिकतेचा पाया

    03-Jan-2026
Total Views |
Savitri Bai Phule
 
‘ज्ञान मिळवा, नीतिमान बना, स्वावलंबी व्हा!’ असा संदेश देणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यानिमित्ताने सावित्रीबाईंची स्त्रीवादी भूमिका आणि आधुनिक दृष्टिकोन विशद करणारा हा लेख...
 
भारतीय इतिहासाच्या पटावर समाजपरिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या समाजसुधारकांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. १८व्या शतकातील अंधकारमय काळात, जेव्हा स्त्रियांना ‘शूद्रातिशूद्र’ मानले जात होते आणि शिक्षणाचे दार त्यांच्यासाठी कायमचे बंद होते, अशा वेळी सावित्रीबाईंनी ज्ञानाची ज्योत पेटवली. आज आपण ज्या ‘स्त्रीवादा’च्या आणि ‘आधुनिकते’च्या गप्पा मारतो, त्याचा खरा उगम पाश्चात्त्य देशांत नसून तो सावित्रीबाईंच्या संघर्षात आणि विचारांत आहे.
 
भारतीय स्त्रीवादाचा उगम आणि स्वरूप
 
स्त्रीवाद म्हणजे केवळ पुरुषांशी बरोबरी करणे नव्हे, तर स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणे होय. सावित्रीबाईंचा स्त्रीवाद हा कृतिशील होता. दि. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात जेव्हा त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, तेव्हा तो प्रस्थापित पुरुषसत्ताक पद्धतीविरुद्ध पुकारलेला पहिला एल्गार होता. त्याकाळी स्त्रियांच्या बुद्धीवर शंका घेतली जात असे. सावित्रीबाईंनी आपल्या कर्तृत्त्वाने हे सिद्ध केले की, संधी मिळाल्यास स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते. त्यांनी केवळ स्त्रियांना शिकवले नाही, तर त्यांच्यामध्ये ‘स्वत्वाची’ जाणीव निर्माण केली.
 
‘विद्येविना मती गेली...’ हा जोतिरावांचा विचार सावित्रीबाईंनी प्रत्यक्ष कृतीत उतरवला. त्यांनी ओळखले होते, जोपर्यंत स्त्रियांच्या हातात पुस्तक येत नाही, तोपर्यंत त्यांच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्या तुटणार नाहीत. १८९७च्या प्लेगच्या साथीत जेव्हा लोक देवाधर्माच्या नावाने साकडे घालत होते, तेव्हा सावित्रीबाईंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. हा त्यांचा वैज्ञानिक आणि मानवतावादी दृष्टिकोन नेहमी प्रेरणादायी आहे. ‘कोरोना’ काळातसुद्धा आपण अशा अनेक सावित्रीच्या लेकींना भेटलो. सावित्रीबाईंनी दलित आणि वंचित समाजातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शूद्रातिशूद्र समाजातील मुला-मुलींना शिकवून त्यांनी समाजाच्या उतरंडीलाच आव्हान दिले. त्यांच्यासाठी स्त्रीवाद हा केवळ स्त्रियांपुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण शोषित समाजाच्या मुक्तीचा मार्ग होता.
 
सावित्रीबाईंचे कार्य केवळ शाळेपुरते मर्यादित नव्हते. त्या काळातील विधवांच्या समस्या अत्यंत भीषण होत्या. पतीच्या निधनानंतर विधवांचे ‘केशवपन’ केले जाई. सावित्रीबाईंनी नाभिक समाजाची सभा घेऊन त्यांना ‘विधवांचे केशवपन न करण्याबाबत’ प्रवृत्त केले. तसेच ‘बालहत्या प्रतिबंधकगृह’ स्थापन करून त्यांनी ज्या विधवा स्त्रिया शोषणाचे बळी ठरल्या होत्या आणि गरोदर राहिल्या होत्या, त्यांना आश्रय दिला. त्यांच्या मुलांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी स्वतः एका मुलाला (यशवंत) दत्तक घेतले. हा त्या काळातील सर्वात मोठा पुरोगामी निर्णय होता. सावित्रीबाईंच्या साहित्यातून त्यांचा स्त्रीवादी आणि आधुनिक दृष्टिकोन स्पष्ट होतो. ‘काव्यफुले’ आणि ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या त्यांच्या काव्यसंग्रहातून त्यांनी अज्ञानावर प्रहार केले आहेत.
 
शूद्र अन् अतिशूद्र झाले दुःखात पायी,
अज्ञान हे मूळ त्याचे, दुसरे काही नाही.
 
असे सांगत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आज २१व्या शतकात स्त्रिया चंद्रावर पोहोचल्या आहेत, मोठ्या कंपन्यांच्या ‘सीईओ’ आहेत आणि राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, आजही घरगुती हिंसाचार, लिंगभेद आणि समान वेतनासारखे प्रश्न कायम आहेत. अशा वेळी सावित्रीबाईंचा लढा सर्वांना दिशा देतो.
 
त्याकाळी अक्षरांची ओळख महत्त्वाची होती, तशी आज स्त्रियांना ‘डिजिटल साक्षरते’ची गरज आहे. सावित्रीबाईंनी स्त्रियांना स्वावलंबी होण्याचे आवाहन केले होते. आजचे स्त्री-सक्षमीकरण हे आर्थिक स्वातंत्र्याशिवाय अपूर्ण आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या केवळ एका कालखंडापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या एक निरंतर चालणारी चळवळ आहेत. त्यांनी जे शेण आणि दगड अंगावर सोसले, त्यातूनच आजच्या स्त्रियांच्या प्रगतीची फुले उमलली आहेत. आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान हिमालयाएवढे उत्तुंग आहे.
 
खर्‍या अर्थाने सावित्रीबाई फुले या ‘स्त्रीवादाच्या आद्य प्रणेत्या’ आणि ‘आधुनिक भारताच्या माता’ आहेत. त्यांनी पेटवलेली ज्ञानाची ज्योत अखंड तेवत ठेवणे, हेच त्यांच्या स्मृतीला अभिवादन.
 
- अंजली तागडे
(लेखिका विश्व संवाद केंद्र, पुणेच्या संपादक आहेत.)